एसटी पुरविणार शेतमाल वाहतूक सेवा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 13 जून 2017

मुख्यमंत्री अनुकूल; सहा महिन्यांत सुरवात
पुणे - महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी) आता शेतमाल वाहतूक सेवाही देण्याचा विचार करीत आहे. त्यासाठी महामंडळाच्या

मुख्यमंत्री अनुकूल; सहा महिन्यांत सुरवात
पुणे - महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी) आता शेतमाल वाहतूक सेवाही देण्याचा विचार करीत आहे. त्यासाठी महामंडळाच्या
जुन्या बस उपयोगात आणल्या जाणार आहेत. आवश्‍यकता भासल्यास माल वाहतुकीसाठी नवीन ट्रक खरेदी करण्याचीही तयारी महामंडळाने दर्शविली असून, येत्या सहा महिन्यांत ही सेवा सुरू करण्याचा विचार असल्याचे महामंडळातील सूत्रांकडून सांगण्यात आले.

राज्यात एसटीच्या 16 हजार पाचशे बसद्वारे 18 हजार 700 मार्गांवर प्रवासी वाहतूक सेवा दिली जाते. एसटी महामंडळाचे 568 आगार असून, जवळपास दोन हजार स्टॅण्ड आहेत. महामंडळाची सेवा राज्यात सर्वदूर आहे. या सेवेच्या माध्यमातून माल वाहतूक सुरू करावी असा प्रस्ताव फार पूर्वी राज्य सरकारकडे पाठविण्यात आला होता. तो अद्यापही मान्यतेच्या प्रतीक्षेत आहे. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ही सेवा सुरू करण्यासाठी अनुकूल आहेत. त्यासाठी एसटी महामंडळाच्या अंतर्गत स्वतंत्र विभाग सुरू करण्यात येणार आहे. लासलगाव येथून कांदा, नागपूर येथून संत्री, नाशिक येथून द्राक्षे, नारायणगाव येथून टोमॅटोसह विविध भागांतून विशिष्ट माल मोठ्या प्रमाणावर अन्य बाजारांत पाठविला जातो. वाहतुकीचा खर्च कमी करणे हा या सेवेमागील प्रमुख उद्देश आहे. खासगी माल वाहतूकदारांच्या तुलनेत अत्यल्प दर आकारणे आणि शेतकऱ्यांना शेतमालाच्या वाहतुकीची पर्यायी व्यवस्था निर्माण करून देणे हा उद्देश यामागे असल्याचे सांगण्यात येत आहे.

मालवाहतुकीबाबत एसटी महामंडळाकडून सर्वेक्षण करण्यात आले आहे. राज्यात जिल्हा पातळीवर उत्पादित शेतमालाचीही वाहतूक केली जाते. सध्या या सेवेसाठी स्वतंत्र यंत्रणा उभारण्याची कार्यवाही सुरू आहे. यासाठी स्वतंत्र अधिकारी वर्गही नेमला जाणार आहे. एसटी महामंडळाच्या राज्यभरात अनेक ठिकाणी मोकळ्या जागा आहेत. या जागांचा माल वाहतुकीसाठी टर्मिनल म्हणून वापर केला जाणार आहे. या सेवेसाठी एसटी महामंडळाचीच वाहने वापरण्याचा विचार आहे. मालवाहतुकीची महत्त्वाकांक्षी सेवा सार्वजनिक-खासगी भागीदारीत (पीपीपी) चालविली जाणार आहे. त्यासाठी महामंडळाच्या जुन्या बसचे ट्रकमध्ये रूपांतर करण्याचे काम सध्या वेगात सुरू असल्याचेही सांगण्यात आले.