हागणदारीमुक्तीसाठी ७ हजार शौचालये

हागणदारीमुक्तीसाठी ७ हजार शौचालये

पिंपरी - केंद्र सरकारने देशभरात तीन वर्षांपूर्वी सुरू केलेल्या ‘स्वच्छ भारत अभियान’ मोहिमेंतर्गत पिंपरी-चिंचवड शहर हागणदरीमुक्त करण्यासाठी विशेष प्रयत्न झाले. महापालिका प्रशासन आणि व्यावसायिक सामाजिक जबाबदारी (कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सबिलिटी) उपक्रमांतर्गत सुमारे सात हजार २२१ वैयक्तिक घरगुती शौचालयांची उभारणी झाली; तर १७५ सामुदायिक शौचालय सीट्‌स उभारले गेले. 

सध्या घनकचरा विलगीकरण मोहीम सोसायटी स्तरावर राबविली जात आहे; तर शहरामध्ये निगडी येथे पहिले ॲटोमॅटिक टॉयलेट बसविले गेले. त्याशिवाय विविध संकल्पनांवर (थीम बेस) आधारित स्वच्छता मोहीम राबवून परिसर स्वच्छता करण्यात आली. त्यामध्ये नागरिकांचा सक्रिय सहभाग पाहण्यास मिळाला.

केंद्र सरकारने देशभरात २ ऑक्‍टोबर २०१४ ला स्वच्छ भारत अभियानाची घोषणा केली. अभियान सुरू झाल्यापासून गेल्या तीन वर्षांत शहर स्वच्छतेच्या बाबतीत बरेच महत्त्वपूर्ण बदल झाले आहेत. महापालिकेला स्वच्छ सर्वेक्षणात चालू वर्षी देशात ७२ वा; तर राज्यात पाचवा क्रमांक मिळाला. २०१६ मध्ये मात्र महापालिकेचा देशात नववा,तर राज्यात पहिला क्रमांक होता. स्वच्छ सर्वेक्षणात क्रमांक घसरल्यानंतर त्यापासून बोध घेत महापालिका प्रशासनाने स्वच्छतेबाबत जागरूकता वाढविल्याचे चित्र पाहण्यास मिळत आहे. शहरात सध्या सुमारे २० लाख इतकी लोकसंख्या आहे. लोकसंख्यावाढीबरोबरच दररोज निर्माण होणाऱ्या सुमारे ८११ मेट्रिक टन इतक्‍या घनकचऱ्याचे व्यवस्थापन करण्याची समस्या जटिल होत चालली आहे. मोशी कचरा डेपो येथील ८१ एकर क्षेत्रात या कचऱ्यावर विविध पद्धतीने प्रक्रिया केली जाते. सुमारे ४३५ मेट्रिक टन कचऱ्यापासून यांत्रिकी पद्धतीने खतनिर्मिती (कंपोस्टिंग) केली जाते. भाजी मंडईत निर्माण होणाऱ्या १२ ते १५ टन आणि मलनिस्सारण प्रकल्पातील (एसटीपी) १५ ते १८ टन ‘स्लज’पासून गांडूळखत निर्माण केले जाते. प्लॅस्टिकपासून इंधननिर्मिती प्रकल्पात दररोज दीड ते २ मेट्रिक टन इतक्‍या कचऱ्यावर प्रक्रिया होते. मोशी कचरा डेपो येथील ११ एकर क्षेत्रात ४ लाख घनमीटर इतक्‍या कचऱ्यावर प्रक्रिया केली जात आहे. 

