पोलिस भुर्रर्रऽ चौकीत हुर्ऱ्येऽऽ

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 25 मे 2018

पुणे  - सरकारी दवाखान्यात गेल्यानंतर तेथे डॉक्‍टर नव्हते किंवा तलाठी कार्यालयात हेलपाटे मारूनही तलाठ्याचे दर्शन झाले नाही, अशा तक्रारी यापूर्वी तुम्ही ऐकलेल्या असतील. मात्र, यापुढे पोलिस चौकीत पोलिसच आढळले नाहीत, अशी कोणी तक्रार केल्यास आश्‍चर्य वाटून घेऊ नका. खरंच असा प्रकार वारजे माळवाडी पोलिस ठाण्याअंतर्गत असलेल्या रामनगर पोलिस चौकीत बुधवारी रात्री घडला. भांडणाची तक्रार नोंदवण्यासाठी गेलेल्या व्यक्तींना चौकीत कोणी पोलिसच आढळले नाहीत. बराच वेळ त्यांनी वाट पाहिली; पण तिकडे कोणी फिरकलेच नाही. त्यामुळे त्यांनी चौकीत तोडफोड केली.

सध्या ऑनलाइनचा जमाना आहे. तक्रारीसुद्धा ऑनलाइनच घेतल्या जात आहेत. "तुम्ही पोलिस ठाण्याची पायरी चढण्याची गरज नाही, आपली तक्रार व्हॉट्‌सऍपवर करा,' असे आवाहन पोलिसांतर्फे करण्यात येत आहे. त्यामुळे लोकच येणार नसतील, तर पोलिसांची चौकीत थांबण्याची गरज काय? असा समज तर पोलिसांचा झाला नाही ना, अशी शंका घेण्यात येत आहे.

अनेक बहुराष्ट्रीय, तसेच आयटी कंपन्यांचे कर्मचारी दररोज ऑफिसमध्ये न जाता घरूनच कामकाज करतात. प्रवासातील वेळ वाचवणे, वाहतूक कोंडीपासून सुटका व्हावी, हे त्या मागील मुख्य कारण असते. या पार्श्‍वभूमीवर पोलिस खात्यातही असा प्रकार सुरू झाला काय? अशी चर्चा आहे.

सध्या गुगल मॅप व सीसीटीव्ही कॅमेरा या अत्याधुनिक तंत्राच्या साह्याने गुन्हेगारांना पकडण्यावर भर देण्यात येत आहे. त्यामुळे पारंपरिक पद्धतीने पोलिस चौकीत उपस्थित राहण्यापेक्षा तंत्रज्ञानाचा वापर करून "अलर्ट' राहण्यावर पोलिसांकडून भर दिला आहे का, अशीही शक्‍यता आहे. अधिकारी ड्यूटी लावण्यास विसरले की, पोलिसच ड्यूटी विसरले, असेही प्रश्‍न उपस्थित केले जात आहेत.

मात्र, चौकीत पोलिस नसण्याचा सर्वसामान्यांबरोबरच चोरांनाही फटका बसण्याची शक्‍यता आहे. नागरिकांनी पाठलाग केल्यानंतर चोर प्रथम पोलिस चौकी गाठत असतो. त्याला ही जागा सुरक्षित वाटत असते. मात्र, तिथे पोलिसच नसतील, तर नागरिकांच्या तावडीत ते आयतेच सापडणार व आणखी फटके त्याला खावे लागणार. त्यामुळे या प्रकाराने चोरांचेही धाबे दणाणले आहेत.

पोलिस निरीक्षक बाजीराव मोळे म्हणाले, 'सध्या आमच्याकडे अपुरे मनुष्यबळ आहे. त्यातच बंदोबस्त व तपासासाठी कर्मचाऱ्यांची नियुक्ती
केल्याने चौकीत पोलिस नव्हते.''
चौकट

अधिकारी रजेवर; फोनही बंद
या संदर्भात रामनगर पोलिस चौकीतील एका अधिकाऱ्याशी संपर्क साधला असता, "मी पंधरा दिवसांपासून रजेवर होतो. आजच आलो आहे. त्यामुळे मला काही माहिती नाही,' असे सांगितले. तर, दुसऱ्याने, "परवापासून मी दुसऱ्या ड्युटीवर असल्याने चौकीत काय घडले, याची मला माहिती नाही,' असे सांगितले. दरम्यान, तांत्रिक कारणांमुळे पोलिस चौकीवरील फोनही बंद असल्याचे या अधिकाऱ्यांनी सांगितले.

Web Title: police