सोने घ्या, सोन्यासारखे राहा...

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 2 ऑक्टोबर 2017

शहरात दसरा उत्साहात साजरा; रावण दहनासाठी गर्दी

शहरात दसरा उत्साहात साजरा; रावण दहनासाठी गर्दी
पुणे - दाराला लावलेले झेंडू व आंब्याच्या पानांचे तोरण...सकाळपासूनच घर, कार्यालय, कंपन्यांमध्ये वस्तू, मशिनरी, वाहने स्वच्छ धुऊन त्यांच्या पूजनासाठी चाललेली लगबग...दुपारी काहीशी विश्रांती घेऊन सायंकाळी पुन्हा मित्र, आप्तेष्टांकडे जाऊन त्यांना आपट्याची पाने देत "सोने घ्या, सोन्यासारखे राहा' असा आशीर्वाद घेण्यासाठी धडपड करणारी बच्चे कंपनी, तर रात्री ठिकठिकाणी फटाक्‍यांच्या आताषबाजीमध्ये रावण दहनासाठी झालेली गर्दी, अशा आनंदोत्सवी वातावरणात शनिवारी दसरा शहरात साजरा झाला. काही राजकीय पक्ष, संस्था, संघटना यांनी विधायक पद्धतीने हा सण साजरा केला. काही ठिकाणी भ्रष्टाचार, बेरोजगारी व चिनी वस्तुरूपी रावणाचे दहन करण्यात आले.

शनिवारी सकाळपासूनच प्रत्येक घरी नव्या-जुन्या वस्तू, वाहने धुण्यासाठीची लगबग सुरू होती. त्यानंतर आंब्याची पाने आणि झेंडूच्या फुलांपासून बनविलेले तोरण घराच्या दाराला लावण्याचा प्रयत्न सुरू होता. त्यानंतर घरातील नव्या-जुन्या, छोट्या-मोठ्या वस्तू आणि दारासमोर लावलेल्या वाहनांना हार घालून त्यांची पूजा करण्यात आली. नवीन वाहने, वस्तूंचीही विधिवत पूजा करून एकमेकांना पेढे, मिठाई भरवत असल्याचे होते.

सकाळची लगबग दुपारी काही प्रमाणात कमी झाली. त्यानंतर गोडधोड जेवणाचा आस्वाद घेत काही वेळ आराम करण्यावर नागरिकांनी भर दिला. त्यानंतर सायंकाळी आपले कुटुंबीय, शेजारी आणि मित्र-मैत्रिणींच्या घरी जाऊन आपट्याची पाने एकमेकांना देऊन नागरिक एकमेकांना शुभेच्छा देत होते. लहानग्यांच्या आग्रहामुळे जवळच्याच मैदानातील रावण दहनाच्या कार्यक्रमाला उपस्थिती लावली.

विविध सामाजिक संस्था, संघटना, राजकीय पक्षांनी विधायक पद्धतीने सण साजरा करण्यावर भर दिला. पुणे नवनिर्माण सेवा (संघ) जगदीप महिला मंडळाच्या अध्यक्षा रेवती लिंबोरे यांच्या हस्ते कष्टकरी महिलांना साडी-चोळी, मिठाई देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. गौरी पैठणकर यांच्या हस्ते 21 बालिकांचे कन्यापूजन झाले. गुरुवार पेठेमध्ये महिलांसाठी महाभोंडला आणि आइस्क्रीम पार्टी आयोजित केली होती, तर फटाक्‍यांच्या आताषबाजीमध्ये चिनी वस्तुरूपी रावणाचे दहन करून मिठाई वाटप करण्यात आली. अजय पैठणकर, राजेंद्र भागणे, सुरेश पारखे, प्रथमेश पैठणकर आदी उपस्थित होते.