बलात्काराचा बनाव करून ब्लॅकमेल करणाऱ्या अभिनेत्रीला अटक

रवींद्र जगधने
बुधवार, 12 जुलै 2017

पिंपरी - दूरचित्रवाहिनीवर गुन्हेगारीविषयक मालिकेत महिला पोलिसांची भूमिका करणाऱ्या अभिनेत्रीने अनेकांना आपल्या जाळ्यात ओढून त्यांना ब्लॅकमेल करून पैसे उकळल्याची माहिती समोर आली. अशाच एका प्रकरणात बलात्काराची खोटी तक्रार देण्याचा बनाव समोर आल्याने भोसरी पोलिसांनी तिला अटक केली. 

पिंपरी - दूरचित्रवाहिनीवर गुन्हेगारीविषयक मालिकेत महिला पोलिसांची भूमिका करणाऱ्या अभिनेत्रीने अनेकांना आपल्या जाळ्यात ओढून त्यांना ब्लॅकमेल करून पैसे उकळल्याची माहिती समोर आली. अशाच एका प्रकरणात बलात्काराची खोटी तक्रार देण्याचा बनाव समोर आल्याने भोसरी पोलिसांनी तिला अटक केली. 

पूजा जाधव असे या अभिनेत्रीचे नाव असून पोलिसांनी तिच्यासह रवींद्र मोतीराम शिरसाम (वय 45 रा. हांडेवाडी,हडपसर) माया सावंत (वय 50, रा. खराळवाडी, पिंपरी) आणि सोनम पवार (वय 24, रा. नेहरुनगर,पिंपरी) अटक केली आहे. इतर तीन महिला फरार आहेत. पूजा ही सतत नाव बदलत असल्याने तिच्या खऱ्या नावाची पोलिसांकडे अद्याप खात्रीशीर माहिती नाही. 

मिळालेल्या माहितीनुसार, भोसरी पोलिस ठाण्यात सामाजिक संस्थेचे कार्यकर्ते भासवून रवींद्र याच्यासह तीन महिला आल्या. तेथे त्यांनी अभिनेत्रीवर बलात्कार झाला आहे, अशी खोटी तक्रार देण्याचा प्रयत्न केला. मात्र, उलट तपासणीत त्यांनीच काळेवाडीतील एका तरुणाला लुटल्याचे समोर आले. अभिनेत्री व तिचा सहकारी रवींद्र हा धनदांडग्यांना हेरून त्यांना ब्लॅकमेल करत असे व लुटत असल्याचे समोर आले. या अभिनेत्रीने "तम्मना' या लघुपटात भूमिका केली असल्याचे पोलिसांनी सांगितले. याबाबत भोसरी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक दिलीप कुलकर्णी म्हणाले, ही अभिनेत्री यापूर्वीही 2014 रोजी याच पद्धतीने तक्रार देण्यासाठी आली होती. त्यावेळी तिने प्रणीता असे नाव सांगून आपले आई-वडील कोल्हापूर येथे राहत असल्याचे सांगितले होते. यावेळी तिने स्वतःचे नाव पूजा असे सांगितले. 

काय आहे प्रकरण 
काळेवाडीतील एक तरुण बांधकाम व्यावसायिक असल्याचे समजून मोबाईल क्रमांक त्यांनी मिळविला. चार ते पाच दिवस मोबाईलवर बोलून प्रेम असल्याचे भासवले. त्यानंतर भोसरीतील वनराज लॉजवर ते 8 जुलै रोजी भेटले. मात्र तेथे या टोळीने त्याला पकडून मारहाण केली. तसेच पाच लाख न दिल्यास तुझ्याविरोधात बलात्काराची तक्रार देईल, अशी धमकी दिली. त्याच्याकडील सहा हजार रुपये काढून घेतले. पूर्वीच्या प्रकरणानुसार हा देखील पोलीसांकडे नेण्याच्या अगोदर पैसे देईल, अशी त्यांना अपेक्षा होती. त्यामुळे त्याला घेऊन त्यांनी भोसरी पोलिस ठाणे गाठले. मात्र, अभिनेत्रीने तक्रार न देण्याचे ठरवल्याने पोलिसांचा संशय बळावला. काही कर्मचाऱ्यांनी ही अगोदरही याच पद्धतीने तक्रार देण्यासाठी आली असल्यामुळे तिला ओळखले.