चीनचा धोका टळला, असं नाही: लष्करप्रमुख बिपीन रावत

स्वप्नील जोगी
रविवार, 27 ऑगस्ट 2017

लष्करप्रमुख रावत म्हणाले :
- लष्कर (पायदळ), नौदल आणि हवाईदल यांनी एकत्रितपणे काम केल्यास देशाच्या सुरक्षेसाठी ते अत्यंत उपयोगाचे ठरेल. याला आधुनिक तंत्रज्ञानाची जोडही मिळावी.
- स्वातंत्र्यपूर्व काळातील अनेक ऐतिहासिक मर्यादांमुळे, तसेच आर्थिक आणि मर्यादित ऊर्जास्रोतांच्या प्रश्नांमुळे आपल्या देशाच्या सुरक्षेबाबत अनेक कमतरता राहिल्या आहेत. त्यावर तातडीने काम होण्याची गरज आहे.
- आंतरराष्ट्रीय दहशतवाद आणि झपाट्याने पसरत चाललेला कट्टर मूलतत्त्ववाद ही आव्हाने होत जाणार अधिक कडवी, त्यांच्याशी लढा गरजेचा.
- आशिया आता जागतिक "गुरुत्वमध्य' बनत चालला आहे. या काळात भारताची भूमिका ठरेल महत्त्वाची.
- आपल्या शेजारी राष्ट्रांमध्ये निर्माण होणारा अंतर्गत सुरक्षेचा प्रश्न आपल्यालाही त्रासदायक. त्यासाठी आपण सतर्क राहणे गरजेचे. भू-सामरिक दृष्टीने अफगाणिस्तान आपल्यासाठी महत्त्वाचा देश.
- संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत भारताला कायमचे स्थान मिळणे गरजेचे.

पुणे : "डोकलाम'सारख्या समस्या आणि आव्हानं यापुढेही समोर येतच राहतील... आपण त्यासाठी सतत सज्ज राहायला हवे. चीनचा धोका टळला असे न समजता लष्कराने सतत डोळ्यांत तेल घालून सीमेवर गस्त ठेवणे आवश्‍यक आहे ! उद्या डोकलामच्या प्रश्नावरून ताणले गेलेले भारत- चीन संबंध पूर्वपदावर आले, तरी आपल्या सैन्याची जबाबदारी संपत नाही. आपण आपली लष्करसज्जता सदैव उच्चतम पातळीवरच ठेवायला हवी...'' अशा ठाम शब्दांत लष्करप्रमुख बिपीन रावत यांनी आपले लष्करी धोरण स्पष्ट केले.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संरक्षण व सामरिक शास्त्र विभागाने आयोजित केलेल्या "जनरल बी. सी. जोशी स्मृती व्याख्याना'त शनिवारी रावत बोलत होते. "सध्याची भू-सामरिक धोरणात्मक बांधणी आणि भारतापुढील आव्हाने' या विषयावर ते बोलले. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, डॉ. विजय खरे आदी या वेळी उपस्थित होते.

"आशियायी क्षेत्रात चीन आपली ताकद सातत्याने वाढवत आहे. ही बाब आपल्यासाठी चिंताजनक आहे. पाकिस्तान ऑक्‍युपाईड काश्‍मीरमधून (पीओके) जाणाऱ्या "चायना- पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडोअर'मुळे भारताच्या सार्वभौमत्वापुढे आव्हान निर्माण झाले आहे,' अशी स्पष्टोक्ती रावत यांनी केली.

याचवेळी, चीनविषयी धोरणांबद्दल ते पुढे म्हणाले, की एकीकडे लष्करी पातळीवर आपली धोरणे त्या- त्या वेळची परिस्थिती पाहून बदलली, तरी चीनशी असणाऱ्या आपल्या परराष्ट्रीय धोरणांत, तसेच आर्थिक आणि व्यापारविषयक धोरणांत मात्र बदल करण्याची आवश्‍यकता नाही.
"लष्करी पातळीवरील वाद वेगळ्या पद्धतीने हाताळणे चालूच राहील, तसेच आर्थिक- राजनैतिक हितसंबंध हेही आपल्या पद्धतीने चालू राहतील...' असे सूचक विधान त्यांनी या वेळी केले.

लष्करावर खर्च अनाठायी नाही !
रावत म्हणाले, "सशक्त अर्थव्यवस्था हवी असेल, तर सशक्त लष्कर गरजेचेच आहे ! लष्करावर होणाऱ्या अफाट खर्चाला तो केवळ प्रचंड असल्यामुळे अनाठायी म्हणणे योग्य नाही. लष्करी सामर्थ्य देशाचा सर्वांगीण विकास घडवण्यात महात्त्वाचेच ठरत असते.''

काश्‍मीरमध्ये पोलिसांची भूमिका योग्य
रावत म्हणाले, "काश्‍मीरमध्ये परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यात जम्मू- काश्‍मीर पोलिस आणि सेंट्रल आर्मड पोलिस फोर्सेस यांनी लष्कराच्या विविध कारवायांना मदतीची भूमिका निभावली आहे. यामुळे त्यांची देशाप्रती असणारी निष्ठाही दिसून येत आहे.''
या वेळी रावत यांनी ईशान्य भारतात "आसाम रायफल्स'ने केलेल्या कारवायांचेही कौतुक केले.

लष्करप्रमुख रावत म्हणाले :
- लष्कर (पायदळ), नौदल आणि हवाईदल यांनी एकत्रितपणे काम केल्यास देशाच्या सुरक्षेसाठी ते अत्यंत उपयोगाचे ठरेल. याला आधुनिक तंत्रज्ञानाची जोडही मिळावी.
- स्वातंत्र्यपूर्व काळातील अनेक ऐतिहासिक मर्यादांमुळे, तसेच आर्थिक आणि मर्यादित ऊर्जास्रोतांच्या प्रश्नांमुळे आपल्या देशाच्या सुरक्षेबाबत अनेक कमतरता राहिल्या आहेत. त्यावर तातडीने काम होण्याची गरज आहे.
- आंतरराष्ट्रीय दहशतवाद आणि झपाट्याने पसरत चाललेला कट्टर मूलतत्त्ववाद ही आव्हाने होत जाणार अधिक कडवी, त्यांच्याशी लढा गरजेचा.
- आशिया आता जागतिक "गुरुत्वमध्य' बनत चालला आहे. या काळात भारताची भूमिका ठरेल महत्त्वाची.
- आपल्या शेजारी राष्ट्रांमध्ये निर्माण होणारा अंतर्गत सुरक्षेचा प्रश्न आपल्यालाही त्रासदायक. त्यासाठी आपण सतर्क राहणे गरजेचे. भू-सामरिक दृष्टीने अफगाणिस्तान आपल्यासाठी महत्त्वाचा देश.
- संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत भारताला कायमचे स्थान मिळणे गरजेचे.

Web Title: Pune news Army chief Bipin Rawat talked about China and Doklam issue