समूह संघटिकांची नियुक्ती गुणांच्या आधारे

समूह संघटिकांची नियुक्ती गुणांच्या आधारे

पुणे - महापालिकेच्या समाजकल्याण विभागातील ८४ समूह संघटिकांची दहावी-बारावी आणि समाजसेवा विषयातील पदवीच्या (एमएसडब्ल्यू) गुणांच्या आधारे निवड होणार आहे. या वेळी मुलाखतीद्वारे नियुक्‍त्या होणार नाहीत. महापालिकेत पहिल्यांदाच गुणांच्या आधारे समूह संघटिकांची नियुक्ती होणार असून, ही प्रक्रिया येत्या आठ दिवसांत पूर्ण होईल.   

प्रत्येक प्रभागात दोन समूह संघटिका नियुक्त होणार आहेत. अतिरिक्त आयुक्त आणि आयुक्तांची याबाबतच्या प्रस्तावावर स्वाक्षरी झाल्यावर नियुक्‍त्यांची यादी जाहीर होईल, अशी माहिती या विभागाचे प्रमुख संजय रांजणे यांनी दिली. महापालिकेच्या योजना आणि नागरिक यांच्यातील दुवा म्हणून काम करणाऱ्या समूह संघटिकांची नियुक्ती गेल्या काही दिवसांत वादाच्या भोवऱ्यात सापडली होती. प्रशासनाने सुरवातीला वयोमर्यादेची अट घातली होती; परंतु वर्षानुवर्षे काम करणाऱ्या समूह संघटिकांनी संघटितपणे त्याला विरोध केला होता. त्यामुळे प्रशासनाने त्यात बदल केला. समूह संघटिकांची नियुक्ती सहा महिन्यांची असते. त्यानंतर पुन्हा त्यांची नियुक्ती केली जाते. यंदा २३ ऑक्‍टोबर रोजी समूह संघटिकांची नियुक्तीची मुदत संपली. २५ ऑक्‍टोबरपासून पुन्हा नियुक्ती होणे अपेक्षित होते. त्यासाठी समाज विकास विभागाने दीड महिन्यापूर्वीच प्रक्रिया सुरू केली. खात्याकडून याबाबतचे सोपस्कार पूर्ण झाल्यावर सामान्य प्रशासन, अतिरिक्त आयुक्त आणि आयुक्त कार्यालयातील विलंबामुळे समूह संघटिकांची नियुक्ती रखडली आहे. दहावी-बारावीच्या आणि सामाजिकशास्त्र पदवीच्या (एमएसडब्ल्यू) गुणांच्या आधारे नियुक्ती होणार आहे. ८४ पदांसाठी १०५ पेक्षा जास्त अर्ज आले आहेत. समूह संघटिका बारावी उत्तीर्ण असेल, तर १० हजार आणि पदवीधर असेल, तर १२ हजार रुपये मानधन महापालिका देते.  

महिला बालकल्याण, अपंग कल्याण, युवक कल्याण, मागासवर्गीय कल्याणकारी योजनांची माहिती नागरिकांपर्यंत समूह संघटिक पोचवितात. त्याशिवाय केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनांचीही अंमलबजावणी त्या करतात. नागरिकांमध्ये जागरूकतेसाठीही त्यांना उपक्रम राबवावे लागतात. महापालिकेच्या समाज कल्याण विभागामार्फत राबविल्या जाणाऱ्या योजना या समूह संघटिकांच्या प्रयत्नांवर अवलंबून आहेत. त्यामुळे समूह संघटिकांची नियुक्ती महत्त्वपूर्ण समजली जाते.

काम न केल्यास कडक कारवाई 
समूह संघटिकांच्या कामांबद्दल समाज विकास विभागाकडे यापूर्वीही तक्रारी आल्या आहेत. त्याची दखल घेऊन त्यांच्यावर देखरेख ठेवण्यासाठी १२ सोशल वर्कर नियुक्त करण्यात आले आहेत. त्यांच्यामार्फत समूह संघटिकांच्या कामाचा नियमितपणे आढावा घेतला जाणार आहे. वस्ती स्तरावर थेट पोचून त्यांनी काम करणे अपेक्षित आहे. त्यात कुचराई झाल्यास कडक कारवाई होणार आहे. तसेच त्याबाबतचे नियम आणि सूचनाही समूह संघटिकांची यादी प्रसिद्ध करताना सांगण्यात येणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com