कसं फसलो, ते कळलंच नाही !

कसं फसलो, ते कळलंच नाही !

पिंपरी - ऑनलाइन व्यवहारांमुळे बॅंक कारभारात सुलभता आल्याचे चित्र दिसत असले तरी यात होणाऱ्या फसवणुकीच्या घटनांचा आलेख दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्यावर्षी पिंपरी-चिंचवड आणि पुणे परिसरात एक लाख रुपयांवरील रकमेच्या फसवणुकीच्या सुमारे ५० ते ५५ घटना झाल्या असून त्यातून दोन ते अडीच कोटी रुपयांचा फटका बसला आहे.

देशभरात एक लाख रुपयांवरील रकमेच्या फसवणुकीत महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे. राज्यात यासंदर्भात ३८० तक्रारी दाखल झाल्या असून त्याची रक्‍कम १२ कोटी १० लाख रुपयांपर्यंत आहे. हरियाना दुसऱ्या क्रमांकावर राहिले असून तिथे २३८ गुन्हे दाखल झाले आहेत. त्यांची रक्‍कम आठ कोटी २७ लाख रुपयांपर्यंत आहे. तिसऱ्या क्रमांकावर कर्नाटक, चौथ्या स्थानावर तमिळनाडू आणि पाचव्या स्थानावर दिल्लीचे नाव आहे. हिंजवडी आणि तळवडे आयटी पार्कमध्ये माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील अनेक कंपन्या कार्यरत आहेत. तिथे काम करणारे कर्मचारी ऑनलाइन व्यवहार करण्यास प्राधान्य देतात. त्यामुळेच या परिसरात ऑनलाइन बॅंकिंग फ्रॉडचे प्रमाण अधिक असल्याचे सायबरतज्ज्ञ डॉ. हेरॉल्ड डिकोस्टा यांनी सांगितले.

हिंजवडीमधील एका शेतकऱ्याने त्याच्या जमिनीतला काही भाग विकला. त्यातून आलेली रक्‍कम त्याने बॅंकेत ठेवली. काही दिवसांनी संबंधित शेतकरी ट्रॅक्‍टरच्या खरेदीचे पैसे देण्यासाठी बॅंकेत गेल्यावर त्याच्या खात्यातील रक्‍कम गायब झाल्याचे समजले. त्याचा त्याला मोठा धक्‍का बसला.

चिंचवडमधील एका सोसायटीतील गृहिणीच्या मोबाईलवर तुम्हाला लॉटरी असून त्यासाठी ठराविक रक्‍कम बॅंकेत भरा, असे सांगितले. त्यानंतर या गृहिणीने बॅंकेत पैसे भरले आणि त्यानंतर काही दिवसांनी आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. 

शहरातील एका माजी सैनिकाच्या मोबाईलवर फोन आला, ‘तुमचे डेबिट कार्ड बंद होणार आहे. तुम्हाला ते सुरू ठेवायचे असल्यास बॅंक खात्याची माहिती द्या’, असे सांगितले. आपल्याला आलेला फोन खरच बॅंकेचा असल्याचे समजून त्यांनी सर्व माहिती दिली आणि त्यांच्या खात्यातून रक्‍कम गेली. त्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. 

अशी घ्यावी काळजी
    नेट बॅंकिंग वापरणाऱ्यांनी नियमित तपासणी करावी
    व्हॉटस्‌ॲप, अन्य सोशल मीडियाच्या माध्यमातून बॅंक खात्याची माहिती देऊ नये
    सायबर कॅफे किंवा अन्य ठिकाणांहून ऑनलाइन बॅंकिंगचे व्यवहार करू नये
    ठराविक दिवसांनी डेबिट कार्डच्या पिन बदलावा 
    एटीएममध्ये पैसे काढताना सुरक्षेची काळजी घ्यावी, पैसे काढल्यानंतर स्लीप तेथे टाकू नये
    एटीएम कार्ड गहाळ झाल्यास बॅंकेत तक्रार नोंदवावी 
    कायम चीप बेस डेबिट कार्डचा वापर करावा 

सायबर क्षेत्रातील त्रुटी
    अमेरिका, ऑस्ट्रेलिया, जर्मनी, सिंगापूर या देशांच्या तुलनेत भारतातील सायबर कायदा कमकुवत
    नवीन ॲपची तपासणी होणे अपेक्षित
    स्वतंत्र न्यायालयाची आवश्‍यकता 
    ऑनलाइन बॅंकिंग गैरव्यवहारांत शिक्षेचे कमी प्रमाण
बॅंकांनी हे करावे
    खातेदारांची माहिती फुटणार नाही यासाठी बॅंकांची सक्षम यंत्रणा असावी 
    प्रत्येक तीन ते सहा महिन्यांनी बॅंकांनी सिक्‍युरिटी ऑडिट करावे
    एटीएमच्या माध्यमातून होणारे गैरव्यवहार रोखण्यासाठी प्रत्येक खातेधारकाला चीप असणारे एटीएम कार्ड द्यावे. सध्या वापरात असणाऱ्या एटीएम कार्डांपैकी ४० टक्‍के कार्डना चीप नाहीत
    प्रत्येक महिन्याला कार्यशाळेचे आयोजन करावे

व्यवहार करताना याकडे होते दुर्लक्ष
    बऱ्याचदा बॅंकेच्या खात्याची माहिती विचारण्यासाठी मोबाईलवर कॉल येतो आणि काहीजण खरी माहिती देतात. 
    ऑनलाइन खरेदी करताना संबंधित संकेतस्थळ हे खरे आहे की नाही, याची खातरजमा केली जात नाही. 
    एटीएममध्ये पैसे काढताना योग्य ती खबरदारी न घेतल्यास फसवणुकीचे प्रकार होतात. 
    विविध प्रकारचे ॲप डाऊनलोड करतानादेखील काळजी घेतली जात नाही.
गुन्हेगारांची साखळी 
भारताच्या एखाद्या कोपऱ्यातील झोपडपट्टीत राहणाऱ्या व्यक्तीच्या नावावर बॅंकेत खाते उघडले जाते. त्यानंतर फसवणूक केलेली रक्कम त्या खात्यावर वळवली जाते. रक्कम जमा होताच काही वेळात रक्कम त्या खात्यातून काढून तत्काळ ते खाते बंद केले जाते. त्या गरिबाला काही ठरलेले पैसे देऊन गुन्हेगार पसार होता. पोलिसांनी जरी त्याला पकडले तरी हाती काही लागत नाही. यामध्ये मोठे रॅकेट कार्यरत असते.

अशी होते फसवणूक 
    अनोळखी व्यक्ती फोन करून बॅंक खाते, डेबिट किंवा क्रेडिट कार्ड बंद होणार आहे किंवा अद्ययावत करायचे आहे, असे सांगून मोबाईलवर आलेला ओटीपी मिळवून खात्यातील रक्कम ऑनलाइन गायब केली जाते. 
    एखाद्या वेबसाइटवरचा डाटा चोरून किंवा बनावट वेबसाइट तयार करून विविध ऑनलाइन खरेदी, नोकरी, कर्ज किंवा वधू-वर सुचकच्या नावाखाली ऑनलाइन पैसे घेतले जातात. 
    बॅंकांची नावे सांगून लॉटरी, गिफ्ट मिळाले आहे. मात्र, त्यासाठी दिल्लीच्या कस्टम ऑफिसमध्ये शुल्क भरावा लागेल, असे सांगून ऑनलाइन पैसे उकळले जातात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com