कमी छेदात होते "बायपास' शस्त्रक्रिया

योगीराज प्रभुणे
शुक्रवार, 29 सप्टेंबर 2017

तरुण हृदयरुग्णांना वरदायी ठरणारी पद्धती पुण्यात विकसित
पुणे - जेमतेम पाच सेंटिमीटरचा छेद घेऊन हृदयाची "बायपास' शस्त्रक्रिया करण्याचा नवीन प्रयोग पुण्यात यशस्वी होत असल्याचा विश्‍वास हृदयरोग शल्यचिकित्सकांनी वर्तविला आहे. तरुण आणि कमी जोखमीच्या रुग्णांवर या शस्त्रक्रिया होत आहेत.

तरुण हृदयरुग्णांना वरदायी ठरणारी पद्धती पुण्यात विकसित
पुणे - जेमतेम पाच सेंटिमीटरचा छेद घेऊन हृदयाची "बायपास' शस्त्रक्रिया करण्याचा नवीन प्रयोग पुण्यात यशस्वी होत असल्याचा विश्‍वास हृदयरोग शल्यचिकित्सकांनी वर्तविला आहे. तरुण आणि कमी जोखमीच्या रुग्णांवर या शस्त्रक्रिया होत आहेत.

येत्या शुक्रवारी (ता. 29) जागतिक हृदय दिन साजरा होत आहे. जीवघेण्या स्पर्धेमुळे वाढणारा ताणतणाव, नियमित व्यायाम आणि चौरस आहार यांचा अभाव; याबरोबरच धूम्रपान, मधुमेह यामुळे गेल्या काही वर्षांपर्यंत साठीच्या पुढे येणारा हृदयविकार आता पस्तीशीच्या उंबरठ्यावर गाठत आहे. याची बाधा होणाऱ्यांत तरुणांचे प्रमाण वेगाने वाढत आहे. हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या वाहिन्यांमध्ये तीन-चारपेक्षा जास्त अडथळे असल्यास त्यांना "बायपास'चा सल्ला दिला जातो. यापूर्वी बायपासची शस्त्रक्रिया करण्यासाठी छातीवर मोठा छेद घ्यावा लागत असे. छातीच्या बरगड्या कापून त्यानंतर हृदयावर शस्त्रक्रिया होत होती. पण, आता प्रगत वैद्यकशास्त्रामुळे हृदयाच्या बायपास शस्त्रक्रियेसाठी घ्यावा लागणारा काप लहान झाला आहेच, पण बरगड्याही कापाव्या लागत नाहीत, अशी माहिती प्रख्यात हृदय शल्यचिकित्सक डॉ. रणजित जगताप यांनी "सकाळ'शी बोलताना दिली.

डॉ. जगताप म्हणाले, 'हृदयाच्या बायपास शस्त्रक्रियेसाठी वापरण्यात येणाऱ्या तंत्रज्ञानात कालसापेक्ष बदल होत आहे. या शस्त्रक्रियेसाठी पूर्वी छातीवर घेतल्या जाणाऱ्या मोठ्या छेदाचा आकार आता पाच सेंटिमीटरपर्यंत कमी करता आला आहे. अर्थात, ही शस्त्रक्रिया प्रत्येक रुग्णावर करता येतेच असे नाही. काही निवडक रुग्णांवरच ही शस्त्रक्रिया करता येते. पारंपरिक पद्धतीने शस्त्रक्रिया करताना लागणाऱ्या वेळेपेक्षा यात काही वेळ जास्त लागतो. ही शस्त्रक्रिया तरुण रुग्णांवर करण्यास प्राधान्य दिले जाते.''

या नव्या पद्धतीने काही वर्षांपासून शस्त्रक्रिया सुरू असली तरीही यात सातत्याने सुधारणा होत आहेत. त्यामुळे लवकरच प्रत्येक रुग्णावर या पद्धतीने शस्त्रक्रिया करणे शक्‍य होईल, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला.

नव्या शस्त्रक्रिया पद्धतीचे फायदे
- कमी छेद घेऊन शस्त्रक्रिया होते
- शस्त्रक्रियेनंतर जखम लवकर भरते
- जंतूसंसर्गाचा धोका कमी होतो
- रुग्णालयातून लवकर घरी जाता येते
- शस्त्रक्रियेनंतरच्या गुंतागुंती कमी होतात

हृदयविकाराची लक्षणे
- छातीच्या मध्यभागी दुखणे
- अशक्त वाटणे
- घाम येणे
- घशा, जबड्यात ओढ येणे
- पाठीत दुखणे
- जळजळ करणे

काय काळजी घ्याल?
- मधुमेही रुग्णांनी नियमित वैद्यकीय तपासणी करावी
- चौरस आहार नियमित घ्यावा
- नियमित व्यायामाचा कटाक्ष हवा
- रक्तदाब नियंत्रित ठेवा