पुणे: करदात्यांसाठीची टोकन यंत्रणा बंद

अविनाश पोफळे
सोमवार, 22 मे 2017

टोकन सेवा बंदच करायची होती, तर त्यावर महापालिकेने खर्च का केला? हा जनतेचा पैसा आहे, हे त्यांच्या लक्षातच येत नाही. टोकन यंत्रणेद्वारे कर भरण्यास किती वेळे लागेल, याचा विचार अगोदर का केला नाही? संबंधितांना जाब विचारणारेच कोणी नाही, त्यामुळे असे होते.
- विजय साठे, करदाता

वारजे-कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालयातील प्रकार

पुणे (कर्वेनगर): करदात्यांच्या वेळेची बचत होण्यासाठी वारजे-कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालयातील करसंकलन विभागाने मोठ्या हौसेने टोकन यंत्रणा कार्यान्वित केली. त्यावर भरमसाट खर्चही केला. मात्र, टोकणद्वारे करसंकलन करणे वेळखाऊ असल्याचे कारण पुढे करीत या यंत्रणेचा वापर बंद करण्यात आला आहे. वापर करायचा नव्हता, तर त्यावर महापालिकेने खर्च का केला, असा सवाल नागरिकांनी केला आहे.

करभरणा करण्यासाठी नागरिकांच्या क्षेत्रीय कार्यालयातील पूर्वीच्या कार्यालयात रांगा लागत होत्या. त्यात वेळ वाया जात असल्याने नागरिकांना मनस्ताप होत होता. तो दूर करून करदात्यांना चांगली सेवा मिळावी, यासाठी महापालिकेने शेजारीच नवीन सोयी-सुविधायुक्त करसंकलन कार्यालय सुरू केले. त्यासाठी फर्निचर, खुर्च्या, चांगली प्रकाश योजना बसवण्यात आली. तसेच नागरिकांना रांगेत उभे राहण्याचा त्रास कमी करण्यासाठी टोकण यंत्रणाही कार्यान्वित केली. या कामांसाठी लाखो रुपये खर्च केले. तरीही टोकण सेवेपासून वंचित राहण्याची वेळ नागरिकांवर आली आहे.

दरम्यान, याबाबत करसंकलन विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांकडे चौकशी केली. जन्म-मृत्यूच्या नाव नोंदणीसाठी येणाऱ्या नागरिकांची संख्या कमी असते. त्यामुळे त्यांना टोकण देण्यात येते. करदात्यांची संख्या जास्त असते. टोकण पद्धतीद्वारे कर भरण्यास विलंब होतो. त्यापेक्षा नेहमीप्रमाणे कमी वेळ लागतो. त्यामुळे टोकण देण्यात येत नाही, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले. दरम्यान, जन्म-मृत्यूच्या नोंदीसाठी येणाऱ्या नागरिकांना टोकण देण्यात येत असल्याचे आढळून आले नाही.