सरकारच दहशतवाद पोसतंय: डॉ. बाबा आढाव

स्वप्नील जोगी
रविवार, 20 ऑगस्ट 2017

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनास रविवारी (20 ऑगस्ट) चार वर्षे झाली, मात्र त्यांचे मारेकरी अद्याप मोकाट असल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे काढण्यात आलेल्या 'जवाब दो' मोर्चात डॉ. आढाव बोलत होते. ते म्हणाले, " मुख्यमंत्री सतत फक्त आकड्यांचा आधार घेऊन बोलत असतात. पण हे आकडे कधीच खरे होत नाहीत.

पुणे : "अंधश्रद्धा निर्मूलनाचे महत्त्वाचे कार्य करणारे डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला वर्षामागून वर्षे उलटत आहेत, मात्र सरकारला त्यांचे मारेकरी शोधण्यात सातत्याने अपयश येत आहे. खरंतर, सरकारला मारेकरी शोधायचे आहेत का, हाच प्रश्न आता पडतो. हे सरकारच आज दहशतवाद पोसत आहे ! एकीकडे गोरक्षकांनी चालवलेला हिंसाचार आणि दुसरीकडे दाभोलकर, पानसरे यांच्यासारख्या सामाजिक कार्य करणाऱ्यांच्या हत्या, हे चित्र पाहता सरकार दहशतवाद पोसत असल्याचे स्पष्ट आहे," अशी घणाघाती टीका ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव यांनी केली.

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनास रविवारी (20 ऑगस्ट) चार वर्षे झाली, मात्र त्यांचे मारेकरी अद्याप मोकाट असल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे काढण्यात आलेल्या 'जवाब दो' मोर्चात डॉ. आढाव बोलत होते. ते म्हणाले, " मुख्यमंत्री सतत फक्त आकड्यांचा आधार घेऊन बोलत असतात. पण हे आकडे कधीच खरे होत नाहीत. ना कर्जमाफीचा आकडा खरा ठरला, ना शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा ! डॉ. दाभोलकर यांच्या मारेकऱ्यांना पकडून देणाऱ्यांस जाहीर केलेल्या बक्षिसाचे आकडे सुद्धा फसवेच आहेत."

दरम्यान, 'हू किल्ड दाभोलकर ? जवाब दो, जवाब दो !'... 'विवेकाचा आवाज बुलंद करूया'... 'मुर्दाड शासनाचा तीव्र धिक्कार असो'... 'लडेंगे जितेंगे' अशा जोरदार घोषणा देत हा मोर्चा सकाळी साडेसात च्या सुमारास विठ्ठल रामजी शिंदे पुलावरून काढण्यात आला होता.

भर पावसात सुरू असणाऱ्या या मोर्चात लहान मुलांपासून ते महिला व ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सुमारे पाचशे जण सहभागी झाले होते. रस्त्याने जाताना घोषणांनी आसपासचा परिसर कार्यकर्त्यांनी दणाणून सोडला होता. अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, रंगकर्मी अतुल पेठे, डॉ. हमीद दाभोलकर, कॉ. मुक्ता मनोहर यांसह पुरोगामी विचारांच्या विविध संघटनांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: Pune news Baba Adhav criticize on government