हवे ते चित्र काढ अन्‌ एन्जॉय कर...

मॉर्डन हायस्कूल - चित्रकला स्पर्धेत सहभागी झालेल्या स्पर्धकांची केंद्रबाहेर वाट पाहणारे पालक.
मॉर्डन हायस्कूल - चित्रकला स्पर्धेत सहभागी झालेल्या स्पर्धकांची केंद्रबाहेर वाट पाहणारे पालक.

पुणे - आपल्या मनात दडलेल्या कल्पना विविध रंगांचा वापर करून कोऱ्या कागदावर उतरविण्यासाठी लहान मुलांची सुरू असलेली लगबग... त्यांच्या इवल्याशा हातांनी कोऱ्या कागदावर काय चितारले जातंय, याबाबत प्रचंड उत्सुकता असणारे पालक वारंवार परीक्षेच्या ठिकाणी डोकावत होते.

 ‘मुलांच्या वाढीत चित्रकलेचा वाटा मोलाचा असतो. या स्पर्धेच्या माध्यमातून मुलांच्या कल्पकतेला वाव मिळत असून लहान मुले मोठ्या उत्सुकतेने या स्पर्धेची वाट पाहत असतात, अशा भावना पालकांनी या वेळी व्यक्त केल्या.
‘सकाळ चित्रकला स्पर्धे’त मोठ्या उत्साहाने विद्यार्थी सहभागी झाले होते. या विद्यार्थ्यांना स्पर्धेच्या केंद्रावर घेऊन आलेल्या पालकांच्या चेहऱ्यावरही उत्साह ओसंडून वाहत होता. ‘मुलांची रंगपेटी विसरली’, ‘अरे, हा रंग नाही आणला’, अशी वाक्‍य स्पर्धा सुरू होण्यापूर्वी कानावर पडत होते. स्पर्धा केंद्रावर पालकांची धावपळ सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळाले. ‘प्रश्‍नपत्रिका नीट वाच आणि जे चित्र काढणे सोपे वाटते तेच काढ’, ‘रंगसंगतीवर अधिक भर दे’, ‘तुला हवे ते चित्र काढ आणि एन्जॉय कर’, अशा सूचनाही पालक विद्यार्थ्यांना देत होते. 

‘मुलांच्या वाढीत चित्रकलेला विशेष महत्त्व आहे. शाब्दिक, भाषिक संवादाच्या आधीही मुले अनेकदा चित्रातून संवाद साधत असतात. लहान मुले आणि चित्रकला यांचे नाते फारसे खास आहे. प्रत्येक मुलामध्ये एक चित्रकार दडलेला असतो’’, अशा भावना पालकांनी व्यक्त केल्या.

पालक म्हणतात...
सारिका कस्तुरे -
 लहान मुलांच्या आवडीचा विषय म्हणजे चित्रकला. रंगाच्या दुनियेत मुले रमून जातात. वेगवेगळ्या रंगछटांचा वापर करून कोरा कागद रंगविण्याची मज्जा काही औरच असते. ‘सकाळ’च्या चित्रकला स्पर्धेमुळे मुलांच्या कल्पकतेला वाव मिळत आहे. चित्र काढण्यापूर्वी मुले विचार करून कलाकृती साकारताना दिसत आहेत. 

योगिता शेडगे - माझ्या दोन्ही मुली सहकारनगरमधील मुक्तांगण इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये आहेत. त्या दोघी स्पर्धेत सहभागी होण्यासाठी रविवार पेठेत आल्या आहेत. दोघींनाही चित्रकलेची प्रचंड आवड असल्यामुळे त्यांनी मोठ्या उत्साहाने स्पर्धेत सहभाग नोंदविला. रंगांमध्ये रमणे हा त्या दोघींचा छंद आहेच; पण ‘सकाळ’ने त्यांच्या कलेला व्यासपीठ मिळवून दिलेल्याचे समाधान आहे.

अनुराधा मेंगजी - चित्रकला हा मुलांच्या आवडीचा छंद आहे. मुलांना चित्र काढायला खूप आवडते. त्यामुळे मोठ्या उत्साहाने मुले या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी इच्छुक असतात. चित्रकला स्पर्धेचा विषयही मुलांना स्पर्धा सुरू झाल्यावर कळतो आणि त्यानंतर ती आपली शक्कल लढवून चित्र रेखाटतात, यातून त्याच्या कल्पकतेला चालना मिळत आहे. स्पर्धेमुळे मुलांमधील चित्रकलेची आवड जोपासली जात आहे.

पराग शेल्लीकेरी - ‘सकाळ’तर्फे आयोजित चित्रकला स्पर्धेमुळे वेगवेगळ्या ठिकाणची मुले एकाच व्यासपीठावर येतात. त्यातून मुलांमधील ‘शेअरिंग’ वाढत आणि त्यांना भरपूर शिकायला मिळते. हेच या स्पर्धेचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल. स्पर्धेतून मुलांच्या कल्पकतेला वाव मिळत असून, रंगांशी असणारे त्याचे नाते अधिक दृढ होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com