आधार नोंदणी बंद

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 15 जून 2017

कंपन्यांचे काम थांबवले; सॉफ्टवेअरमध्ये बदलाचे काम सुरू

पुणे - आधार नोंदणीचे चार कंपन्यांना दिलेले काम राज्य सरकारने काढून घेतले आहे. तसेच आधार नोंदणीच्या सॉफ्टवेअरमध्ये बदल करण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे सध्या आधार नोंदणीचे काम पूर्णपणे बंद ठेवण्यात आले आहे. लवकरच पुन्हा आधार नोंदणीचे काम सुरू होईल, असे जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी स्पष्ट केले. 

कंपन्यांचे काम थांबवले; सॉफ्टवेअरमध्ये बदलाचे काम सुरू

पुणे - आधार नोंदणीचे चार कंपन्यांना दिलेले काम राज्य सरकारने काढून घेतले आहे. तसेच आधार नोंदणीच्या सॉफ्टवेअरमध्ये बदल करण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे सध्या आधार नोंदणीचे काम पूर्णपणे बंद ठेवण्यात आले आहे. लवकरच पुन्हा आधार नोंदणीचे काम सुरू होईल, असे जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी स्पष्ट केले. 

केंद्र सरकारकडून काही वर्षांपूर्वी देशभरात आधार कार्ड नोंदणी मोहीम हाती घेण्यात आली. या मोहिमेंतर्गत सर्वांना हे कार्ड काढून घेण्याचे आवाहन वारंवार सरकारकडून करण्यात आले. त्यासाठी देशभरात आधार नोंदणी केंद्रदेखील उघडण्यात आली होती. केंद्र सरकारच्या आदेशावरून राज्य सरकारने पुढाकार घेत आधार नोंदणीसाठी चार कंपन्यांची नियुक्ती केली होती. गेल्या चार वर्षांत या कंपन्यांकडून राज्यात जवळपास ऐंशी टक्‍क्‍यांहून अधिक नागरिकांची आधार नोंदणी झाली आहे. पुणे शहर व जिल्ह्यात मिळून ९० टक्‍क्‍यांहून अधिक नोंदणी झाली आहे. परिणामी केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड सादर करणे आवश्‍यक झाले आहे. बॅंक, गॅस सिलिंडर, शाळा प्रवेश आदी कामांसाठीदेखील आता आधार कार्डची प्रत सादर करण्याचे बंधन घालण्यात आले आहे.

आधार नोंदणीचे काम करणाऱ्या चारही कंपन्यांकडून हे काम काढून घेण्यात आले आहे. राज्य सरकारच्या माहिती व तंत्रज्ञान विभागाकडून आता हे काम करण्यात येणार आहे. त्यासाठी सध्याच्या आधार नोंदणीच्या सॉफ्टवेअरमध्येही माहिती व तंत्रज्ञान विभागाकडून काही बदल करण्यात येत आहेत. त्यासाठी आधार नोंदणीचे काम बंद ठेवण्यात आले आहे. 

यासंदर्भात जिल्हाधिकारी राव म्हणाले, ‘‘माहिती व तंत्रज्ञान विभागाकडून सुरक्षिततेच्या दृष्टीने आधार नोंदणीच्या सॉफ्टवेअरमध्ये बदल करण्यात येत आहेत. हे काम अंतिम टप्प्यात आले आहे. त्यामुळे आधार नोंदणीचे काम बंद आहे. त्यानंतर महाऑनलाइनमध्ये आधार नोंदणी सुरू करण्यात 
येणार आहे.’’

शाळांनी सक्ती करू नये
सध्या शाळा प्रवेशाची गडबड सुरू आहे. काही शाळांमध्ये प्रवेशासाठी पाल्याच्या आधार कार्डची सक्ती केली जात आहे. आधार कार्ड नसेल, तर प्रवेश नाही, असे सांगितले जात आहे. यावर जिल्हाधिकारी राव म्हणाले, ‘‘शाळांना अशा प्रकारे सक्ती करता येणार नाही. सध्या आधार नोंदणी बंद आहे. ती लवकरच सुरू होईल. शहरात नव्वद टक्के आधार नोंदणी झाली आहे. त्यांनतर शाळांनी संबंधित पालकांकडून पाल्याचे आधार कार्ड मागवून घ्यावे.’’