घाटात जाळ्या लावण्याची रेल्वेला सूचना करणार - श्रीरंग बारणे

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 23 ऑगस्ट 2017

पिंपरी - पुण्याहून मुंबईकडे निघालेल्या हुबळी एक्‍स्प्रेसवर सोमवारी (ता. 21) दरड कोसळल्यानंतर खंडाळा घाट परिसरात धोकादायक ठिकाणी सुरक्षित जाळ्या लावण्याची सूचना रेल्वेला करणार असल्याचे खासदार श्रीरंग बारणे यांनी सांगितले. 

पिंपरी - पुण्याहून मुंबईकडे निघालेल्या हुबळी एक्‍स्प्रेसवर सोमवारी (ता. 21) दरड कोसळल्यानंतर खंडाळा घाट परिसरात धोकादायक ठिकाणी सुरक्षित जाळ्या लावण्याची सूचना रेल्वेला करणार असल्याचे खासदार श्रीरंग बारणे यांनी सांगितले. 

मंकी हिल ते ठाकूरवाडीदरम्यान हुबळी एक्‍स्प्रेसवर दरड कोसळण्याची घटना सोमवारी पहाटे घडली. त्यामध्ये तीन प्रवासी जखमी झाले होते. घाट परिसरात जानेवारीपासून आतापर्यंत अशा पाच घटना घडल्या आहेत. दुर्घटना झाल्यानंतर तत्काळ मध्य रेल्वेच्या व्यवस्थापकांशी संपर्क साधून त्यांच्याशी या विषयावर चर्चा केली. घाट परिसरातील प्रश्‍नासंदर्भात लवकरच रेल्वेच्या अधिकाऱ्यांची बैठक घेणार असल्याचे बारणे यांनी स्पष्ट केले. 

रेल्वे प्रशासनाकडून आतापर्यंत खंडाळा ते ठाकूरवाडी या घाट परिसरातील सर्वेक्षण, सुरक्षा उपाययोजनांविषयीची माहिती रेल्वेकडून मागवली आहे. सध्या पाऊस सुरू असल्यामुळे घाटाच्या परिसरात सर्वेक्षण करणे शक्‍य नाही. त्यामुळे पाऊस उघडल्यानंतर घाट परिसराचे संपूर्ण सर्वेक्षण करून कोणत्या ठिकाणचा भाग सुटला आहे, त्या ठिकाणी कोणत्या उपाययोजना करायला हव्यात, याचा आराखडा तयार करण्याच्या सूचना रेल्वे प्रशासनाला करण्यात आल्या आहेत. पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर दरड कोसळण्याचे प्रकार रोखण्यासाठी त्या ठिकाणी लोखंडाच्या जाळ्या बसवण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे रेल्वेकडून घाट परिसराच्या सर्वेक्षणाचे काम पूर्ण झाल्यानंतर या ठिकाणी पुन्हा असे प्रकार घडू नयेत, म्हणून जाळ्या बसवण्याची सूचना रेल्वे प्रशासनाला करण्यात आली असल्याचे बारणे यांनी स्पष्ट केले. 

रेल्वेमंत्र्यांना देणार पत्र 
या घटनेनंतर या ठिकाणी रेल्वे प्रशासनाकडून तत्काळ सुरक्षा उपाययोजना करण्यात याव्यात, यासाठी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांची भेट घेऊन त्यांना पत्र देणार असल्याचे खासदार श्रीरंग बारणे यांनी सांगितले. या भागाची सद्यपरिस्थिती, उपाययोजनांची आवश्‍यकता, याची माहिती देणार असल्याचे त्यांनी या वेळी नमूद केले.