करिअरची तयारी अकरावीपासून करा - वेलणकर

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 2 एप्रिल 2018

जुनी सांगवी - दहावीनंतर कुठल्या दिशेने शैक्षणिक प्रवास करावा, आजच्या स्पर्धेच्या युगात दहावी सुटली, की करिअरचे बारावीनंतर बघू, असे म्हणत वेळ वाया जातो आणि दिशा ठरत नाही. म्हणून अकरावीपासूनच करिअरच्या दिशेने विद्यार्थ्यांनी वाटचाल करावी, असे करिअरतज्ज्ञ विवेक वेलणकर यांनी सांगितले.

जुनी सांगवी - दहावीनंतर कुठल्या दिशेने शैक्षणिक प्रवास करावा, आजच्या स्पर्धेच्या युगात दहावी सुटली, की करिअरचे बारावीनंतर बघू, असे म्हणत वेळ वाया जातो आणि दिशा ठरत नाही. म्हणून अकरावीपासूनच करिअरच्या दिशेने विद्यार्थ्यांनी वाटचाल करावी, असे करिअरतज्ज्ञ विवेक वेलणकर यांनी सांगितले.

सकाळ विद्या व युनिक क्‍लासेस यांच्या वतीने दहावीनंतर काय? या करिअर चर्चासत्रात ते बोलत होते. ते म्हणाले, शाखा कुठलीही असो, आजची शिक्षण पद्धती व कालचा शैक्षणिक काळ पाहता स्पर्धेच्या युगात प्रत्येक क्षेत्रात स्पर्धा वाढली आहे. त्याचबरोबर करिअरच्या संधीही वाढल्या आहेत. अकरावीसाठी करिअरच्या दृष्टीने विषय निवडावेत. आज रेल्वेपासून ते विविध महामंडळांच्या क्षेत्रात मोठ्या संधी आहेत.

दुसऱ्या सत्रात प्रा. संदीप पवार म्हणाले, ‘सुटीतच अकरावीच्या अभ्यासाला सुरवात करावी. अभियांत्रिकीत की विज्ञान शाखेत प्रवेश घ्यायचा, अशी द्विधा मनस्थिती टाळावी. आवडीनुसार विषयांची निवड करावी. शैक्षणिक कर्ज मिळते. अनुदानही असते; मात्र अनेक पालकांना याची सखोल माहिती नसल्यामुळे संधी हुकतात. आयआयटीच्या प्रवेशासाठी जेईई प्रमुख परीक्षेला आणि जेईईनंतर जेईई ॲडव्हान्स परीक्षेस कसे सामोरे जावे, विषय कसे निवडावेत, याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले. अकरावी, बारावी व सीबीएसई बोर्डाचा अभ्यासक्रम एकसारखा असतो. शाखा कुठलीही असो, अभियांत्रिकी, वैद्यकीय शाखेशिवाय आज आर्किटेक्‍चर, ॲग्रिकल्चर, फूड टेक्‍नॉलॉजी असे अनेक पर्याय आहेत.’ जुनी सांगवी, नवी सांगवी परिसरातील पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रशांत शितोळे यांनी प्रास्ताविक केले. ते म्हणाले, ‘सकाळ विद्याचा शैक्षणिक उपक्रम स्तुत्य आहे. विद्यार्थी व पालकांनी या संधीचा लाभ घेऊन यश संपादन करावे.’ या वेळी सकाळचे जाहिरात व्यवस्थापक मिलिंद भुजबळ, प्रशांत शितोळे उपस्थित होते.

Web Title: pimpri news sakal vidya Career expert Vivek Velankar