प्रवाशांची गैरसोय टाळू 

प्रवाशांची गैरसोय टाळू 

पिंपरी - पुणे-लोणावळा लोकल रेल्वेसेवेच्या फेऱ्या कमी करून काही लोकल रद्द करण्यात आल्या आहेत. या अचानक झालेल्या बदलामुळे रेल्वे प्रशासनाच्या कारभाराचा फटका नोकरदार, कामगार, विद्यार्थी व प्रवाशांना बसला. या संदर्भात खासदार श्रीरंग बारणे यांनी सोमवारी (ता. ११) मध्य रेल्वेच्या पुणे रेल्वे विभागाचे अधिकारी मिलिंद देऊसकर यांच्याशी चर्चा केली. या वेळी प्रवाशांच्या होत असणाऱ्या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासनाकडून दिलगिरी व्यक्‍त करण्यात आली. प्रवाशांचा त्रास कमी करण्यासाठी रेल्वेने तत्काळ उपाययोजना करण्याची सूचना बारणे यांनी या वेळी केली. 

पुणे-लोणावळा ही लोकलसेवा ७० वर्षांपासून सुरू असून, लोकलमधून दररोज सुमारे एक लाख प्रवासी प्रवास करतात. यातून रेल्वे विभागास दरमहा सुमारे साडेतीन ते चार कोटी रुपये उत्पन्न मिळते, असे असताना प्रशासनाच्या वतीने कोणतीही पूर्वसूचना न देता लोकल रद्द करण्यात आल्या. काही लोकलच्या वेळेमध्ये बदल करण्यात येऊन उशिरा सोडल्याने प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागला, त्याची कैफियत बारणे यांनी रेल्वे अधिकाऱ्यांसमोर मांडली. 

बारणे म्हणाले, ‘‘गेल्या दोन चार दिवसांपासून पुणे-लोणावळा रेल्वेसेवा विस्कळित झाली आहे. त्याचा मोठा त्रास प्रवाशांना होत असून, रेल्वे प्रशासनाने याची दखल घेऊन तत्काळ उपाययोजना कराव्यात व पुणे-लोणावळा ही लोकलसेवा पूर्वपदावर आणावी.’’

 देऊसकर म्हणाले, ‘‘काही दिवसांपासून धुक्‍याची समस्या मोठ्या प्रमाणात असल्याने लांब पल्ल्याच्या गाड्या उशिरा येत होत्या. त्यामुळे लोकलचे वेळापत्रक बदलले. त्यांचा त्रास प्रवाशांना झाला. प्रवाशांच्या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासनातर्फे दिलगिरी व्यक्त करण्यात आली असून, प्रवाशांची गैरसोय होणार नाही, याची दक्षता घेतली जाईल. प्रवाशांची संख्या कमी असल्याने रात्री अकरा वाजून वीस मिनिटांची लोकल बंद केली आहे; परंतु त्यानंतर बारा वाजून पाच मिनिटांनी लोकल असल्याने व शटलही असल्याने प्रवाशांची गैरसोय होणार नाही. सकाळच्या वेळेत कामगारांना सोईस्कर असलेल्या दोन्ही लोकल सेवा वेळेस सोडल्या जातील.’’

पुणे-लोणावळा मार्गावर एक्‍स्प्रेस गाड्या व मालगाड्यांना रस्ता देण्यासाठी लोकल थांबवली जाते. लोकल आणि प्रवाशांना रेल्वेने प्रथम प्राधान्य आणि सेवा द्यावी.
- नरेंद्र पंधारे, नोकरदार, तळेगाव दाभाडे

रात्री नऊनंतरच्या लोकल बंद केल्यामुळे नोकरदारांचे दिवसभराचे नियोजन कोलमडले आहे. रात्रीची लोकल पुन्हा चालू करा.
- उमेश गवळी, नोकरदार, तळेगाव दाभाडे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com