सातारा रस्ता खड्ड्यात

सातारा रस्ता खड्ड्यात

खेड-शिवापूर - पावसामुळे पुणे-सातारा रस्त्यावर खड्डे पडून रस्त्याची चाळण झाली आहे. अनेक ठिकाणी या खड्ड्यांमुळे अपघात होत असल्याने हे खड्डे जीवघेणे झाले आहेत. या परिस्थितीत रस्त्याचे काम ठप्प असून, रिलायन्स इन्फ्रा खड्डे बुजविण्याची जबाबदारी पेट्रोलिंग पथकावर ढकलत आहे.

गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने पुणे-सातारा रस्त्यावर खड्डे पडले आहेत. शिंदेवाडी ते सारोळा या दरम्यानच्या रस्त्यावर खड्डेच खड्डे झाले आहेत. या खड्ड्यांत दुचाकी वाहने आदळून अपघात होण्याचे प्रमाण गेल्या काही दिवसांत वाढले आहे. शनिवारी रात्री जांभूळवाडी दरी पुलावर पडलेल्या एका खड्ड्यांमुळे सुमारे पाच चारचाकी वाहनांचे टायर फुटले. खेड-शिवापूर येथे हॉटेल चंद्रमयसमोरील रस्त्यावर पडलेल्या मोठ्या खड्ड्यात दुचाकी वाहने आदळून सुमारे दहा अपघात झाले आहेत. शनिवारी रात्री या खड्ड्यात दुचाकी घसरून एक जोडपे गंभीर जखमी झाले आहे. दर्गा चौकातही मोठे खड्डे पडले आहेत. टोलनाका परिसरात तसेच वरवे आणि शिवरे येथील सेवा रस्त्यावर खड्ड्यांची चाळण झाली आहे. रस्त्यावर पडलेल्या या खड्ड्यांमुळे प्रवासी त्रस्त झाले आहेत. अशा परिस्थितीत रिलायन्स इन्फ्राने हे खड्डे ताबडतोब बुजविणे गरजेचे आहे. सेवा रस्ता आणि मुख्य रस्ता या दोन्ही रस्त्यावर खड्डे पडले आहेत. मुळात रिलायन्स इन्फ्राने अतिशय निकृष्ट पद्धतीचे डांबरीकरण केल्याने रस्त्यावर खड्डे पडले असल्याचे मत प्रवासी व्यक्त करत आहेत.

जबाबदारीबाबत ढकलाढकली
गेल्या एक महिन्यापासून रिलायन्स इन्फ्राने या रस्त्याचे काम पूर्णपणे थांबले आहे. त्यामुळे रिलायन्स इन्फ्रा रस्त्यावर पडलेले हे खड्डे बुजविण्याची जबाबदारी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या पेट्रोलिंग पथकावर ढकलत आहे. आम्हाला जेवढे शक्‍य आहे, तेवढ्या उपाययोजना आम्ही करत आहोत. मात्र हे खड्डे बुजविण्याची जबाबदारी रिलायन्स इन्फ्रा कंपनीच्या बांधकाम विभागाची असल्याचे पेट्रोलिंग पथकाचे म्हणणे आहे. रिलायन्स इन्फ्रा आणि पेट्रोलिंग पथकाच्या या वादात प्रवाशांचे हाल होत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com