पारवडीच्या विद्यालयाकडून हरित गावाची संकल्पना...

संतोष आटोळे
मंगळवार, 25 जुलै 2017

  • 2400 रोपांचे वाटप,
  • घराच्या परिसरात लावणार वृक्ष,
  • विद्यार्थी करणार संभाळ,
  • शिक्षक करणार पाहणी 

शिर्सुफळ : पारवडी (ता.बारामती) येथील कै.जिजाबाई दादासाहेब गावडे विद्यालय, ज्युनियर काँलेज व इंग्लिश मेडियम स्कुलच्या वतीने संस्थेचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली हरित गावाची संकल्पाना राबविण्यात येत असून, जिल्ह्यात शाळेमार्फत गाव हरित करण्याचा पहिलाच संकल्प असून, या उपक्रमातून प्रत्येक विद्यार्थ्यांना दोन झाडांची रोपे देण्यात आली असून त्याचे रोपण घराभोवती करून त्यांच्या संगोपनाची जबाबदारी संबंधित विद्यार्थ्यांला देण्यात आली आहे. त्यांचे निरीक्षण दर पंधरा दिवसाला शिक्षकांमार्फत केले जाणार आहे.

यामुळे आगामी काळामध्ये संपूर्ण पारवडी हरित ग्राम म्हणुन ओळखली जाईल. बारामती तालुक्यातील पारवडी सारख्या भागात बाळासाहेब गावडे यांनी मुलींच्या शिक्षणाविषयी असलेल्या तळमळीतून पारवडीतील पूर्ण पाषाण असलेल्या खडकावरती सन 1991 मध्ये शाळा सुरु करीत छोटेसे रोपटे लावले. यावेळी संपूर्ण पाषाण असलेल्या खडकाळ माळरानावर त्यांनी रोपट वाढवायचे होते हे आव्हान त्यांनी स्विकारत शालेय गुणवत्ता, शैक्षणिक इमारतीसह संपूर्ण शाळेच्या परिसरात नारळ, चिंच, गुलमोहर, अशोक पाम ट्री यासारख्या रोपांची लागवड केली. आज शाळेच्या परिसरात पूर्णवाढ झालेली जवळपास 500 झाडे उभी आहेत.शाळा हिरवीगार झाली पण गाव तसेच होते हे ओळखत त्यांनी आता गाव हिरवे करण्याचा संकल्प केला. "एक मूल ,दोन झाडे " या उपक्रमाच्या माध्यमातुन संस्थेच्या इंग्लिश मेडीयम स्कूल, माध्यमिक विद्यालय व ज्युनिअर कॉलेज मधील विध्यार्थ्यांना 2400 रोपांचे (चिंच ,रेन ट्री) वाटप केले प्रत्येक विद्यार्थ्यास 2 रोपे देण्यात आली.यासाठी बारामती एमआयडीसी येथील पियाजीओ व्हेईकल्स कंपनीच्या माध्यमातुन संजीवनी सक्षमीकरण व विकास संस्था औरंगाबाद व ग्रामपंचायत पारवडी मार्फत रोपे उपलब्ध करून देण्यात आली. सदर रोपांचे वाटप संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब गावडे, सरपंच संगिताताई गावडे, पियाजीओ व्हेईकल्सचे योगेश कापसे, अप्पासाहेब बोडखे, प्राचार्य सखाराम गावडे, ग्रामविकास अधिकारी शहानुर शेख, ग्रामस्थ व पालकांच्या हस्ते करण्यात आले.

गुणवत्तेसह विविध उपक्रमात विद्यालय आघाडीवर.. या उपक्रमाबाबत बोलताना प्राचार्य सखाराम गावडे म्हणाले, विद्यालय शैक्षणिक गुणवत्तेसह श्रमदानातून बंधारा, पर्यावरण जनजागृती, पल्स पोलिओ लसीकरण व जनजागरण, मोफत आरोग्य शिबीर, सुनामीग्रस्त, भूकंपग्रस्त अशा नैसर्गिक आपत्तीतील संकटात सापडलेल्या लोकांसाठी मदत, शालेय क्रीडा स्पर्धेत अग्रेसर, जागतिक योग दिन, सकाळ चित्रकला स्पर्धा, सकाळ ज्युनिअर लीडर स्पर्धा, या उपक्रमात नेहमी अग्रेसर असते आता गाव हरित संकल्पना राबविण्यात येत असुन यामध्ये प्रत्येक शिक्षकास एक वस्तीचे पालकत्व देऊन खड्ड्या खोदण्यापासून ते रोपांची लागवड त्यातील तण काढणे, कुंपण लावणे अशा प्रकारची व्यवस्था निर्माण केली त्या पालक शिक्षकांनी दर पंधरा दिवसांनी विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन झाडांची माहिती घेतली जाणार आहे.यामुळे फक्त रोपांची लागवड कुरुन न थांबता लावलेली सर्व रोपे जगविण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.