‘वायसीएम’च रुग्णशय्येवर

संदीप घिसे
शुक्रवार, 8 सप्टेंबर 2017

कोणत्या ना कोणत्या कारणासाठी वायसीएम रुग्णालय नेहमीच चर्चेत असते. या रुग्णालयाचा कारभार सुधारण्यासाठी सत्तारूढ पक्षनेत्यांपासून ते अगदी आयुक्‍तांपर्यंत सर्वांनीच भेटी दिल्या. मात्र, येथील कारभारात काही सुधारणा झाली नाही. याचे प्रमुख कारण म्हणजे डॉक्‍टरांची कमतरता. वैद्यकीय विभागही डॉक्‍टरांची भरती करण्यामध्ये अपयशी ठरला. डॉक्‍टरांअभावी उपचार मिळत नसल्याने नातेवाइकांच्या संयमाचा बांध फुटून डॉक्‍टरांवर हल्ल्यासारखे प्रकार घडत आहेत. वायसीएम रुग्णालयाचा दर्जा दिवसेंदिवस खालावत असल्याने आता रुग्णालयाचा तारणहार कोण होणार, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे, त्याविषयी आजपासून...

पिंपरी - मेडिसीन विभागात एका फिजिशियन डॉक्‍टरच्या देखरेखीखाली ४० रुग्ण असे प्रमाण आवश्‍यक असताना महापालिकेच्या ‘वायसीएम’ रुग्णालयात जवळपास दुप्पट म्हणजे ८० रुग्ण असतात. डॉक्‍टरांच्या एका युनिटमध्ये सातपैकी फक्‍त तीन डॉक्‍टर आहेत. कर्तव्यावरील डॉक्‍टरांवर कामाचा अतिरिक्‍त ताण येतो. रुग्णसंख्येत श्रीमंत असलेले वायसीएम रुग्णालय डॉक्‍टरांच्या संख्येत मात्र अतिशय गरीब असल्याचे दिसून येते. हे रुग्णालय अक्षरशः वाऱ्यावर आहे. 

सर्दी, ताप, खोकला, साथीचे आजार, विषबाधा, सर्पदंश, अपघात, गळफास, अर्धांगवायू, रक्‍तदाब, मधुमेह आदी प्रकारच्या आजारांवर मेडिसीन विभागाकडून उपचार केले जातात. बाह्य रुग्ण विभागात येणाऱ्या रुग्णांची संख्या दररोज ४००च्या आसपास असते. एका डॉक्‍टरांच्या युनिटला आठवड्यातून दोन दिवस बाह्य रुग्ण विभागाचे काम पाहावे लागते, तर रोटेशननुसार रविवारीही तातडीक कक्षात काम करावे लागते. बाह्य विभागातील रुग्णांवर उपचार करून झाल्यावर ॲडमिट असलेल्या रुग्णांवरही उपचार करावे लागतात.

२१ पैकी फक्‍त नऊ डॉक्‍टर
पुण्यातील ससून रुग्णालयातील मेडिसीन विभागातही रुग्णांची संख्या जवळपास वायसीएमसारखीच आहे. मात्र, तिथे सात दिवसांकरिता सात युनिट असून डॉक्‍टरांची संख्याही पुरेशी आहे. वायसीएम रुग्णालयात दोन वर्षांपूर्वी आंतररुग्ण विभागातील मेडिसीनच्या प्रत्येक युनिटमधील खाटांमध्ये २०ने वाढ करीत खाटांची संख्या ६० करण्यात आली. यामुळे रुग्णांची संख्या १८० असणे गरजेचे होते. मात्र, प्रत्यक्षात तीन युनिटचे मिळून २४० रुग्ण उपचार घेत आहेत. एका युनिटमध्ये तीन निवासी आणि तीन हाउसमन, एक रजिस्ट्रार अशी एकूण सात डॉक्‍टरांची आवश्‍यकता असते. आत्तापर्यंत एका युनिटमध्ये एक किंवा दोनच डॉक्‍टर्स असत. गेल्या आठवड्यातच तीन युनिटकरिता प्रत्येकी तीन डॉक्‍टर दिले आहेत. आता २१ पैकी नऊ डॉक्‍टर उपलब्ध झाले आहेत. मात्र तीनही युनिटमध्ये एकही वरिष्ठ डॉक्‍टर म्हणजे रजिस्ट्रार नाही.

फिजिशियनचाही स्वेच्छा निवृत्तीसाठी अर्ज
एकीकडे डॉक्‍टरांची संख्या कमी असल्याने डॉक्‍टरांवर ताण येतो, तर दुसरीकडे जादा काम आणि मानसिक त्रास यामुळे वायसीएम रुग्णालयातील महापालिकेच्या पे रोलवर असलेले एकमेव फिजिशियन डॉ. किशोर खिलारी यांनी स्वेच्छा निवृत्तीकरिता अर्ज केला आहे. २००५ मध्ये पाच लाख लोकसंख्या असताना वायसीएममध्ये मेडिसीनचे तीन युनिट होते. आज शहराची लोकसंख्या २० लाखांपेक्षा अधिक असताना आजही मेडिसीन विभागाचे युनिट मात्र तीनच राहिले आहेत. यामुळे वॉर्डमध्ये ॲडमिट असलेल्या रुग्णांकडे डॉक्‍टर पुरेसे लक्ष देत नसल्याची रुग्णांची तक्रार असते. यामुळे नातेवाइकांच्या रोषाला येथील कर्मचाऱ्यांना सामोरे जावे लागते.

Web Title: pimpri pune news YCM Hospital