आदर्श शिक्षक पुरस्कार गेले कुठे?

आशा साळवी
मंगळवार, 5 सप्टेंबर 2017

महापालिकेकडून अद्याप घोषणा नाही; शिक्षक दिनाचा मुहूर्त टळला

पिंपरी - शिक्षक दिनानिमित्त दिले जाणारे आदर्श शिक्षक पुरस्कार यंदा शिक्षण विभागाने जाहीर केलेले नाहीत. प्रशासनाच्या अशा ढिम्म कारभारावर शिक्षकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

महापालिकेकडून अद्याप घोषणा नाही; शिक्षक दिनाचा मुहूर्त टळला

पिंपरी - शिक्षक दिनानिमित्त दिले जाणारे आदर्श शिक्षक पुरस्कार यंदा शिक्षण विभागाने जाहीर केलेले नाहीत. प्रशासनाच्या अशा ढिम्म कारभारावर शिक्षकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

पाच सप्टेंबर रोजी शिक्षक दिन साजरा केला जातो. या दिवशी शिक्षकांचा उचित सन्मान केला जातो, तो करण्याचे औचित्य बऱ्याच संस्था दाखवतात. यात जिल्हा परिषद, महापालिका, अनेक बहुउद्देशीय संस्थांचा समावेश असतो. शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या शिक्षकांना दरवर्षी ‘आदर्श शिक्षक’ पुरस्काराने गौरवण्यात येते. स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप असते. दरवर्षी ऑगस्ट महिन्यात शिक्षकांकडून प्रस्ताव मागविले जातात. त्यांची छाननी केल्यावर पाच सप्टेंबरपर्यंत ७०- ८० आदर्श शिक्षकांची यादी जाहीर केली जायची. परंतु, यंदा शिक्षण मंडळ बरखास्त केले. मात्र, शिक्षण समिती स्थापन करण्यास भाजप प्रशासनाला अद्याप मुहूर्त मिळालेला नाही. त्यामुळे आदर्श शिक्षकांकडे सर्वांचेच दुर्लक्ष झाल्यासारखे दिसते. परिणामी प्रशासनाविरोधात शिक्षकवर्गात कमालीची नाराजी पसरली आहे. शिक्षक दिनाच्या पूर्वसंध्येपर्यंत म्हणजेच चार सप्टेंबरच्या सायंकाळपर्यंत आदर्श शिक्षकांची नावे आणि त्यांचा गौरव सोहळा याबाबत काहीही जाहीर झालेले नव्हते. त्यामुळे हा सोहळा होणार की नाही, याबद्दल साशंकता निर्माण झाली आहे.

प्रशासनाने शोधावा आदर्श शिक्षक
शिक्षण विभागाने शिक्षकांच्या सेवा कार्यकालाची माहिती देणारा प्रस्ताव मागविण्यापेक्षा प्रशासनानेच निकषांनुसार दीर्घकाल सेवा केलेल्या शिक्षकांच्या संपूर्ण सेवेचे मूल्यमापन करावे. त्यानंतर आदर्श कामकाज करणाऱ्या शिक्षकाला ‘आदर्श शिक्षक’ म्हणून जाहीर करावे. दरवर्षी पुरस्कार वितरण सोहळ्यात शेवटच्या क्षणापर्यंत आदर्श शिक्षकांची यादी वाढत असते. त्यामुळे खरा आदर्श शिक्षक बाजूला राहतो आणि वशिलेबाज शिक्षक आदर्श ठरतो. हे कुठे तरी थांबले पाहिजे, असे मत अनेक शिक्षकांनी व्यक्त केले. 

गुणवत्ता कुठे?
दरवर्षी ७०- ८० शिक्षकांना ‘आदर्श’ शिक्षक पुरस्काराने गौरविले जाते. महापालिका शाळांमध्ये एवढे आदर्श शिक्षक असतानादेखील गुणवत्ता का ढासळली आहे, असा प्रश्‍न सुज्ञ नागरिकांना पडल्याशिवाय राहत नाही.

आदर्श शिक्षक निवडीबाबत प्रस्ताव मागविण्यास विलंब झाला आहे. आदर्श शिक्षकांसाठी असणारे निकष जिल्हा परिषदेकडून मागविल्यानंतर संबंधित परिपत्रक सर्व शाळांना पाठविण्यात आले. आज या प्रस्तावांचा शेवटचा दिवस आहे.
- बी. एस. आवारी, प्रशासन अधिकारी, शिक्षण विभाग, महापालिका