‘पीएमपी’च्या तिजोरीत सोमवारी दोन कोटी जमा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 9 ऑगस्ट 2017

पुणे - रक्षाबंधनाच्या दिवशी (सोमवारी) पीएमपीच्या तिजोरीत सर्वाधिक एका दिवसात एक कोटी ९७ लाख १९ हजार रुपयांचे उत्पन्न जमा झाले आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी पीएमपीने नेहमीपेक्षा अधिकच्या ८७ बस मार्गावर पाठविल्या होत्या.

पीएमपीच्या उत्पन्नात दरवर्षी रक्षाबंधनाच्या दिवशी मोठी भर पडते. त्या दिवशी प्रवाशांची वाहतूक जास्त असल्यामुळे अधिक बस सोडल्या जातात. पीएमपी प्रशासनाने यंदाही जादा बस सोडण्यासाठी प्रयत्न केले होते. त्यानुसार सोमवारी १ हजार ६६० बस मार्गावर होत्या. एरवी सरासरी १ हजार ५७१ बस मार्गावर असतात. सोमवारी त्यात ८७ बसची भर पडली. त्या शिवाय सुमारे ५० बस राखीव होत्या. सुमारे ११ लाख ५० हजार प्रवाशांनी पीएमपीचा वापर केला.
रक्षाबंधनाच्या दिवशी पीएमपीने ३९ बस स्थानकांवर सकाळी आठ वाजल्यापासून रात्री दहा वाजेपर्यंत विशेष अधिकारी नियुक्त केले होते. तसेच कार्यालयीन काम करणारे सुमारे १०० कर्मचारी शहर आणि पिंपरी-चिंचवडमधील गर्दीच्या बस थांब्यांवर नियुक्त केले होते. बस संख्या वाढविण्यासाठी प्रशासनाने सोमवारी वर्कशॉपमधील तसेच चालक आणि वाहकांच्या साप्ताहिक सुट्याही रद्द केल्या होत्या, असे प्रशासनाने नमूद केले.