पिंपरी - पावसामुळे जनजीवन विस्कळित 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 21 सप्टेंबर 2017

पिंपरी - सतत दोन दिवसांपासून बरसणाऱ्या पावसामुळे शहरातील जनजीवन पूर्णपणे विस्कळित झाले आहे. सध्या सुरू असणारा पावसाचा जोर आणखी दोन दिवस कायम राहण्याची शक्‍यता असल्याचा अंदाज वेधशाळेने वर्तविला आहे. दरम्यान, पवना धरण परिसरातही जोरदार पाऊस सुरू असल्याने धरणातून 2,867 क्‍युसेकने विसर्ग सुरू आहे. पवना नदी दुथडी भरून वाहत असल्याने नदीकाठावर असणाऱ्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. 

शहरात सोमवारी रात्रीपासून पावसाला सुरवात झाली आहे. मंगळवारी दिवसभर व रात्री पावसाचा जोर वाढला होता. त्यामुळे शहरातील जनजीवन पूर्णपणे विस्कळित झाले होते. चाकरमान्यांना गैरसोयीचा सामना करावा लागला. रस्त्यांची पूर्णपणे वाताहत झाली आहे. सखल भागात पाणी साठल्यामुळे वाहतूक कोंडी झाली होती. जागोजागी साचलेल्या पाण्यामुळे दुचाकी बंद पडल्याचे चित्र दिसले. खड्ड्यांमुळे अपघाताची शक्‍यता व्यक्त केली जात आहे. निगडी, भोसरी, पिंपरी, चिंचवड, वाकड, हिंजवडी या परिसरातील रस्त्यांवर अधिक खड्‌डे आहेत. जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील हॅरिस पुलाची वाताहत झाली आहे. महापालिका प्रशासनाने रस्त्यांवरील खड्‌डे दुरुस्त करण्याचे काम तातडीने हाती घेण्याची आवश्‍यकता आहे. 

पवना धरण तुडुंब 
पवना धरण परिसरात गेल्या 24 तासांमध्ये 63 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. मॉन्सून सुरू झाल्यापासून आतापर्यंत धरण परिसरात तीन हजार 374 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. यंदा चांगला पाऊस झाल्यामुळे पवना धरण जुलैअखेरीसच शंभर टक्‍के भरले. सध्या सुरू असणाऱ्या पावसाची नेमकी परिस्थिती पाहून पाणी कमी अधिक प्रमाणात सोडण्यात येणार असल्याची माहिती अभियंता मनोहर खाडे यांनी दिली.

Web Title: pimpri news rain pcmc traffic