वैयक्तिक घरगुती शौचालय उभारणी
बांधकाम पूर्ण : ७२२१ (महापालिका व सीएसआर)
बांधकाम सुरू : ५८९६
सार्वजनिक शौचालय 
 बांधकाम पूर्ण : १७५ सीट्‌स
 बांधकाम सुरू : ३६१ सीट्‌स
वैयक्तिक शौचालयांसाठी प्राप्त अनुदान 
 केंद्र सरकार : २.८७ कोटी
 राज्य सरकार : ५.०३ कोटी
वैयक्तिक शौचालयांसाठी प्रतिलाभार्थी अनुदान
 केंद्र सरकार : ४ हजार
 राज्य सरकार : ८ हजार
 महापालिका हिस्सा : ४ हजार 

हागणदारीमुक्तीसाठी राबविलेले उपक्रम
     सर्वेक्षणाद्वारे उघड्यावर शौचास बसणाऱ्या एकूण ५२ ठिकाणांची निश्‍चिती
     प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयनिहाय नियुक्‍त ३ स्वच्छता दूतांकडून स्वच्छतागृहांबाबत जागरूकता
     उघड्यावर शौचास बसणाऱ्यांकडून गुडमॉर्निंग पथकाद्वारे दंड वसुली, गरजेनुसार फिरत्या शौचालयांची उपलब्धता 
     शेल्टर असोसिएटसचा वैयक्तिक घरगुती शौचालय उभारणीसाठी ‘सीएसआर’ अंतर्गत महत्त्वपूर्ण सहभाग
 एक्‍साईड बॅटरी कंपनीतर्फे ‘सीएसआर’अंतर्गत केएसबी चौक आणि थरमॅक्‍स चौकात महिला व पुरुषांसाठी सार्वजनिक स्वच्छतागृह
 निगडी बसथांबा येथे सॅमटेक क्‍लीन ॲण्ड क्‍लिअर कंपनीच्या ‘सीएसआर’ फंडातून शहरातील पहिले स्वयंचलित स्वच्छतागृह (ॲटोमॅटिक टॉयलेट)

स्वच्छता मोहिमेत राबविलेले उपक्रम 
     अर्जुन पुरस्कार विजेत्या नेमबाज अंजली भागवत यांची स्वच्छ भारत अभियानांतर्गत शहरासाठी ब्रॅंड ॲम्बॅसिडर म्हणून निवड
     कुटुंब स्तरावर ओला व सुका कचरा वेगवेगळा साठविण्यासाठी ७ लिटर क्षमतेच्या प्रत्येकी २ प्लॅस्टिक बकेटचे वाटप; ४ लाख ६५ हजार १७२ कुटुंबांना वितरण (फेब्रुवारी ते एप्रिल २०१५)
     शहरात स्वच्छ भारत प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी स्वतंत्र कक्षाची स्थापना (ता. २३ ऑगस्ट २०१६)
     प्रत्येक महिन्यात दोन संकल्पनेवर आधारित विशेष अभियान
     झोपडपट्टी, पूल, उड्डाण पूल, मोकळ्या जागा, रस्ते, शाळा, हॉटेल, भाजी मंडई आदी ठिकाणी मोहीम
     स्वच्छतेबाबत जागरूकतेसाठी केला स्वच्छता ॲप तयार
     यशवंतराव चव्हाण रुग्णालय, शिवाजी विद्यालय (भोसरी), साई शारदा औद्योगिक प्रशिक्षण केंद्र (कासारवाडी), मोरया गोसावी सार्वजनिक स्वच्छतागृह आदी ठिकाणी सॅनिटरी नॅपकिन व्हेंडिंग मशिन
 पालिका, पर्यावरण संवर्धन समितीतर्फे प्लॅस्टिक कचरामुक्त कार्यशाळा
 शहरात १९८ फ्लेक्‍स, २ लघुपट, २ व्हिडिओ क्‍लिप, २ व्हिडिओ जिंगल्स, पथनाट्याद्वारे जनजागृती
 सामुदायिक व सार्वजनिक शौचालयांची ठिकाणे दर्शविणारे मोबाईल ॲप
 स्वच्छ भारत अभियानच्या धर्तीवर स्वच्छ महाराष्ट्र अभियानात ‘स्वच्छता ही सेवा’ ही मोहीम

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com