पंतप्रधानांसमवेत पवारही व्यासपीठावर

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 22 डिसेंबर 2016

मेट्रोच्या भूमिपूजनावरून रंगलेला राष्ट्रवादी- भाजपमधील कलगीतुरा अखेर मिटला
पुणे - शहर आणि पिंपरी- चिंचवडमधील मेट्रो प्रकल्पाच्या भूमिपूजनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समवेत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवारही उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे स्वतंत्रपणे भूमिपूजन करण्याचा कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय राष्ट्रवादीने बुधवारी घेतला. राज्य सरकारने पाठविलेल्या आमंत्रणाचा स्वीकारही पवार यांनी केला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये गेल्या दोन दिवसांपासून रंगलेला कलगीतुरा मिटला आहे; मात्र आता कॉंग्रेसने 23 डिसेंबरला भूमिपूजन करण्याचा निर्णय घेतला आहे.

मेट्रोच्या भूमिपूजनावरून रंगलेला राष्ट्रवादी- भाजपमधील कलगीतुरा अखेर मिटला
पुणे - शहर आणि पिंपरी- चिंचवडमधील मेट्रो प्रकल्पाच्या भूमिपूजनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समवेत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवारही उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे स्वतंत्रपणे भूमिपूजन करण्याचा कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय राष्ट्रवादीने बुधवारी घेतला. राज्य सरकारने पाठविलेल्या आमंत्रणाचा स्वीकारही पवार यांनी केला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये गेल्या दोन दिवसांपासून रंगलेला कलगीतुरा मिटला आहे; मात्र आता कॉंग्रेसने 23 डिसेंबरला भूमिपूजन करण्याचा निर्णय घेतला आहे.

मेट्रोच्या भूमिपूजनाला पंतप्रधानांसमवेत शरद पवार यांना आमंत्रित करण्यात यावे, अन्यथा कार्यक्रमावर बहिष्कार घालण्याची भूमिका महापौर प्रशांत जगताप यांनी घेतली होती. मात्र, त्याबाबत भाजपने तत्काळ प्रतिक्रिया दिली नव्हती. त्यामुळे पालकमंत्री गिरीश बापट आणि महापौरांमध्ये दोन दिवसांपासून जाहीर वाद सुरू होता. मात्र, पवार यांनी कार्यक्रमाला उपस्थित राहावे, यासाठी राज्य सरकारने संवाद साधला, त्याला पवार यांनी अनुकूल प्रतिसाद दिल्यामुळे जाहीर केलेला भूमिपूजनाचा कार्यक्रम राष्ट्रवादीने रद्द केला आहे. त्यामुळे रेंजहिल्सजवळील सिंचननगरच्या मैदानावर शनिवारी (ता. 24) सायंकाळी मेट्रोचे भूमिपूजन होणार आहे.

मुख्यमंत्र्यांची शिष्टाई यशस्वी - महापौर
शरद पवार यांनी 2006 ते 14 दरम्यान मेट्रोसाठी पाठपुरावा केला आहे. त्यामुळे भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला त्यांना आमंत्रित करावे, अशी आमची भूमिका होती. त्यासाठी पालकमंत्र्यांकडे पाठपुरावा केला. परंतु, त्यांनी आठ दिवस झुलवत ठेवले. अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पवार यांना सन्मानाने निमंत्रित करतानाच त्यांना भाषणाचीही संधी दिली आहे, त्यामुळे मुख्यमंत्र्यांची शिष्टाई यशस्वी झाली आहे. त्यामुळे या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचा निर्णय पक्षाने घेतला आहे. मेट्रोच्या मंजुरीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचीही महत्त्वपूर्ण भूमिका असल्याचे केंद्र सरकारने मान्य केल्यामुळे कार्यक्रमावरील बहिष्काराचा निर्णय आम्ही मागे घेतला आहे, असे महापौर जगताप यांनी स्पष्ट केले.

महापौर आततायी - बापट
शरद पवार यांनी मेट्रोच्या भूमिपूजनाला उपस्थित राहावे, अशी विनंती राज्य सरकारने यापूर्वीच केली होती; परंतु त्यांनी आमंत्रण स्वीकारल्याचे कळविले नव्हते, त्यामुळे त्यांना आमंत्रित केल्याचे जाहीर करता येत नव्हते. या घडामोडींची कल्पना महापौरांना अनौपचारिक गप्पांत जाहीरपणे मंगळवारी दिली होती. परंतु, शहरातील विकासकामे मार्गी लावण्यापेक्षा त्याबाबतच्या घडामोडींचे राजकारण करण्याची महापौरांना हौस असते, हे स्मार्ट सिटीच्या उद्‌घाटनप्रसंगी आणि या वेळीही दिसून आले. महापौरांनी असा आततायीपणा करण्याची गरज नव्हती. खरेतर, मेट्रोचे भूमिपूजन हा एका पक्षाचा कार्यक्रम नाही, तर दोन्ही शहरांतील नागरिकांचा आहे. त्यात महापौरांनी राजकारण करण्याची गरज नव्हती, असे मत पालकमंत्री बापट यांनी व्यक्त केले.

कॉंग्रेसकडून शुक्रवारीच भूमिपूजन
भाजप, राष्ट्रवादीचा काहीही निर्णय झालेला असला, तरी कॉंग्रेस पक्षातर्फे शुक्रवारी (ता. 23) सकाळी 11 वाजता स्वारगेट चौकात मेट्रोचे भूमिपूजन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते होणार असल्याचे शहराध्यक्ष रमेश बागवे यांनी सांगितले. चव्हाण हे या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत, असेही त्यांनी सांगितले. मेट्रो प्रकल्पाचा मूळ जनक कॉंग्रेस आहे, याचा राष्ट्रवादी, भाजपला विसर पडला आहे, त्यामुळेच कॉंग्रेस भूमिपूजन करणार आहे, असे बागवे यांनी स्पष्ट केले. या प्रसंगी कॉंग्रेसचे नेते राधाकृष्ण विखे पाटील, पतंगराव कदम, हर्षवर्धन पाटील आदी नेते उपस्थित राहणार आहेत. दरम्यान, राष्ट्रवादीने आपला शब्द पाळला नाही, त्यामुळे कॉंग्रेसला स्वतंत्र कार्यक्रम आयोजित करावा लागत आहे, असे माजी आमदार मोहन जोशी यांनी म्हटले आहे.