बांधकाम व्यावसायिकावर पिंपळे गुरवमध्ये गोळीबार

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 25 जून 2017

नवी सांगवी - एका बांधकाम व्यावसायिकावर गोळीबार झाल्याची खळबळजनक घटना शनिवारी सकाळी पिंपळे गुरवमध्ये घडली. या प्रकरणी एका तरुणीसह तिच्या दोन साथीदारांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

नवी सांगवी - एका बांधकाम व्यावसायिकावर गोळीबार झाल्याची खळबळजनक घटना शनिवारी सकाळी पिंपळे गुरवमध्ये घडली. या प्रकरणी एका तरुणीसह तिच्या दोन साथीदारांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

अदिती कैलास गायकवाड असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणीचे नाव आहे. तसेच तिच्या दोन साथीदारांच्या विरोधातही गुन्हा दाखल केला आहे. योगेश शंकर शेलार (वय ३५, रा. लक्ष्मीनगर, पिंपळे गुरव) असे गोळीबारात जखमी झालेल्या बांधकाम व्यावसायिकाचे नाव आहे. त्यांच्यावर औंध येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून, त्यांच्या प्रकृतीचा धोका टळला आहे. पिंपळे गुरव येथील तुळजाभवानी मंदिरात दर्शनासाठी शेलार आले होते. ते मोटारीतून उतरल्यानंतर त्यांच्या मागावर असलेल्या दुचाकीवरील दोन हल्लेखोर तरुणांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. त्यातील एक शेलार यांच्या पायाला लागली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज ताब्यात घेतले असून, त्यामध्ये हेल्मेट घातलेले दोन तरुण दुचाकीवरून येताना दिसत आहेत. या प्रकरणी पोलिसांनी एका तरुणीला चौकशीकरिता ताब्यात घेतले होते. याप्रकरणी खुनी हल्ला करणे, कट रचने, कटात सहभागी होणे आदी कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. मात्र हल्ल्याचे कारण समजू शकले नाही.