पीएमपीचे खासगीकरण नको!

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 16 जुलै 2018

पुणे - पीएमपीच्या तीन मार्गांचे खासगीकरण करण्याच्या फोर्स मोटार्स कंपनीच्या प्रस्तावाला पुणेकरांनी सोशल मीडियावर विरोध दर्शविला आहे. या बाबत ई-सकाळ, फेसबुक आणि ट्‌विटरवर झालेल्या मतदानात दोन हजारांहून अधिक पुणेकरांनी भाग घेतला. त्यातील सरासरी ६९ टक्के जणांनी खासगीकरणाच्या विरोधात मतदान केले आहे. 

कोथरूड-पुणे स्टेशन, कोथरूड-स्वारगेट आणि वडगाव शेरी-पुणे स्टेशन या मार्गांवर तीन महिन्यांसाठी प्रायोगिक तत्त्वावर प्रवासी वाहतूक करण्याचा प्रस्ताव ‘फोर्स’ने भाजपचे शहराध्यक्ष योगेश गोगावले यांच्यामार्फत सादर केला आहे. त्या बाबत महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दोन वेळा बैठक आयोजित केली होती; परंतु प्रस्तावाच्या अटींमध्ये बदल केला पाहिजे, अशी भूमिका पीएमपीने घेतली आहे. या पार्श्‍वभूमीवर या प्रस्तावाचे अंतरंग ‘सकाळ’ने उलगडून पुणेकरांसमोर ठेवले. तसेच ई- सकाळ, फेसबुकचे ई- सकाळ पेज व ट्‌विटरच्या सकाळच्या अकाउंटवर याबाबत मतदान करण्याचे आवाहन केले होते. 

पीएमपीच्या मार्गांचे खासगीकरण करू नये, असे मतदानात भाग घेतलेल्या सरासरी ६९ टक्के पुणेकरांनी म्हटले आहे. तर सरासरी ३१ टक्के जणांनी खासगीकरण करण्यास हरकत नसल्याचे म्हटले आहे. दोनशेहून अधिक पुणेकरांनी प्रतिक्रिया व्यक्त करून मार्गांच्या खासगीकरणास विरोध दर्शविला आहे. 

संघटनांचाही विरोध
शहरातील विविध स्वयंसेवी संस्था, वाहतूक तज्ज्ञ, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस पक्षानेही या प्रस्तावाला विरोध केला आहे. आता पीएमपी नेमकी काय भूमिका घेणार, याकडे प्रवाशांचे लक्ष लागले आहे. ‘सकाळ’च्या ‘फेसबुक लाईव्ह’मध्ये गोगावले यांनी त्यांची भूमिका, तर प्रवाशांच्या वतीने पीएमपी प्रवासी मंचचे संजय शितोळे आणि सार्वजनिक वाहतुकीच्या अभ्यासिका प्रांजली देशपांडे यांनी विरोध दर्शविला आहे. 

Web Title: PMP not privatization