प्लास्टिक मुक्त अभियान व कचरा निर्मूलनाची संकल्पना यशस्वीपणे राबविण्याचा निर्धार

अर्जुन शिंदे
मंगळवार, 3 एप्रिल 2018

आळेफाटा (पुणे) : आळेफाटा (ता. जुन्नर) येथे सोमवारी (ता. २) सायंकाळी परिसरातील आळे, वडगाव आनंद, संतवाडी व कोळवाडी ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, आळेफाटा व्यापारी असोसिएशन, रोटरी क्लब ऑफ आळेफाटा (मेन), व्यापारी वर्ग व नागरिकांच्या आयोजित विशेष बैठकीत प्लास्टिक मुक्त अभियान व कचरा निर्मूलनाची संकल्पना यशस्वीपणे राबविण्याचा निर्धार करण्यात आला.

आळेफाटा (पुणे) : आळेफाटा (ता. जुन्नर) येथे सोमवारी (ता. २) सायंकाळी परिसरातील आळे, वडगाव आनंद, संतवाडी व कोळवाडी ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, आळेफाटा व्यापारी असोसिएशन, रोटरी क्लब ऑफ आळेफाटा (मेन), व्यापारी वर्ग व नागरिकांच्या आयोजित विशेष बैठकीत प्लास्टिक मुक्त अभियान व कचरा निर्मूलनाची संकल्पना यशस्वीपणे राबविण्याचा निर्धार करण्यात आला.

आळेफाटा येथे सावतामाळी मंदिर सभागृहात  ही विशेष बैठक झाली. याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य शरद लेंडे, पंचायत समिती सदस्य जीवन शिंदे, वडगाव आनंद गावचे सरपंच शशिकांत लाड, उपसरपंच संतोष चौगुले, आळे गावचे उपसरपंच मीननाथ शिंदे, आळेफाटा व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष सुधीर नरवडे, रोटरी क्लबचे अध्यक्ष विमलेश गांधी, ग्रामपंचायत सदस्य डी. बी. वाळुंज, निलेश शिंदे, उदय पा. भुजबळ, समीर देवकर, सोमनाथ गडगे, दत्तात्रेय गडगे, अशोकशेठ गडगे, संतोष कोठारी, बाळासाहेब भंडारी, आळेफाटा पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्योती डमाळे, सुंदरताई कुऱ्हाडे, सुनीता वाव्हळ, मीना भुजबळ, तनिष्का महिला व्यासपीठाच्या अध्यक्षा वृषाली नरवडे आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी प्लास्टिक ग्लास व थर्माकोलची पत्रावळ त्वरित बंद करणे, भाजीमंडईत कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांच्या वापर बंद करणे,   महिला बचत गटांच्या माध्यमातून प्लस्टिकमुक्त अभियानाविषयी जनजागृती करणे, रोटरी क्लबच्या माध्यमातून प्लास्टिक मुक्त अभियानांतर्गत सागरमित्र उपक्रम राबविणे आदी निर्णय घेण्यात आले. तसेच सर्व उपस्थित पदाधिकाऱ्यांनी भाजी मंडईत फिरून व्यापाऱ्यांना विनंती करत प्लास्टिक पिशव्यांचा वापर तात्काळ बंद करण्याचे आवाहन केले. आळेफाटा परिसरातील आळे व वडगाव आनंद ग्रामपंचायत हद्दीत कचऱ्याची समस्या  तीव्रतेने भेडसावत असल्याच्या पार्श्वभूमीवर प्लास्टिक बंदी हीच कचरानिर्मूलनाची संधी मानून हा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी एकत्रितपणे नियोजनपूर्वक प्रयत्न करण्याचा निर्धार करण्यात आला.

प्लास्टिक पिशव्यांचा वापर बंद होण्यासाठी जनजागृती बरोबरच पर्यावरणपूरक पर्यायी व्यवस्थाही व्हायला हवी. कचऱ्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी परिसरातील सर्व ग्रामपंचायतींनी समन्वय ठेवून सर्वसमावेशक धोरण आखण्याची गरज आहे, असे उपसरपंच  मिननाथ शिंदे यांनी सांगितले. 

प्लास्टिकमुक्त अभियान व कचऱ्याचा प्रश्न सोडविण्यासाठी वडगाव आनंद व आळे ग्रामपंचायत एकत्र आल्या तर परिसराचा कायापालट होईल, असे पंचायत समिती सदस्य जीवन शिंदे यांनी सांगितले. 

कचऱ्याच्या समस्येमुळे महिला वर्ग त्रस्त असून, सर्वांनी एकत्रित येऊन यावर मार्ग काढायला हवा, असे ग्रामपंचायत वडगाव आनंदचे सदस्य डी. बी. वाळुंज यांनी सांगितले. 

प्लास्टिकवर प्रक्रिया (रिसायकलिंग) करण्यासाठी स्थानिक ग्रामपंचायतींनी पुढाकार घ्यावा, सर्वांनी स्वतःपासून सुरुवात केली तर स्वच्छ व सुंदर आळेफाटा ही संकल्पना यशस्वी होऊ शकेल, असे रोटरी क्लब ऑफ आळेफाटाचे अध्यक्ष विमलेश गांधी यांनी सांगितले.

Web Title: plastic free waste management meeting rotary club