वाटमारी करणारी टोळी जेरबंद 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 23 जून 2017

तळेगाव स्टेशन - मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर वाहनचालकांना अडवून लुटमार करणारी सात दरोडेखोरांची टोळी तळेगाव पोलिसांनी अवघ्या तीन तासांत गुरुवारी पहाटे जेरबंद केली. पकडलेले सर्व दरोडेखोर नगर जिल्ह्यातील नेवासा आणि शेवगाव तालुक्‍यातील आहेत. 

तळेगाव स्टेशन - मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर वाहनचालकांना अडवून लुटमार करणारी सात दरोडेखोरांची टोळी तळेगाव पोलिसांनी अवघ्या तीन तासांत गुरुवारी पहाटे जेरबंद केली. पकडलेले सर्व दरोडेखोर नगर जिल्ह्यातील नेवासा आणि शेवगाव तालुक्‍यातील आहेत. 

गुरुवारी पहाटे मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील ओझर्डे ओव्हरब्रीजखाली गाडी थांबवून तोंड धुणाऱ्या दांपत्यास चाकूचा धाक दाखवून त्यांच्याकडील सोन्याची चैन, घड्याळ आणि पाच हजार रोख असा एकूण 50 हजारांचा ऐवज लुटला. त्यानंतर दरोडेखोर शेजारच्या डोंगरात पसार झाले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिसर पिंजून काढला. त्यांना एक व्यक्ती संशयास्पदरीत्या फिरताना दिसली, त्याची चौकशी केली असता त्याने इतर साथीदार डोंगरात पुलाखाली लपल्याचे सांगितले. पोलिस पथकाने त्वरित ट्रॅप लावून सात जणांसह एक अल्टो, एक सॅन्ट्रो अशा दोन कार आणि हत्यारे असा दोन लाखांचा मुद्देमाल जप्त केला. 

अविनाश अरुण खंडागळे (22, गंगानगर, ता. नेवासा), कैलास लक्ष्मण चांदणे (23, संभाजीनगर, नेवासा फाटा), संतोष सुंदर घुणे (23, बहिरवाडी, ता. नेवासा), संदीप कचरू भालेराव (27, गंगानगर, ता. नेवासा), सचिन रतन कांबळे (20, सामनगाव, ता. शेवगाव), बाळकृष्ण ज्ञानेश्वर मंडलिक (25, संभाजीनगर, ता. नेवासा), प्रदीप ज्ञानेश्वर मंडलिक (22, संभाजीनगर, ता. नेवासा) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. गुन्हेगारांची पार्श्‍वभूमी तपासली असता त्यांच्यावर नगर, बुलढाणा, पुणे जिल्ह्यात जबरी चोरी, बेकायदा शस्त्रे बाळगणे, दरोडा अशा गंभीर प्रकारचे गुन्हे नोंद असल्याचे निष्पन्न झाले.