पुणेकरांना दोन वेळा पाणी मिळणार

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 4 जानेवारी 2017

कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत निर्णय
पुणे: पुणे शहराला दिवसातून दोन वेळा पाणी देण्यात येणार आहे. येत्या एक-दोन दिवसांत या निर्णयाची अंमलबजावणी सुरू होईल, असे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी मंगळवारी जाहीर केले. खडकवासला प्रकल्पाच्या कालवा सल्लागार समितीच्या मुंबईत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत निर्णय
पुणे: पुणे शहराला दिवसातून दोन वेळा पाणी देण्यात येणार आहे. येत्या एक-दोन दिवसांत या निर्णयाची अंमलबजावणी सुरू होईल, असे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी मंगळवारी जाहीर केले. खडकवासला प्रकल्पाच्या कालवा सल्लागार समितीच्या मुंबईत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

बापट म्हणाले, ""सध्या शहराला रोज एक वेळा पाणी दिले जाते. खडकवासला धरणातून देण्यात येणाऱ्या पाण्याचे प्रमाण वाढविण्यात येईल. पुणे शहराला रोज 1325 दशलक्ष लिटर (एमएलडी) पाणी देण्यात येईल. महापालिकेने खडकवासला धरणापासून पर्वती जलकेंद्रापर्यंत जलवाहिनी टाकली आहे. चार वर्षांपासून ते काम सुरू आहे. ती पूर्ण क्षमतेने वापरली जात नाही. तिचा वापर नीट केल्यास सुमारे एक अब्ज घनफूट (टीएमसी) पाणी वाचेल.''

"खडकवासला कालव्यातून अनेक ठिकाणी गळती होते. त्याच्या दुरुस्तीची गरज आहे. त्यामुळे महिन्यातून एक ते दोन दिवस कालवा दुरुस्तीसाठी बंद ठेवण्यात येईल. सर्वांनाच पुरेसे पाणी देण्यात येत असले, तरी त्याचा वापर सर्वांनी काटकसरीने केला पाहिजे,'' असे बापट यांनी सांगितले.
शेतीच्या सिंचनासाठी पाणीपुरवठा करण्याबाबत बापट म्हणाले, ""मुंढवा जॅकवेल येथून गेल्या वर्षी शेतीसाठी एक टीएमसी पाणी देण्यात आले होते. यंदा मुंढवा येथून दोन टीएमसी पाणी सिंचनासाठी देण्यात येईल. त्यामुळे, धरणातून शेतीसाठी देण्यात येणाऱ्या पाण्यात एक टीएमसी बचत होईल. त्याच बरोबर धरणातूनही पाणी दिले जाईल. शहरात पिण्यासाठी, तसेच ग्रामीण भागात शेतीसाठी पुरेसा पाणीपुरवठा करण्यात येईल.''

बापट म्हणाले, ""यापूर्वी पाणीपुरवठा योजनांच्या दुरुस्तीसाठी सुमारे 15 कोटी रुपये मिळत होते. मात्र, राज्य सरकारने पाणीपट्टीची रक्कम पाणीपुरवठा योजनांच्या दुरुस्तीवर खर्च करण्याचे धोरण राबविण्याचा निर्णय घेतला असल्याने दुरुस्तीसाठी सुमारे दीडशे कोटी रुपये उपलब्ध होणार आहेत. त्यामधून कालव्यांचे अस्तरीकरण, मजबुतीकरण, गाळ काढणे आदी कामे करता येतील. या व्यापक प्रयत्नांमुळे पाण्याचा पुरेपूर वापर करता येणार आहे. जेणेकरून काटकसरीतून पुणेकरांना दिवसातून दोनवेळा पुरेसा पाणीपुरवठा करता येणे शक्‍य होणार आहे.''

सल्लागार समितीच्या बैठकीला खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, आमदार सुरेश गोरे, राहुल कुल, दत्तात्रेय भरणे, बाबूराव पाचर्णे, जलसंपदा विभागाचे पुणे विभागाचे मुख्य अभियंता प्रवीण मुंडे, अधीक्षक अभियंता अतुल कपोले उपस्थित होते.

Web Title: Pune a couple of times to get water