उसाचा रस अन् ताकाचा आधार

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 19 फेब्रुवारी 2017

पुणे- उन्हाचा कडाका वाढलेला असतानाही उमेदवारांनी व त्यांच्या कार्यकर्त्यांनी अधिकाधिक मतदारांपर्यंत पोचण्याचा प्रयत्न शनिवारी केला. संपूर्ण प्रभागात जाता यावे आणि उन्हाची झळ बसू नये म्हणून काही उमेदवारांनी "रोड शो', तर काहींनी पदयात्रेवर भर दिला. उमेदवार व कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी थंड पाणी, शीतपेये, उसाचा रस, लिंबू सरबत, ताक घेऊन प्रचार सुरूच ठेवला. बहुतांश ठिकाणी मतदारांकडूनही उमेदवार व त्यांच्या कार्यकर्त्यांना पाणी व सरबतासाठी आग्रह केला जात होता.

महापालिका निवडणुकीचा प्रचार संपण्यास अवघा एक दिवस शिल्लक राहिल्यामुळे बहुतांश सर्वच उमेदवारांनी जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोचण्यासाठी नियोजन केले होते. प्रभाग मोठे असल्याने प्रत्येक भागामध्ये किमान पोचण्याचा उमेदवारांचा प्रयत्न होता. मात्र सकाळी साडेदहापासूनच उन्हाचा कडाका वाढण्यास सुरवात झाली. दुपारी बारा वाजल्यानंतर तर कार्यकर्त्यांनी डोक्‍यावर पक्षाचे चिन्ह असलेली टोपी, रुमाल व पक्षाचे उपरणे व कापड गुंडाळून प्रचारामध्ये सहभाग घेतला. कार्यकर्तेही ठिकठिकाणी सावली शोधू लागल्याने उमेदवारांच्या वेळेचे नियोजनही बिघडू लागले. त्यामुळे काही उमेदवारांनी आपल्या नियोजनात काहीसा बदल करत प्रचाराला सुरवात केली.

कोपरा सभा, घरोघरी भेटी घेण्यापेक्षा उमेदवारांनी मतदारांपर्यंत पोचण्यासाठी "रोड शो'वर अधिक भर दिला. त्यामुळे प्रत्येक प्रभागामध्ये असंख्य दुचाकी, चारचाकी गाड्यांचा समावेश असलेल्या रॅली काढण्यास सुरवात केली. खुल्या जीपमधील सर्व उमेदवार मतदारांना आवाहन करत असल्याचे चित्र ठिकठिकाणी दिसत होते. गाडीवरच प्रचार करायचा असल्याने कार्यकर्तेही मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. काही मतदारांकडून उमेदवारांना व त्यांच्या कार्यकर्त्यांची विचारपूस केली जात होती. तर काही उमेदवारांनी कार्यकर्त्यांसाठी उसाचा रस, लिंबू सरबत, ताक, शीतपेयाची व्यवस्था केली होती. दुपारी अर्धा तास आराम केल्यानंतर पुन्हा प्रचाराने वेग घेतला. बहुतांश उमेदवारांनी रोड शो व पदयात्रेद्वारे शक्तिप्रदर्शन करण्याचाही प्रयत्न केला.
--------