पुतळा हटविल्यानंतर संभाजी उद्यान नागरिकांना बंद

अमित गोळवलकर/संतोष धायबर
मंगळवार, 3 जानेवारी 2017

आमदार निलम गोऱहे म्हणाल्याः गडकरींबद्दल मराठी माणसाला आदर आहे. त्यांच्या साहित्याने मराठीला मोठे योगदान दिले आहे. सावित्रीबाई फुलेंच्या जन्मदिनीच गडकरींचा पुतळा हटविला जातो, हे दुर्देव आहे. मोघलांनी पुण्यावर गाढवाचा नांगर फिरवला होता. त्यांची औलादच पुतळा हटविण्यासारखे कृत्य करू शकते.

पुणेः 'मोघलांनी पुण्यावर गाढवाचा नांगर फिरवला होता. गाढवाची औलादच राम गणेश गडकरींचा पुतळा संभाजी उद्यानातून हटविण्यासारखे कृत्य करू शकते,' अशी जहाल टीका शिवसेनेने आज (मंगळवार) केली. 

कवि राम गणेश गडकरी यांचा पुतळा हटविल्यानंतर पुणे पोलिसांनी संभाजी उद्यानात नागरीकांना प्रवेश बंद केला आहे. सकाळपासून उद्यानाच्या दारात पोलिस बंदोबस्त ठेवला आहे. 

उद्यानाच्या दारात सकाळपासून शांतता होती; मात्र दुपारपासून गर्दी वाढू लागली आहे. नाट्य परिषदेची पुणे शाखा, महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेच्यावतीने उद्यानाच्या दारात दुपारी निषेध सभा घेण्यात आली. त्याचवेळी तेथे शिवसेनेच्या आमदार निलम गोऱहे यांनी भेट दिली आणि पुतळा हटविण्याच्या घटनेचा निषेध केला. 

'गडकरींबद्दल मराठी माणसाला आदर आहे. त्यांच्या साहित्याने मराठीला मोठे योगदान दिले आहे. सावित्रीबाई फुलेंच्या जन्मदिनीच गडकरींचा पुतळा हटविला जातो, हे दुर्देव आहे. मोघलांनी पुण्यावर गाढवाचा नांगर फिरवला होता. त्यांची औलादच पुतळा हटविण्यासारखे कृत्य करू शकते,' अशी टीका गोऱहे यांनी केली. 

जंगली महाराज रस्त्यावर पुणे महापालिकेचे संभाजी उद्यान आहे. या उद्यानात राम गणेश गडकरींचा पुतळा 23 जानेवारी 1962 मध्ये आचार्य अत्रे यांच्या हस्ते बसविला होता. 

'संभाजी ब्रिगेड'च्या 10 ते 15 कार्यकर्त्यांनी पुतळा हटवून शेजारच्या मुठा नदीत फेकून दिला. या घटनेचे पडसाद उमटू नयेत, म्हणून पोलिसांनी सकाळीच उद्यानाची नाकेबंदी केली. उद्यानात नागरीकांना प्रवेश बंद केला. 

दुपारी पावणे दोन वाजता उद्यानाच्या प्रवेशद्वारावर पोलिस बंदोबस्त होता. जंगली महाराज रस्त्यावरील वाहतूक सकाळपासून सुरळित सुरू होती; मात्र बघ्यांची उद्यानासमोर गर्दी होत होती. एरव्ही दुपारच्या वेळीही उद्यानात तुरळक का असेना नागरीकांची, पर्यटकांची गर्दी असते. आजच्या घटनेनंतर उद्यानात केवळ काही पोलिस होते.  

जंगली महाराज रस्त्यावरील महाविद्यालयांतील विद्यार्थी दुपारच्या वेळेत जेवणासाठी संभाजी उद्यानात येतात. या विद्यार्थ्यांची उद्यान बंद असल्याने मोठी अडचण झाली. 'हॉटेलमध्ये बसून जेवणे परवडत नाही. कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये बसायला जागा नसते. मेसचा डबा आहे, कुठे खावू?', असा वाद घालताना काही विद्यार्थी-विद्यार्थिनी पोलिसांशी घालत होते. पोलिसांनी त्यांची कशीबशी समजूत काढली आणि त्यांना परत पाठविले. 

दुपारी गर्दी वाढू लागली, तसतशी जंगली महाराज रस्त्यावर वाहतुकीची कोंडी होऊ लागली आहे. किरकोळ अपघाताच्या प्रसंगात एका तरूणाला पोलिसांसमोरच भर रस्त्यावर मारहाण झाली. निषेध सभांच्या बंदोबस्तात असलेल्या पोलिसांनी मारहाणीच्या प्रकाराकडे दुर्लक्ष केले.

Web Title: police restrict entry in sambhaji park