गोटा खोबरे, खोबरेल तेलाच्या भावांत तेजी 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 11 सप्टेंबर 2017

पुणे - नारळाचे उत्पादन कमी झाल्याने या वर्षी नारळाबरोबरच गोटा खोबरे, खोबरेल तेलाच्या भावांत तेजी आली आहे. खोबरेल तेलाच्या भावांत प्रतिपंधरा किलोमागे पाचशे, तर गेल्या महिन्याभरात गोटा खोबऱ्याच्या भावांत प्रतिदहा किलोमागे सहाशे रुपये इतकी वाढ झाली आहे. 

पुणे - नारळाचे उत्पादन कमी झाल्याने या वर्षी नारळाबरोबरच गोटा खोबरे, खोबरेल तेलाच्या भावांत तेजी आली आहे. खोबरेल तेलाच्या भावांत प्रतिपंधरा किलोमागे पाचशे, तर गेल्या महिन्याभरात गोटा खोबऱ्याच्या भावांत प्रतिदहा किलोमागे सहाशे रुपये इतकी वाढ झाली आहे. 

तमिळनाडू, कर्नाटक, केरळ या राज्यात नारळाचे उत्पादन घेतले जाते. गेल्या वर्षी अपेक्षित पाऊस न झाल्याचा परिणाम तेथील नारळाच्या उत्पादनावर झाला आहे. या वर्षी नारळाचे उत्पादन कमी झाले आहे. त्याचा परिणाम गणेशोत्सवापाठोपाठ नवरात्र, दिवाळी या सणांवर पडणार आहे. जून महिन्यापासूनच गोटा खोबरे आणि खोबरेल तेलाच्या भावांत वाढ होत गेली. सातत्याने या दोन्ही मालाचे भाव वधारत असून, गणेशोत्सवापूर्वी नारळाच्या भावांत तेजी आली. नारळाच्या प्रति शेकड्याच्या गोणीमागे गेल्या वर्षीच्या तुलनेत कमीत कमी पाचशे रुपयांचा फरक पडलेला आहे. पुढील काळात नवरात्र, दिवाळी असून, या कालावधीत नारळ, गोटा खोबरे यांची मागणी कायम राहील. त्यामुळे त्यांचे भाव कमी होण्याची चिन्हे नाहीत. खोबरेल तेलाचा स्वयंपाक केला जात नाही, त्यामुळे त्याचा थेट परिणाम जाणवत नाही. 

गोटा खोबऱ्याची पुण्यातील बाजारात कर्नाटकातून आवक होत असते. याबाबत व्यापारी सुरेश अगरवाल म्हणाले, ""केरळमध्ये खोबरा वाटी तयार केली जाते. तिला मराठवाडा आणि कोकण भागात जास्त मागणी असते. पश्‍चिम महाराष्ट्रात गोटा खोबऱ्याला मागणी राहते. जूनपासून गोटा खोबऱ्याचे भाव वधारू लागले आहेत. श्रावण महिन्यात उत्तर भारतातून विशेषतः राखी पौर्णिमेच्या कालावधीत मागणी वाढली होती. तीन वर्षांपूर्वी अशीच परिस्थिती झाली होती. गोटा खोबऱ्याच्या घाऊक बाजारातील प्रतिकिलोचा भाव हा 200 रुपयांपर्यंत पोचला होता. हीच स्थिती निर्माण होण्याची शक्‍यता वाटत आहे.'' 

खाद्यतेलाचे व्यापारी कन्हय्यालाल गुजराथी यांनीदेखील गोटा खोबऱ्याच्या भाववाढीचा परिणाम हा खोबरेल तेलाच्या भावांवर पडल्याचे स्पष्ट केले. ते म्हणाले, 

""केरळ वगळता इतर राज्यांत या तेलाचा स्वयंपाकात वापर कमी आहे. कच्च्या मालाचे भाव वाढल्याने उत्पादनखर्चात वाढ होत असते, त्याचा परिणाम विक्रीच्या भावांवर झाला आहे. तुलनेत आपल्याकडे केसांना लावण्यासाठीच त्याचा वापर होत असल्याने तेवढी झळ ग्राहकाला बसणार नाही.'' 

यावर्षी देखील नारळ उत्पादक राज्यांत पावसाचे प्रमाण समाधानकारक नसल्याचे नारळाचे व्यापारी दीपक बोरा यांनी सांगितले. पुढील हंगाम हा मार्च महिन्यात सुरू होईल. नारळाचे उत्पादन हे पावसाच्या पाण्यावरच अवलंबून असते. पुढील काळात पावसाने हजेरी लावली तर पुढील हंगामात काही प्रमाणात दिलासा मिळू शकेल, असेही त्यांनी नमूद केले.

Web Title: pune news coconut oil