नगरसेवकांची झाडाझडती

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 3 जुलै 2017

भाजप शहराध्यक्ष गोगावले यांच्याकडून कानउघाडणी

पुणे - ‘तुमच्या प्रतिमेमुळे नाही, तर नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतिमेमुळे तुम्ही निवडून आला आहात’, ‘महापालिकेत पक्षाच्या जाहीरनाम्यानुसार काम व्हायला पाहिजे’, ‘भाजप व्यक्तिकेंद्रित नाही, तर संघटनाकेंद्रित पक्ष आहे, याची जाणीव ठेवा’ अशा शब्दांत भारतीय जनता पक्षाच्या शहराध्यक्षांनी नगरसेवकांची शनिवारी झाडाझडती घेतली. 

महापालिकेत भाजपची सत्ता आल्यावर शहराध्यक्ष योगेश गोगावले यांनी महिला व बालकल्याण, विधी समिती, क्रीडा समिती आणि शहर सुधारणा समितीच्या सदस्यांची महापौर बंगल्यावर एका पाठोपाठ एक शनिवारी बैठका घेतल्या. समित्यांचे सदस्य बैठकीला उपस्थित राहतील, याकडेही विशेष लक्ष देण्यात आले होते. त्यामुळे चारही समित्यांचे अध्यक्ष आणि बहुसंख्य सदस्य उपस्थित होते. गेल्या तीन महिन्यांत काय काम केले, कोणते निर्णय घेतले, आगामी काळातील दिशा काय आहे, याची माहिती अध्यक्षांनी घेतली. पक्षांतर्गत कुरबुरींचीही नोंद त्यांनी घेतली. २४ तास पाणीपुरवठ्यासाठी कर्ज रोखे, केबल डक्‍टचा प्रस्ताव या बाबत नगरसेवकांच्या एका गटाने विरोध करण्याची भूमिका घेतली होती. त्याची दखल घेत, गोगावले यांनी, ‘पक्षाने निर्णय घेतल्यावर त्याची अंमलबजावणी झालीच पाहिजे’, असेही त्यांनी निक्षून सांगितले. अनेक नगरसेवकांनी प्रभागांत संपर्क कार्यालये सुरू केली नाहीत, याबद्दल त्यांनी नापसंती व्यक्त केली. नागरिकांना ठराविक वेळ दिलाच पाहिजे, असेही त्यांनी सांगितले. महापालिकेतील पक्षाच्या कामाकडे प्रदेश आणि केंद्रीय स्तरावरूनही लक्ष ठेवले जाते. महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यापूर्वी पक्षाशी चर्चा केली पाहिजे, कामे करताना चुका होणार नाहीत, याची काळजी घेण्यासही त्यांनी नगरसेवकांना बजावले. दरम्यान, या बैठकांबद्दल बोलताना, काही कार्यकर्त्यांनी ‘नव्यांना जमत नाही, अन्‌ जुन्यांना रुचत नाही,’ अशी प्रतिक्रिया ‘सकाळ’कडे व्यक्त केली.

दर महिन्याला अहवाल 
पक्षाच्या महापालिकेतील नगरसेवकांच्या कामगिरीचा कार्य अहवाल दर महिन्याच्या पाच तारखेला प्रदेश आणि केंद्र स्तरावर पाठविण्यास पक्षाने सुरवात केली आहे. महापालिकेत एका महिन्यात कोणते निर्णय झाले, आगामी प्रकल्प, योजना कोणत्या राबविणार आहोत, आदींच्या माहितीचा त्यात समावेश आहे, असे पक्षाकडून सांगण्यात आले.