प्रदूषण कमी करण्याचा श्रीगणेशा

E-Bus
E-Bus

पुणे - शहर आणि पिंपरी- चिंचवडमधील वाहतूक समस्या सोडविण्यासाठी आणि प्रदूषण कमी करण्यासाठी वातानुकूल (एसी) ई- बस भाडेतत्त्वावर घेण्याच्या बहुचर्चित निर्णयाची अंमलबजावणी गणेशोत्सवाचे औचित्य साधत अखेर मंगळवारी सुरू झाली. ५०० ई- बस खरेदी करण्यासाठी संचालक मंडळाने मंजुरी दिली असून, पहिल्या टप्प्यात १५० बस भाडेतत्त्वावर घेण्यात येणार आहेत. 

पीएमपीच्या ताफ्यात जुन्या बसची संख्या मोठी झाली आहे. त्यामुळे ब्रेकडाउनची संख्याही दररोज सुमारे १२५च्या आसपास पोचली आहे. शहर आणि पिंपरी- चिंचवडमधील सुमारे ५५ लाख लोकसंख्येसाठी सध्या फक्त १४५० बस सरासरी रस्त्यावर धावत आहेत. या पार्श्‍वभूमीवर ई - बस भाडेतत्त्वावर घेण्यासाठी निविदा मंगळवारी प्रसिद्ध झाल्या, अशी माहिती पीएमपीच्या अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक नयना गुंडे व संचालक सिद्धार्थ शिरोळे यांनी दिली. निविदा सादर करण्याची मुदत ९ ऑक्‍टोबर आहे. १५० पैकी सुमारे २५ बस जानेवारीमध्ये रस्त्यावर धावतील, तर पुढील सहा महिन्यांत १५० बस पीएमपीच्या ताफ्यात दाखल होतील, अशी अपेक्षा गुंडे यांनी व्यक्त केली आहे. २५ बस नऊ मीटर लांबीच्या आणि १२५ बस १२ लांबीच्या असतील. 

४०० बस अल्पावधीतच
पुणे आणि पिंपरी- चिंचवड महापालिकेच्या आर्थिक तरतुदीतून सीएनजीवर धावणाऱ्या ४०० बस विकत घेण्याच्या निविदेला तिसऱ्यांदा मुदतवाढ देण्यात आली आहे. या पूर्वीच्या निविदांना अल्प प्रतिसाद मिळाला होता. त्यामुळे त्यांची मुदत वाढविण्यात आली आहे. २४ सप्टेंबर रोजी ती संपेल. त्यानंतर सीएनजीवरील बस खरेदीसाठीची प्रक्रिया तातडीने सुरू होणार आहे. त्यामुळे अल्पावधीतच या बसही टप्प्याटप्प्याने पीएमपीच्या ताफ्यात दाखल होतील. 

महत्त्वाची वैशिष्ट्ये
 प्रदूषण नियंत्रणासाठी ई- बस उपयुक्त ठरणार 
 सध्याच्याच भाडेदरात प्रवाशांना ई- बसची सेवा मिळणार 
 शहर आणि पिंपरी- चिंचवडमधील वर्दळीच्या मार्गांवर प्राधान्याने ई- बस
 देशात सर्वाधिक ई बस पीएमपीमध्ये दाखल होणार

नव्या बस येऊनही संख्या कमीच पडणार!
दोन्ही महापालिकांत राष्ट्रवादी काँग्रेस - काँग्रेस सत्तेवर असताना सप्टेंबर २०१६ मध्ये १५५० बसची खरेदी करण्याचा निर्णय जाहीर केला होता. प्रत्यक्षात गेल्या दोन वर्षांत दोन्ही महापालिकांच्या निधीतून २०० मिडी बस आल्या आहेत. तर राज्य सरकारने दिलेल्या निधीतून महिलांसाठी ३० तेजस्विनी बस आल्या आहेत. दोन्ही शहरांमधील लोकसंख्या विचारात घेतल्यास पीएमपीच्या ताफ्यात किमान ३००० बस अपेक्षित आहेत. प्रत्यक्षात सध्या १४५० बस उपलब्ध आहेत. सहा महिन्यानंतरही पीएमपीच्या ताफ्यात ५५० बस दाखल झाल्या, तरी आयुर्मान संपल्यामुळे सुमारे ४०० बस बाद कराव्या लागणार आहेत. त्यामुळे नव्या बस आल्या तरीही बस संख्या कमी पडण्याची चिन्हे आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com