टक्केवारीच्या खोट्या तक्रारी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 5 जुलै 2017

शहर भाजपचा ‘राष्ट्रवादी’वर पलटवार; ‘मोका’तील गुन्हेगार साठे याचा वापर 

पिंपरी - ‘‘ठेकेदारांना नियमबाह्यपणे बिल देणे बंद केल्याने राष्ट्रवादी काँग्रेसने आमच्यावर टक्केवारीच्या खोट्या तक्रारी केल्या आहेत. त्यासाठी त्यांनी ‘मोका’तील गुन्हेगार प्रमोद साठे याला पुढे केले आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस आणि गुन्हेगारीजगताचे संबंध उघड झाले आहेत.

शहर भाजपचा ‘राष्ट्रवादी’वर पलटवार; ‘मोका’तील गुन्हेगार साठे याचा वापर 

पिंपरी - ‘‘ठेकेदारांना नियमबाह्यपणे बिल देणे बंद केल्याने राष्ट्रवादी काँग्रेसने आमच्यावर टक्केवारीच्या खोट्या तक्रारी केल्या आहेत. त्यासाठी त्यांनी ‘मोका’तील गुन्हेगार प्रमोद साठे याला पुढे केले आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस आणि गुन्हेगारीजगताचे संबंध उघड झाले आहेत.

सत्तेविना असलेली राष्ट्रवादी करदात्यांची लूट करून पैसे कमविण्यासाठी कोणत्या थराला चालली आहे, हे आता स्पष्ट होत आहे,’’ असा पलटवार भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांनी मंगळवारी केला. महापौर नितीन काळजे, उपमहापौर शैलजा मोरे, स्थायी समिती अध्यक्षा सीमा सावळे, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, भाजपचे ज्येष्ठ नेते आझम पानसरे, सारंग कामतेकर आदी उपस्थित होते.

राष्ट्रवादी काँग्रेसने केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपाला प्रत्युत्तर देताना जगताप आणि कामतेकर पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, ‘‘ठेकेदारांकडून टक्केवारी घेतली जात असल्याबाबत पंतप्रधान कार्यालयाकडे तक्रार करणारा प्रमोद साठे महापालिकेचा ठेकेदार नाही किंवा तो शहरातील रहिवासीही नाही.

साठे हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर ‘मोका’अंतर्गत कारवाई झाली आहे. पुण्यातील राष्ट्रवादीच्या दोन माजी महापौरांच्या कुटुंबासोबत त्याची ऊठबस आहे. आमदार माधुरी मिसाळ यांचे पती सतीश मिसाळ यांच्या खुनातील तो आरोपी आहे. त्याने पंतप्रधान कार्यालयाकडे केलेली तक्रार हादेखील राष्ट्रवादीच्या दबावाचाच एक भाग आहे. या तक्रारींबाबत त्याने कोणतेही पुरावे सादर केलेले नाहीत. तरीदेखील तक्रारीची दखल घेऊन पंतप्रधान कार्यालयाने चौकशीचे आदेश दिले आहेत.’’

जगताप म्हणाले, ‘‘राष्ट्रवादी सत्तेत असताना मनमानी कारभार करून करदात्यांच्या पैशांची लूट करत होते. त्याला आता चाप बसला आहे. ‘अंडरवर्ल्ड’मधील संबंधांचा वापर करून धमकाविले जात आहे. मात्र, भाजप अशा दबावाला आणि खोट्या तक्रारींना कदापिही भीक घालणार नाही.’’
 
‘स्थायी’च्या माजी सभापतींचा मित्र
खुनाच्या गुन्ह्यात येरवडा कारागृहात जाऊन आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थायी समितीच्या माजी सभापतींचा साठे हा जवळचा मित्र आहे. त्या माजी सभापतीला आपल्या प्रभागात ‘मॉडेल वॉर्ड’च्या नावाखाली केलेल्या कामांची बिले नियमबाह्यपणे मिळणे बंद झाले आहे. त्यातून अस्वस्थ झाल्यामुळे त्या सभापतीने आणि राष्ट्रवादीच्या एका विद्यमान नगरसेवकाने प्रमोद साठे याला पुढे करून पंतप्रधान कार्यालयाकडे खोटी तक्रार करण्यास भाग पाडले आहे, असेही लक्ष्मण जगताप व सारंग कामतेकर यांनी सांगितले.

आमदार जगताप म्हणाले...
ठेकेदारांच्या खांद्यावर ‘राष्ट्रवादी’ची बंदूक
लेखापाल राजेश लांडे यांच्या बदलीची ठेकेदारांकडून सुपारी; परंतु वस्तुस्थिती वेगळी 
चूक असल्यास लांडे यांच्यावर कारवाई करावी 
खोट्या आरोपांप्रकरणी अब्रूनुकसानीचा दावा ठोकणार 
तुकाराम मुंढेंसोबतचा वाद मिटला. त्यांच्या बदलीची मागणी नाही