गैरव्यवहाराच्या चौकशीची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 ऑक्टोबर 2017

पिंपरी - काळेवाडी मुख्य रस्ता ते राजवाडेनगर दरम्यानच्या १८ मीटर रुंद डीपी रस्त्याच्या कामात झालेल्या गैरव्यवहाराची चौकशी करण्याची मागणी विविध राजकीय व सामाजिक क्षेत्रांतून होत असून, काहींनी मुख्यमंत्र्यांसह महापालिका आयुक्तांना निवेदन दिले आहे. तर, या कामात कोणताही गैरव्यवहार झाला नसल्याचे महापालिकेचे म्हणणे आहे.

या रस्त्याच्या रुंदीकरण व डांबरीकरणासाठी कागदोपत्री ४९ लाख रुपये खर्च झाल्याचे वृत्त ‘सकाळ’ने प्रकाशित केल्यानंतर शहरात खळबळ उडाली.

याबाबत अपना वतन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सिद्घीक शेख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की या रस्त्याचे प्रत्यक्षात काम पूर्ण झाले नसताना स्थापत्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी पूर्णत्वाचा दाखल दिलाच कसा, हा प्रश्‍न निर्माण होत आहे. विशेष म्हणजे स्थापत्य विभागाचे कार्यकारी अभियंता, कनिष्ठ अभियंता, उपअभियंता या सर्वांनी सदर रस्त्याचे काम पूर्ण केल्याचे भासवून ठेकेदाराला बिलसुद्धा दिले आहे. यामुळे जनतेचा पैसे लुबाडणाऱ्या या अधिकाऱ्यांची तातडीने चौकशी करून दोषींविरोधात कडक कारवाई करावी. अधिकाऱ्यांशी संगनमत करून महापालिकेचा पैसे लाटणाऱ्या ठेकेदारावर कारवाई करून त्याच्या कंपनीला काळ्या यादीत टाकण्यात यावे. अन्यथा, अपना वतन संघटनेच्या वतीने शनिवारी (ता. २८) आयुक्तांविरोधात तीव्र आंदोलन करण्यात येईल.

या कामात कोणत्याही प्रकारचा गैरव्यवहार झाला नसून, त्या वेळी डीपी रस्त्याच्या कामाची निविदा निघाली होती. मात्र, जागा हस्तांतरित झाली नव्हती. त्यामुळे तापकीर मळा चौक ते नाल्यापर्यंतच्या रस्त्याचे, तसेच इतरही अंतर्गत रस्त्यांचे डांबरीकरण डीपी रस्त्याच्या निविदेत करून घेतले. 
- प्रमोद ओंबासे, कार्यकारी अभियंता, स्थापत्य विभाग 

कदाचित रस्ता बनला असेल; पण फक्त त्याच्या अतिपारदर्शकतेमुळे तो सर्वसामान्यांना दिसत नसेल. याप्रकरणी आयुक्तांनी दोषींवर कारवाई करावी.
- युवराज दाखले, शहरप्रमुख, शिव व्यापारी सेना 

भ्रष्टाचारामध्ये पालिका अधिकारी, ठेकेदार, नगरसेवक यांचे हात काळे झालेले आहेत. पालिका अधिकाऱ्यांकडून नेहमीच दिशाभूल केली. ‘सकाळ’ने हा भ्रष्टाचार उघड केल्याबद्दल आभार.  
- हरेश नखाते, शिवसेना विभागप्रमुख, काळेवाडी- रहाटणी