बांधकाम व्यावसायिक गोळीबार प्रकरणातील आरोपींना अटक 

रविंद्र जगधने
मंगळवार, 4 जुलै 2017

पाच लाखात सुपारी दिल्याचे झाले निष्पन्न, मुख्य आरोपी अद्याप फरार 
पिंपरी - पिंपळे गुरव येथे 24 जून रोजी बांधकाम व्यावसायिक योगेश शेलार (वय 35, रा. 307-अग्रेशिया सोसायटी, पिंपळे गुरव) यांच्यावर झालेल्या गोळीबार प्रकरणातील तीन गुन्हेगारांना अटक करण्यात गुन्हे शाखा चारला यश आले. याप्रकरणी माजी नगरसेवक कैलास गायकवाड यांची मुलगी अदिती गायकवाड (वय 22, रा. गायकवाडनगर, औंध) हिला अटक करण्यात आली होती. 

पाच लाखात सुपारी दिल्याचे झाले निष्पन्न, मुख्य आरोपी अद्याप फरार 
पिंपरी - पिंपळे गुरव येथे 24 जून रोजी बांधकाम व्यावसायिक योगेश शेलार (वय 35, रा. 307-अग्रेशिया सोसायटी, पिंपळे गुरव) यांच्यावर झालेल्या गोळीबार प्रकरणातील तीन गुन्हेगारांना अटक करण्यात गुन्हे शाखा चारला यश आले. याप्रकरणी माजी नगरसेवक कैलास गायकवाड यांची मुलगी अदिती गायकवाड (वय 22, रा. गायकवाडनगर, औंध) हिला अटक करण्यात आली होती. 

सौरभ सुनील शिंदे (वय 20, रा. सिध्दकमल निवास, स्वामी विवेकानंद सोसायटी, नवी सांगवी), प्रणव फट्टू गावडे (वय 19, रा. ए-11, मोरया सोसायटी, घरकुल-चिखली) आणि आशितोष देविदास मापारे (वय 19, रा. भैरवनगर, मातोश्री हाईट्‌स, धानोरी) अशी अटक केलेल्यांची नावे असून न्यायालयाने त्यांना सात जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपळे गुरवमधील तुळजाभवानी मंदिरात दर्शनासाठी आलेल्या शेलार यांच्यावर मोटारसायकलवर आलेल्या हल्लेखोरांनी गोळीबार केला होता. त्यांच्या पायाला गोळ्या लागल्याने त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. या प्रकरणी सांगवी पोलिसांनी अदिती हिला अटक केली. अदिती व शेलार यांच्यात काही कौटुंबिक वादामुळे वैर होते. मात्र, पुढील तपास गुन्हे शाखा चारकडे देण्यात आला. या गुन्ह्यात प्रणव याला सहभागाच्या संशयावरून ताब्यात घेऊन चौकशी केली असता अदिती हिचा मामेभाऊ सौरभ व त्याचा सराईत गुन्हेगार मित्र बंटी जाधव (रा. सातारा) याच्या मदतीने शेलार यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचे व अदिती हिने कट रचल्याचे निष्पन्न झाले. 

सौरभ, प्रणव व बंटी यांनी शेलार यांचा खून करण्याचे पूर्ण नियोजन करून त्याकरिता पाच लाख रुपये देण्याचे ठरले. शेलार यांच्या हालचालींवर लक्ष देण्यासाठी अदितीने आरोपी आशितोष याला पैसे पुरवले. ठरल्याप्रमाणे दोन दिवस पाळत ठेवून बंटी व त्याच्या साथीदारांनी मोटारसायकलवरून येऊन शेलार यांच्यावर गोळ्या झाडून निघून गेले. मात्र, सुदैवाने ते बचावले.

पोलिसांनी मोठ्या शिताफीने गुन्हेगारांना अटक केली असून मुख्य आरोपी बंटी जाधव अद्याप फरार आहे. ही कारवाई अपर पोलिस आयुक्त प्रदीप देशपांडे, उपायुक्त पंकज डहाणे, सहाय्यक आयुक्त संजय निकम यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा चारचे निरीक्षक राजेंद्र तोडकर, सहाय्यक निरीक्षक गणेश पाटील व नितीन भोयर, उपनिरीक्षक विलास पालांडे, कर्मचारी दिलीप लोखंडे, संजय गवारे, प्रमोद लांडे, राजेंद्र शेटे, धर्मराज आवटे, प्रविण दळे, राजू मचे, सलीम शेख, प्रमोद वेताळ, जितेंद्र अभंगराव, आप्पासाहेब कारकुड, संतोष बर्गे आदींच्या पथकाने केली. 

बंटी जाधव सराईत गुन्हेगार 
बंटी हा सराईत गुन्हेगार असून त्याला सातारा जिल्ह्यातून तडीपार करून तो अहमदनगर जिल्ह्यात वास्तव्यात होता. मात्र नंतर त्याची तडीपारी रद्द करण्यात आली होती.