अकार्यक्षमतेमुळे ‘सीएसआर’ परतीच्या वाटेवर

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 28 जुलै 2017

पुणे - ससून रुग्णालयातील अकरा मजली इमारतीच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे बांधकाम रखडल्याने उद्योगांच्या सामाजिक जबाबदारीतून (सीएसआर) वैद्यकीय उपकरणे आणि अद्ययावत पायाभूत सुविधांसाठी उभारलेला कोट्यवधी रुपयांचा निधी परतीच्या वाटेवर असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. 

पुणे - ससून रुग्णालयातील अकरा मजली इमारतीच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे बांधकाम रखडल्याने उद्योगांच्या सामाजिक जबाबदारीतून (सीएसआर) वैद्यकीय उपकरणे आणि अद्ययावत पायाभूत सुविधांसाठी उभारलेला कोट्यवधी रुपयांचा निधी परतीच्या वाटेवर असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. 

सरकारी रुग्णसेवेचा दर्जा उंचावण्यासाठी ससून रुग्णालयात नव्याने अकरा मजली इमारत बांधण्याचा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. गेल्या आठ वर्षांमध्ये या इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले; पण त्याच्या दारे-खिडक्‍यांसह अंतर्गत काम रखडले आहे. राज्य सरकारने यासाठी निधीही उपलब्ध करून दिला आहे. मात्र, सार्वजनिक बांधकाम विभागाला (पीडब्ल्यूडी) या कामासाठी मुहूर्त सापडला नाही. त्यामुळे या इमारतीचे काम रेंगाळले आहे. त्याचा थेट फटका ‘सीएसआर’च्या माध्यमातून संकलित केलेल्या कोट्यवधी रुपयांच्या निधीला बसला आहे. नव्याने उभारण्यात येत असलेल्या अकरा मजली इमारतीमध्ये दोन अद्ययावत शस्त्रक्रिया कक्ष तयार करण्यासाठी नॅशनल इन्शुरन्स प्रायव्हेट लिमिटेड यांनी चार कोटी ३९ लाख ८० हजार रुपयांचा निधी मंजूर केला आहे. मंत्रा बिल्डर यांनीही अद्ययावत सुविधांसाठी दोन कोटी रुपये तर, बॅंक ऑफ न्यूयॉर्कने दीड कोटी रुपये ‘सीएसआर’मधून मान्य केले आहेत. ज्या इमारतीसाठी हा निधी वापरण्यात येणार आहे तिचे काम रेंगाळले आहे. त्यामुळे उपकरणे व सुविधांसाठी ‘सीएसआर’मधून मिळालेला निधी परत जाण्याचा धोका निर्माण झाल्याची माहिती नाव न सांगण्याच्या अटीवर ससून रुग्णालयातील डॉक्‍टरांनी दिली. 

या इमारतीच्या सविस्तर नकाशांना मंजुरी मिळाली आहे. त्यासाठी निधी उपलब्ध आहे. मात्र, निविदाप्रक्रिया संथ गतीने होत असल्याने इमारतीचे बांधकाम पूर्ण होत नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. 

इमारतीची सद्यःस्थिती
सरकारी रुग्णालयांची प्रतिमा बदलण्याच्या उद्देशाने अकरा मजली इमारतीचे बांधकाम नऊ वर्षांपूर्वी सुरू करण्यात आले. या दरम्यान इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले. मात्र, रेंगाळलेल्या अंतर्गत कामांना गती मिळत नसल्याची माहिती पुढे आली आहे. दोन वर्षांपासून अकरा मजल्यांमधील वॉर्ड, तेथील खोल्या बसविलेल्या टाइल्सवर धुळीचे थर बसले आहेत. पायऱ्यांवर मातीचे ढिगारे पडले आहेत. येथील प्रत्येक खोलीत, वॉर्ड आणि स्वच्छतागृहांपर्यंत वीजपुरवठ्याचे काम पूर्ण झाले आहे. 

Web Title: pune news CSR Sassoon Hospital