‘ब्‍ल्‍यू कॉलर जाॅब’बाबत तरुणाईमध्ये मोठे आैदासिन्‍य

‘ब्‍ल्‍यू कॉलर जाॅब’बाबत तरुणाईमध्ये मोठे आैदासिन्‍य

पुणे - पुणे जिल्ह्याच्या सुमारे ९५ लाख लोकसंख्येपैकी तब्बल ६२ टक्के लोक काम करण्यास सक्षम आहेत; परंतु ४१ टक्केच लोक प्रत्यक्ष काम करतात, जेव्हा की राज्याचे हे प्रमाण ४२ टक्‍क्‍यांपेक्षा अधिक आहे.

पुण्यासारख्या औद्योगिक, शैक्षणिक आणि पर्यटनदृष्ट्या आघाडीवर असलेल्या जिल्ह्यासाठी हे आकडे निश्‍चितच चिंताजनक आहेत. यात सर्वांत महत्त्वाची भूमिका ठरते ती जिल्ह्यातील तरुणांची. कामकरी वर्गाची संख्या वाढवण्यासाठी तरुण वर्गाकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे.

राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळाच्या (एनएसडीसी) अहवालात २०११ च्या जनगणनेचा आधार घेत पुणे जिल्ह्याचे सविस्तर चित्र मांडण्यात आले आहे. सर्वाधिक रोजगारनिर्मिती करणाऱ्या क्षेत्रांच्या तपशिलासह तरुणांच्या मानसिकतेबाबतही ऊहापोह करण्यात आला आहे. त्यातून जिल्ह्यातील तरुणाईचा कल बऱ्यापैकी स्पष्ट होतो. पुणे शहर, पिंपरी- चिंचवड आणि जिल्ह्यातील तरुणांचा आतला आवाज जाणून घेण्यासाठी ‘एनएसडीसी’ने तरुणांचे नमुना सर्वेक्षण केले. 

उच्चशिक्षण घेतल्याने नोकरीच्या संधी वाढतात म्हणून बहुतांश तरुण मंडळींचा उच्चशिक्षण घेण्याकडे कल आहे. शहर, जिल्ह्यातील सध्याच्या पायाभूत शैक्षणिक सुविधांबद्दल तरुणवर्गामध्ये समाधान आहे. शिक्षण दर्जेदार आहे, त्यासाठी पुरेशा संधी येथे उपलब्ध आहेत, असेही तरुणाईला वाटते. या जमेच्या बाजू असल्या, तरी बहुतांश तरुणाईची मानसिकता स्वत:च्या उद्योग- व्यवसायापेक्षा चांगल्या पगाराची नोकरी करण्याची आहे.

त्यासाठी शिक्षणावर अधिक खर्च झाला तरी चालेल, असे त्यांना वाटते. कोणत्या क्षेत्रात नोकरी करायला आवडेल? सर्वाधिक मागणी आहे ती माहिती तंत्रज्ञान आणि ऑटोमोबाईल क्षेत्राला. यातही त्यांना हवी आहे

‘व्हाइट कॉलर’ नोकरी!
भरपूर शिकण्याची तयारी आहे, त्यासाठी वाटेल ते श्रम घेण्याचीही तयारी आहे; मात्र स्वत:च रोजगारनिर्मिती करणारा व्हावे, असे त्यांना वाटत नाही. याचे मुख्य कारण पुण्यासारख्या औद्योगिक आणि सेवाक्षेत्रांमध्ये आघाडीवर असलेल्या शहरी भागात नोकऱ्यांच्या मुबलक संधी आहेत किंवा निर्माण होतील, असे त्यांना वाटते. त्यामुळे रोजगाराच्या वेगळ्या वाटा चोखाळण्याची मानसिकता असलेला युवावर्ग खूपच कमी आहे, असे ‘एनएसडीसी’चा अहवाल म्हणतो. 

