पहिल्या पावसात दोन कोटी बुडाले 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 7 जून 2018

पुणे - पहिल्या पूर्वमोसमी पावसामुळे रस्त्यांवर प्रचंड पाणी साचल्याने नागरिक आणि वाहनचालकांना बुधवारी अक्षरशः रस्ते शोधावे लागले. पावसाळी गटारे तुंबल्याने उपनगरांमधील घरांमध्ये पाणी शिरण्याची "परंपरा' यंदाही कायम राहिल्याचे चित्र पाहायला मिळाले. महापालिकेने पावसाळी कामे खरेच केली आहेत का, असा प्रश्‍नही उभा ठाकला आहे. ती केली असतील, तर त्यावरील साधारणतः दोन कोटींचा खर्च या पावसात "बुडाला' असेच म्हणावे लागेल. 

पावसाचे पाणी वाहून नेण्यासाठी गटारांसह ओढे- नाल्यांच्या साफसफाईवर महापालिकेने गेल्या दीड वर्षात सुमारे दोन कोटी रुपये खर्च केल्याचा हिशेब मांडला आहे. पावसाळी कामे यंदा 31 मेपर्यंत केल्याचा दावा महापालिका प्रशासनाने गेल्याच आठवड्यात केला. पण, बुधवारी झालेल्या पावसाने सर्वत्र जी परिस्थिती निर्माण झाली, त्यामुळे प्रशासनाच्या कारभाराचे पितळ उघडे पडले. 

पावसाळ्याआधी खबरदारीचा उपाय म्हणून दरवर्षी रस्त्यांसह पावसाळी गटारे, नाले-ओढ्यांची दुरुस्ती आणि सफाई केली जाते. त्याकरिता लाखो रुपयांची तरतूद करण्यात येते. साधारणतः दोन वर्षांपूर्वी झालेल्या अवेळी पावसामुळे संपूर्ण शहरातील रस्त्यांवर पाणी साचले होते. तेव्हा पावसाचे पाणी वाहून नेणारी यंत्रणा नसल्याची कबुली प्रशासनाने दिली. त्यामुळे गेल्या दीड वर्षात तब्बल 98 लाख रुपयांची तरतूद करून नाले-ओढ्यांची कामे केली. त्यानंतर यंदाही पुरेशी तरतूद करून, ही कामे केल्याचा दावा अतिरिक्त आयुक्त शीतल उगले यांनी केला. उर्वरित कामे 5 मेपर्यंत संपविण्यात येतील, असे त्यांनी जाहीर केले होते. ही मुदत संपून चोवीस तास झाले नसतानाही बुधवारी सायंकाळी पावसामुळे बहुतांशी भागांतील रस्ते पाण्यात गायब झाल्याची स्थिती निर्माण झाली. त्यातच सांडपाणी वाहिन्यांची झाकणे निघाल्याने त्यातील पाणी रस्त्यावर आले. त्यामुळे नागरिक आणि वाहनचालकांना पाण्यातून वाट काढावी लागली. रस्ता आणि झाकणांचा अंदाज येत नसल्याने अपघातही घडले. पावसाळी गटारांमध्ये प्रचंड गाळ असल्याने तेथून पाणी वाहून गेले नाही. त्यामुळे रस्त्यांवरील सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचले. 

उपनगरांमधील घरांमध्ये पाणी 
वडगावशेरी, धानोरी, कळस परिसरातील घरांमध्ये पावसाचे पाणी शिरले, त्यामुळे येथील रहिवाशांचे हाल झाले. गेली अनेक वर्षे या भागात पावसाचे पाणी शिरत असल्याच्या घटना घडत आहेत. त्यासाठी लाखो रुपयांची कामे केल्याचे प्रशासनाकडून सांगितले जाते, तरीही या भागात अजूनही पाणी शिरत असल्याचे बुधवारी स्पष्ट झाले. 

Web Title: PMC Two million gone in the first rain