ऊस गाळप परवान्यांचे 63 कारखान्यांना वाटप

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 ऑक्टोबर 2017

पुणे - साखर आयुक्तालयाचा कारभार गतिमान करण्यासाठी यंदाच्या हंगामापासून साखर कारखान्यांना ऑनलाइन पद्धतीने गाळप परवाने देण्यात येत आहेत. राज्यातील 26 सहकारी आणि 29 खासगी अशा एकूण 55 कारखान्यांना ऑनलाइन गाळप परवाने सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या हस्ते देण्यात आले. त्यानंतर बुधवारी आणखी 8 कारखान्यांना परवाने वितरित केले असून, एकूण 63 कारखान्यांना परवाने दिल्याची माहिती साखर आयुक्तालयातील सूत्रांनी दिली. उर्वरित कारखान्यांच्या प्रस्तावात त्रुटी असल्याने कार्यवाही सुरू आहे, ऑक्‍टोबरअखेर त्यांनादेखील परवाने दिले जाणार आहेत.

यंदा राज्यात एक नोव्हेंबर रोजी ऊसगाळप हंगाम सुरू होणार आहे. त्यासाठी राज्यातील 191 कारखान्यांनी गाळप परवान्यासाठी ऑनलाइन अर्ज सादर केले. पुणे विभागातील सर्वाधिक 20 व त्याखालोखाल कोल्हापूर विभागातील 19 कारखान्यांना परवाने देण्यात आले आहेत. नांदेड विभागातील कारखान्यांना अद्याप परवाने दिलेले नाहीत.

शेतकऱ्यांना मागील हंगामातील "किमान आधारभूत किंमत'(एफआरपी) ची रक्कम न देणे, मुख्यमंत्री सहायता निधीसाठी मदत न देणे, शासकीय देणी प्रलंबित असणे, कर्मचाऱ्यांचे वेतन थकीत असणे, तसेच भाडेकरारावरील कारखान्यांचे वाद असणे अशा विविध कारणांमुळे उर्वरित कारखान्यांना परवाने देण्यात आलेले नाहीत. त्रुटींची पूर्तता करण्याबाबतच्या नोटिसा त्यांना पाठविण्यात आल्या असून, त्यांची पूर्तता झाल्यानंतर परवाने देण्यात येतील. मात्र, ज्या कारखान्यांनी गतवर्षी एफआरपी दिली नसेल त्यांना यंदा गाळप परवाने देणार नसल्याचे साखर आयुक्तालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

ऑनलाइन गाळप परवाने वितरणाची विभागनिहाय आकडेवारी
(स्रोत - साखर आयुक्तालय)

विभाग सहकारी खासगी एकूण
पुणे 9 11 20
नगर 6 2 8
औरंगाबाद 1 6 7
कोल्हापूर 10 9 19
नागपूर -- 1 1
          26 29 55