पुणे जिल्ह्यात सर्वाधिक रोजगारनिर्मिती अर्थातच पुणे आणि पिंपरी- चिंचवड या जुळ्या शहरांमध्ये, तसेच लगतच्या औद्योगिक पट्ट्यांत झाली आहे. त्यात सेवाक्षेत्राचा वाटा सर्वाधिक म्हणजे ५२ टक्‍क्‍यांवर आहे. रोजगाराच्या बऱ्याच संधी निर्माण होत असताना, तरुणाईचा कल ‘ब्ल्यू कॉलर’ नोकऱ्यांऐवजी ‘व्हाइट कॉलर’ नोकऱ्यांकडे असल्याने मध्यंतरीच्या काळात पुणे आणि परिसरामध्ये प्रचंड वेगाने वाढलेल्या मध्यम आणि लघू उद्योगासमोर मोठ्या अडचणी निर्माण झाल्या. आधीच मंदीच्या गर्तेत अडकलेले हे क्षेत्र कुशल कामगार आणि कर्मचाऱ्यांअभावी आणखी अडचणीत आले. कारण या क्षेत्रातील नोकऱ्या प्रतिष्ठेच्या नाहीत, असे तरुणवर्गाला वाटते. त्यांच्यासमोर ‘आयटी’ क्षेत्रात काम करणाऱ्या तरुणांचे उदाहरण आहे.   
२०२२ पर्यंतच्या कालखंडाचा आलेख मांडणाऱ्या अहवालामध्ये या काळात सुमारे २८ लाख रोजगार निर्माण होण्याचा अंदाज वर्तवला आहे. ते प्रामुख्याने ऑटो, कोअर आयटी, आयटी सव्हिर्सेस, बॅंकिंग, वित्तीय, विमा, संघटित किरकोळ विक्री व्यवसाय, रियल इस्टेट अशा क्षेत्रांमध्ये निर्माण होतील.

कुशल आणि अर्धकुशल कामगार आणि कर्मचाऱ्यांना सर्वाधिक मागणी असेल, असे अहवाल सांगतो. मात्र, तरुणांची मानसिकता पाहता मागणी आणि पुरवठा यांतील दरी कायम राहण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे अधिकाधिक तरुणांना स्वतःच्या व्यवसायाकडे कसे वळवता येईल आणि ‘ब्ल्यू कॉलर जॉब’साठीही कसे राजी करता येईल यावर विचार व्हायला हवा. स्वतःचा व्यवसाय, मग तो छोटा- मोठा असला तरी प्रतिष्ठेचाच असतो.

कारण तो स्वतःने उभा केलेला असतो. पुण्यासारख्याच नव्हे, तर राज्याच्या अन्य भागांतही तरुणाईला नोकऱ्यांबरोबरच स्व-उद्योगनिर्मितीकडे आकर्षित करणे गरजेचे आहे, असा स्पष्ट संदेश या अहवालाने दिला आहे. त्यासाठी शिक्षणप्रक्रियेमध्ये काही बदल करावे लागतील, त्यासाठी सरकारनेही मानसिकता बदलण्याची गरज आहे.

‘स्वॉट’ विश्‍लेषण
पुणे जिल्ह्याचे ‘स्वॉट’ विश्‍लेषण अहवालात करण्यात आले आहे. मुबलक शैक्षणिक सुविधा, रस्ते, रेल्वे आणि हवाई मार्गाद्वारे दळणवळणाची चांगली सुविधा, उत्तम औद्योगिक वातावरण हे घटक पुणे जिल्ह्याचे सामर्थ्य आहे; तर आधुनिक विमानतळ, महागड्या जमिनी, औद्योगिक क्षेत्रातील घटते भूखंड या कमकुवत बाजू आहेत. आयटी, आयटीई, वस्त्रोद्योग, आरोग्य सुविधा, ऑटो उत्पादन, औषध उत्पादन, अन्नप्रक्रिया, मालमत्ता आणि बांधकाम, शिक्षण आणि कौशल्यविकास आदी क्षेत्रांत प्रचंड संधी आहेत. चीनसारख्या देशामुळे आयटी क्षेत्रात वाढलेली स्पर्धा, बांधकाम व्यवसायासारख्या क्षेत्रात युवकांना आकर्षित करण्यात येणाऱ्या अडचणी ही पुण्यासमोरील आव्हाने आहेत.
(‘स्वॉट’ विश्‍लेषण म्हणजे, अंगभूत सामर्थ्य, कमकुवत बाजू, संधी आणि आव्हाने मांडणारा ताळेबंद)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com