रामायणाचा कालखंड  खिस्तपूर्व 12 हजार वर्षांचा 

Ram navami
Ram navami

खगोलशास्त्रीय व ऋतूसंदर्भातील वर्णनानुसार नव्या संशोधनाचा निष्कर्ष 

पुणे : ख्रिस्तपूर्व 29 नोव्हेंबर 12240... वाल्मीकी रामायणातील वर्णनानुसार काढलेला रामजन्माचा अचूक दिनांक! रामायणातील खगोलशास्त्रीय, तसेच कालक्रमणा आणि ऋतूसंदर्भातील वर्णनांनुसार रामायणाचा काळ तब्बल ख्रिस्तपूर्व बारा हजार वर्षांपूर्वीचा असल्याचे संशोधन पुढे आले आहे. हे संशोधन केले आहे ते सध्या अमेरिकेतील ऍटलांटा येथे वास्तव्यास असलेल्या आणि व्यवसायाने केमिकल इंजिनिअर असलेल्या नीलेश ओक यांनी! 


""देशवासीयांच्या मनावर गेली अनेक सहस्रके राज्य करणाऱ्या रामायणात वर्णिलेल्या खगोलशास्त्रीय, तसेच कालक्रमणेशी संबंधित आणि ऋतूसंदर्भातील वर्णनांप्रमाणे ख्रिस्तपूर्व बारा हजार वर्षांपूर्वीच रामायण घडल्याचे स्पष्ट होते,'' असा सिद्धांत ओक यांनी मांडला आहे. युद्धकांड, अयोध्याकांड, किष्किंधाकांड आणि अरण्यकांडांमध्ये यासंबंधीचे उल्लेख आढळत असल्याचे ओक यांनी दाखवून दिले आहे. 
ओक यांनी वाल्मीकी रामायणातील 575 संदर्भ शोधून काढले. रामायण केव्हा घडले? यासंबंधी सर्वसामान्यांच्या मनात कमालीची उत्सुकता असते. संशोधकांनीही यावर संशोधनही केले आहे. पण घटना जेवढी प्राचीन तितकीच त्याबद्दलच्या पुराव्यांविषयी खातरजमा करावी लागतेच. या कुतूहलापोटी ओक यांनी रामायणासंबंधी संशोधन करायचे ठरविले. वाल्मीकी रामायणातील युद्ध कांडातील वर्णनानुसार स्थिर झालेल्या ब्रह्मर्षी या ताऱ्याभोवती सप्तर्षी प्रदक्षिणा घालीत आहेत. म्हणजेच ख्रिस्तपूर्व बारा हजार वर्षापूर्वी ब्रह्मर्षि म्हणजेच अभिजित हा तारा ध्रुवतारा झाला होता. तर सध्या मार्च, एप्रिलदरम्यान चैत्र शुद्ध नवमी येते आणि या वेळी वसंत ऋतू असतो. मात्र अयोध्याकांडातील वर्णनाप्रमाणे त्या वेळी वने आणि अरण्ये फुलांनी बहरलेली होती, असा दावा त्यांनी केला. 


""वाल्मीकी रामायणाच्या चार खगोलशास्त्रीय पुराव्यांच्या निरीक्षणावरून निष्कर्ष निघतो, की रामायणाचा कालावधी ख्रिस्तपूर्व बारा हजारच्या नंतर असू शकत नाही. म्हणजेच त्या काळातील कालगणनेनुसार आणि खगोलशास्त्रीय वर्णनांनुसार आकाशातील स्थिती, धूमकेतू, ग्रहतारे स्पष्टपणे दिसत असावेत. गणितीय पद्धतीने हे सिद्ध करता येऊ शकते,'' असा सिद्धांत ओक यांनी मांडला आहे. 
संशोधनाविषयी ओक म्हणाले, ""रामायण, महाभारताविषयी वेगवेगळे मतप्रवाह आहेत. मात्र हे घडले केव्हा अशी उत्सुकता परदेशात शिक्षण घेत असताना निर्माण झाली. सुरवातीला मी महाभारतावर संशोधन सुरू केले. महाभारताविषयीचे दोनशेहून अधिक खगोलीय पुरावे सापडले. सप्तर्षींपैकी अरुंधती आणि वसिष्ठ निरीक्षणाविषयीचे कुतूहल वाढले. अरुंधती तारा हा वसिष्ठ ताऱ्याच्या पुढे होता, हे निरीक्षण माझ्या निदर्शनास आले. त्यावरून महाभारतातील युद्धकाळाचा निष्कर्ष निघाला आणि महाभारत ख्रिस्तपूर्व 4508 वर्षे अगोदर घडल्याचा सिद्धांत मांडला. "अरुंधतीचे रहस्य' या माझ्या पुस्तकात याविषयी मी लिहिले आहे.'' 


""महाभारतावरून मला रामायणाचा शोध घेण्याची प्रेरणा मिळाली. साधारणतः 2010चे ते वर्ष होते. कालगणना शोधण्याकरिता मी वाल्मीकी रामायणाला प्राधान्य दिले. कारण कालमापन ठरवायचे असेल, तर वाल्मीकी रामायणाचा आधार घ्यावा लागतो. संशोधन करतेवेळी चारही कांडांमध्ये रामायणाच्या कालगणनेचे वर्णन आढळले. मी शोधलेले संदर्भ बहुतांशी मिळतेजुळते असल्याचे गणितीय पद्धतीने पडताळून पाहिले. त्यावरून मी "द हिस्टॉरिक राम' हे पुस्तक लिहिले आहे. अनेक जण मनःशांतीसाठी रामायण वाचतात. पण, खगोलीय, वैज्ञानिक, पर्यावरणीय असे अनेकविध संदर्भ रामायणाशी संबंधित आहेत. संशोधन करतेवेळी ते जाणवतात,'' असेही ओक सांगतात. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com