वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष बेततेय जिवावर

वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष बेततेय जिवावर

पिंपरी - दुचाकी वाहने आणि मोठमोठे रस्ते ही पिंपरी-चिंचवड शहराची ओळख झाली आहे. त्यातच वाढत्या तंत्रज्ञानामुळे, तसेच बाजारात येणाऱ्या नव्या आलिशान वाहनांमुळे प्रवास सुखाचा होत असला, तरी वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष केल्यामुळे दरवर्षी अनेकांना आपला जीव गमवावा लागत आहे. विशेष म्हणजे अपघातामध्ये मृत्युमुखी पडणाऱ्यांमध्ये पादचारी आणि दुचाकीस्वारांचे प्रमाण सर्वाधिक आहे.

आपल्या देशात प्रत्येक तासाला सरासरी ५५ अपघात होत असून, त्यामध्ये १७ जणांचा बळी जात असल्याचे केंद्राने जाहीर केलेल्या आकडेवारीवरून स्पष्ट होते. पिंपरी-चिंचवड शहराचा नियोजनबद्ध विकास होत आहे. रस्त्याची रुंदी तर वाढली; मात्र त्यासोबतच अपघातांची संख्याही वाढली आहे. सार्वजनिक वाहतूक सक्षम नसल्याने नागरिक स्वतःची दुचाकी वाहने प्रवासाकरिता वापरत आहेत. त्यामुळेच दुचाकी अपघातांत मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या जादा आहे.

हिट अँड रनचे प्रमाण अधिक
पिंपरी-चिंचवड शहराचा विचार केला तर महामार्गावर रात्रीच्या वेळी होणारे अपघात हा चिंतेचा विषय आहे. भरधाव येणाऱ्या वाहनांचा अंदाज न आल्याने अनेक पादचाऱ्यांचा रात्रीच्या वेळी महामार्गावर अपघात होतो. अपघातानंतर जखमीला रुग्णालयात दाखल न करता, तसेच पोलिसांना खबर न देता पळून जाण्याचे प्रमाण अधिक आहे.

चौकांमध्ये अपघात अधिक
दिवसा प्रमुख चौकांमध्ये वाहतूक पोलिस असतात. मात्र रात्रीच्या वेळी पोलिस नसल्याने वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष केले जाते. भरधाव वाहन चौकात आल्यावर त्याचा दुसऱ्या वाहनाशी अपघात होतो. सध्या चौकात बसविलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमुळे अशा अपघातात चूक कोणाची, हे समजत असले तरी गेलेला जीव परत येऊ शकत नाही.

स्टंटबाज आवाक्‍याबाहेरच
वाहन चालविताना स्टंट करणे, वेगात वाहन चालविण्याची स्पर्धा लावणे, ट्रिपल सीट जाणे, सिग्नल तोडणे आदी प्रकारे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकडून नियमांचा भंग केला जातो. या विद्यार्थ्यांकडे अत्याधुनिक दुचाकी असल्याने ते कधीच पोलिसांच्या हाती लागत नाहीत.

हेल्मेटच्या वापराबाबत उदासीनता
महामार्गावरच हेल्मेटसक्‍ती करावी शहरात नको, असा सूर दुचाकी वाहनचालकांमधून ऐकायला येतो. मात्र दुचाकीच्या अपघातात महामार्गापेक्षा शहरात मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या लक्षणीय आहे. हेल्मेट दुचाकीला अडकवून दुचाकी चालविणाऱ्या एका २२ वर्षीय विवाहित तरुणीचा रस्ता दुभाजकाला धडकून डोक्‍याला मार लागल्याने मृत्यू झाल्याची घटना याच आठवड्यात भोसरी येथे घडली. जर त्यांनी हेल्मेट घातले असते तर कदाचित त्यांचा जीव वाचला असता. 

परवाने निलंबित करण्याची गरज
बहुतांश दुचाकीस्वार हेल्मेटचा वापर करीत नाहीत. तर काही जण हेल्मेट फक्‍त डोक्‍यात घालतात त्याचा पट्टा बांधत नाहीत. तर काहीजण दुय्यम दर्जाची हेल्मेट वापरतात. दुचाकीवर हेल्मेटचा वापर न करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईसह त्याचे वाहन चालविण्याचे परवाने निलंबित केल्यास हेल्मेटसक्‍ती अमलात येईल आणि त्यासोबतच अनेकांचे प्राण वाचतील. अशीच कारवाई चारचाकी वाहनांमध्ये सीटबेल्ट न बांधणाऱ्यांवर करावी.

अपघाताला चालकच जबाबदार
बहुतांश अपघात हे चालकाच्या चुकीमुळेच होतात. वाहनात तांत्रिक बिघाड होऊन अपघाताचे प्रमाण फारच कमी आहे. यामुळे महामार्ग किंवा शहरात वाहन चालविणाऱ्यांना विशेष प्रशिक्षण देण्याची गरज आहे. मात्र आपल्याकडे प्रशिक्षणाशिवाय वाहन चालविणाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे.

जखमींना वेळेवर उपचार नाही
अपघात झाल्यावर अनेकदा जखमी कित्येकवेळ रस्त्यावर पडून असतो. मात्र नागरिक त्यास रुग्णालयात दाखल करण्यासाठी मदत करीत नाहीत किंवा पोलिसांनाही कळवत नाही. त्यापैकी काहीजण जखमीचे फोटो काढून सोशल मीडियावर टाकतात. जरी पोलिस आले तरी रुग्णवाहिका येण्यास उशीर होतो. अनेकदा गंभीर जखमी रुग्णास वायसीएम रुग्णालयातून ससून रुग्णालयात घेऊन जाण्याचा सल्ला देतात.

वाहन चालविताना मोबाईलवर बोलणे, नशा करणे आणि सिग्नल तोडणे ही अपघाताची प्रमुख कारणे असली, तरी रस्त्यावरील खड्डे आणि अशास्त्रीय गतिरोधक हेदेखील अपघातास कारणीभूत ठरत आहेत. अनेकदा अवजड वाहने रस्त्याच्या कडेला पार्क करतात; पण पार्किंग लाइट लावले जात नाही, त्यामुळेही इतर वाहनांना अंदाज न आल्याने अपघात होतात. तसेच अल्पवयीन मुलांच्या हातात पालकांनी वाहन देऊ नये, त्यामुळे अपघाताची शक्‍यता आहे.
- डी. व्ही. पवार, पोलिस निरीक्षक, निगडी वाहतूक विभाग

अपघाताची प्रमुख कारणे
अतिवेगाने वाहन चालविणे
अंदाज न घेता ओव्हरटेक करणे
नशा करून वाहन चालविणे
मोबाईलवर बोलत वाहन चालविणे
क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी घेणे
मनमानी पद्धतीने वाहन उभे करणे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com