शहराचा पारा 41 अंशांवर 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 6 मे 2017

पुणे - वैशाख वणव्यात पुणेकर शुक्रवारी भाजून निघाले. शहरात यंदाच्या उन्हाळ्यातील उच्चांकी तापमानाची नोंद झाली. शिवाजीनगर येथे कमाल तापमानाचा पारा 41.1 अंश सेल्सिअस नोंदला गेला; तर लोहगाव येथे 41.7 अंश सेल्सिअस तापमान होते. पुढील दोन दिवस उन्हाचा हा चटका कायम राहणार आहे. 

शहरात गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण होते. त्यामुळे दुपारनंतर उकाडा वाढत असल्याचे जाणवत होते. मात्र, शुक्रवारी सकाळी नऊ वाजल्यापासूनच उन्हाचा कडाका वाढला. उन्हाचा चटका आणि उकाडा यामुळे पुण्यातील रस्त्यांवर दुपारी तुरळक वर्दळ होती. दुचाकीवरून जाणारे वाहनचालक डोक्‍यावर टोपी आणि तोंडाला रुमाल बांधून प्रवास करत असल्याचे चित्र दिसत होते. लक्ष्मी रस्ता, फर्ग्युसन, टिळक, शिवाजी आणि बाजीराव या प्रमुख रस्त्यांवरील चौकांमध्येही वाहनांची गर्दी कमी जाणवत होती. 

शहरात गेल्या महिन्यात 40.8 अंश सेल्सिअस इतक्‍या कमाल तापमानाची नोंद झाली होती. या वर्षातील तापमानाचा उच्चांक मोडत कमाल तापमानाच्या पाऱ्याने 41 अंश सेल्सिअसच्या वर उसळी मारली. सरासरीपेक्षा 3.4 अंश सेल्सिअसने हे तापमान वाढले होते. गेल्या वर्षी मेमध्ये 41 अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले होते. तर 2015 मध्ये 40.8 अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेल्याची माहिती हवामान खात्यातर्फे देण्यात आली. 

रात्रीही उकाडा जाणवत होता. उपनगरांमध्ये विजेचा लपंडाव सुरू असल्याने रात्री उशिरापर्यंत पुणेकर सोसायट्यांच्या आवारात रेंगाळत होते. शुक्रवारी सकाळी आठ वाजेपर्यंत 24.2 अंश सेल्सिअसची नोंद झाली.

Web Title: pune city 41 degrees temperature