रथी-महारथींनी थोपटले दंड

रथी-महारथींनी थोपटले दंड

पुणे - हातातील घड्याळ काढून आता हाती शिवसेनेचा भगवा झेंडा घेतलेले नगरसेवक शिवलाल भोसले आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी सभागृहनेते सुभाष जगताप या दोन विद्यमान नगरसेवकांनी निवडणुकीच्या ‘दंगली’त एकमेकांच्या विरोधात दंड थोपटले आहेत; पण ‘दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ’ ही म्हण समोर ठेवून भाजपचे महेश वाबळे आणि मनसेचे कुशल शिंदे यांनीही प्रचाराला जोरदार सुरवात करून आपणही कसलेले ‘मल्ल’ असल्याचे दाखवून द्यायला सुरवात केली आहे. त्यामुळे सहकारनगर-पद्मावती या प्रभागातील (क्र. ३५) लढत चौरंगी होणार असल्याचे चित्र तयार झाले आहे.

प्रभागातील ‘ड’ या खुल्या गटातील विद्यमान नगरसेवक ‘आम्ही हे करून दाखवले’, अशा भाषेत प्रचार करत आहेत; तर नगरसेवक होऊ इच्छिणाऱ्या इतर उमेदवारांनी प्रभागातील कचरा, झोपडपट्टी, खड्डे, भटकी कुत्री या समस्यांना पुढे आणत ‘लोकांना आता बदल हवाय’ असा प्रचार सुरू केला आहे. त्यामुळे या प्रभागातील लढत रंगतदार ठरू लागली आहे; पण मतदार राजा कोणाच्या बाजूने कौल देणार, हे पाहणे औत्सुक्‍याचे ठरणार आहे. ‘क’ या महिला सर्वसाधारण गटात स्थायी समितीचे अध्यक्षपद भूषविलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या विद्यमान नगरसेविका अश्‍विनी कदम यांच्याविरोधात माजी नगरसेवक संजय नांदे यांची भावजय असलेल्या भाजपच्या संध्या प्रदीप नांदे, शिवसेनेच्या श्रुती नाझिरकर, मनसेच्या भावना वाघमारे उभ्या आहेत, तर ‘ब’ या मागासप्रवर्ग राखीव गटात माजी उपमहापौर आबा बागूल यांच्या विरोधात भाजपचे हरीश परदेशी, शिवसेनेचे ज्ञानेश्‍वर दारवटकर, मनसेचे रूपेश तुरे अशी लढत होणार आहे. ‘अ’ या अनुसूचित जाती महिला गटात सुभाष जगताप यांच्या भावी स्नुषा मेघा भिसे या राष्ट्रवादी काँग्रेसकडून, भाजपच्या दिशा राहुल माने आणि शिवसेनेच्या पूजा देडे या एकमेकांच्या विरोधात उभ्या आहेत.

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात ज्या तीस जागांवर आघाडी झाली आहे, त्यात हा प्रभाग येतो. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेसचे उमेदवार या भागात एकत्र प्रचार करत आहेत. बागूल, कदम, जगताप यांच्यातील मतभेद अनेकांना माहिती आहेत; पण ‘लढाई’त सर्व काही माफ असते, असे म्हणत ते आता एकत्र आले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या ताब्यात असलेला हा प्रभाग स्वत:कडेच राखून ठेवण्यात या विद्यमान नगरसेवकांना आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना यश मिळणार की येथे नव्या लोकांना संधी मिळणार, हे लवकरच स्पष्ट होईल. 

या प्रभागात सुभाष जगताप आणि उषा जगताप यांचा पूर्ण प्रभाग, बागूल आणि कदम यांच्या जुन्या प्रभागातील बहुतांश भाग, भोसले आणि भाजपच्या नगरसेविका वर्षा तापकीर यांच्या जुन्या प्रभागाचा निम्मा भाग, नव्या प्रभागाला जोडण्यात आला आहे. त्यामुळे ६० टक्के सोसायट्या आणि ४० टक्के वस्तीचा भाग या प्रभागात येतो. त्यांच्यापर्यंत पोचण्यासाठी उमेदवार कोपरा सभा, प्रत्यक्ष गाठीभेटी, सभा, प्रचार फेरी घेताना दिसत आहेत. त्यामुळे प्रभागातील ‘माहोल’ निवडणुकीच्या रंगात न्हाऊन निघाला आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com