पुणे जिल्ह्यातील 185 आधार कार्ड केंद्रे सुरू

पुणे जिल्ह्यातील 185 आधार कार्ड केंद्रे सुरू
पुणे - शहरातील "महा ई सेवा' केंद्रांद्वारे आधार कार्ड केंद्रांच्या सेवांमध्ये विस्कळितपणा आला आहे. महाऑनलाइन आणि खासगी संस्थांच्या "कमिशन'च्या वादातून आधार सेवा कोलमडली आहे. त्यासाठी राज्य सरकारकडून शंभरहून जास्त खासगी ऑपरेटर नियुक्त करणे आणि मशिन दुरुस्तीचे अधिकार जिल्हा प्रशासनाला मिळावेत, असा प्रस्ताव पाठविलेला आहे. त्याला अद्यापही परवानगी मिळालेली नाही. परंतु पुणे, पिंपरी- चिंचवड आणि जिल्ह्यामध्ये 185 आधार कार्ड केंद्रे सुरू असल्याची माहिती जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी दिली.

जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जिल्हाधिकारी राव यांच्या अध्यक्षतेखाली "महाऑनलाइन'चे सुन्मेष जोशी यांच्यासोबत अन्य कंपन्यांच्या पदाधिकाऱ्यांची "आधार'संदर्भात आढावा बैठक पार पडली. याबाबत राव म्हणाले, 'जिल्हाधिकारी कार्यालयाकडून खासगी संस्थांना आधार केंद्र फक्त शासकीय इमारतीच्या आवारात सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. तसे संबंधित केंद्रचालकांकडून लेखी घेतले आहेत. महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालय स्तरावर तर जिल्ह्यामध्ये शासकीय इमारतींमध्ये ही केंद्र सुरू केली आहेत. आधार सेवा ही पूर्णतः मोफत दिली जात आहे. परंतु केंद्रांची संख्या आणि उपलब्ध मशिनची संख्या पाहता नागरिकांना त्रास होत आहे. यासाठी राज्य सरकारकडे प्रशिक्षित ऑपरेटर आणि जिल्हाधिकारी कार्यालयाच्या खर्चातून आधार मशिनची देखभाल-दुरुस्तीचे अधिकार द्यावेत, असा प्रस्ताव पाठविला आहे. त्यावर अंतिम निर्णय झालेला नाही.''

ज्येष्ठांसाठी "कॉल ऑन' सेवा
शारीरिक दुर्बल व वृद्ध व्यक्तींना आधार केंद्रावर येणे शक्‍य नसते. त्यांच्या सुविधेसाठी "कॉल ऑन सशुल्क आधार सेवा' सुरू केली आहे. प्रति आधार कार्डासाठी 400 रुपये दर आकारला जाईल. या सेवेला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी सांगितले. दरम्यान, जिल्हाधिकारी कार्यालयाच्या तळमजल्यावर कायमस्वरूपी आधार केंद्र सुरू केल्याचेही त्यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com