व्यायामातून मधुमेहावर नियंत्रण

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 5 नोव्हेंबर 2017

मनातील भावनांचा अतिरेक आरोग्यासाठी अपायकारक ठरतो. मनातील विचार मेंदूवर परिणाम करतात. म्हणून मनाचे व्यवहार चांगले ठेवा. शरीरातील साखर नियंत्रित ठेवा. त्यासाठी मनाची प्रसन्नता आणि व्यायामावर भर द्या. अपेक्षा बदलल्या तर मन प्रसन्न राहील. 
- डॉ. ह. वि. सरदेसाई 

पुणे : "नोकरी, व्यवसाय व कामाचा आरोग्यावर नक्कीच परिणाम होतो. जीवन व कार्यशैलीमुळे तणाव वाढतोच. त्यातूनच मधुमेहाला निमंत्रण मिळते. त्यादृष्टीने तरुणांनी जीवन व कार्यशैलीत बदल करून व्यायाम, आहार, वेळेचे नियोजन करावे. त्याचबरोबर सकारात्मक दृष्टिकोन ठेवल्यास मधुमेह टाळता येईल,'' असा सल्ला मधुमेही तज्ज्ञ आणि विविध कंपन्या, बॅंकांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शनिवारी दिला. 

डायबेटिक असोसिएशन ऑफ इंडियाच्या पुणे शाखेतर्फे "वर्क अँड लाइफ बॅलन्स' या विषयावर परिसंवाद घेण्यात आला. या वेळी संस्थेचे अध्यक्ष डॉ. ह. वि. सरदेसाई, मर्सिडीज बेंझचे उपाध्यक्ष सुहास कडलासकर, सारंग जोशी, किर्लोस्कर ऑइल इंजिनचे आर. आर. देशपांडे, पर्सिस्टंट सिस्टिमच्या कॉर्पोरेट युनिटचे अध्यक्ष अतुल खाडिलकर, विलास काटे, सारस्वत बॅंकेचे सरव्यवस्थापक अभय लिमये, डॉ. भास्कर हर्षे उपस्थित होते. 25 वर्षांहून अधिक काळ मधुमेहाशी लढा देणाऱ्यांचा या वेळी सत्कार करण्यात आला. 

"आयटी'तील कार्यशैलीबद्दल बारहाते म्हणाले, ""देशातील माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात 36 लाख कामगार आहेत. त्यापैकी 20 टक्के जणांना मधुमेह आहे. कामाचा ताण, व्यसन व "फास्टफूड'मुळे मधुमेहाची शक्‍यता वाढते. म्हणूनच आम्ही कर्मचाऱ्यांना घरीच काम करण्यास सांगतो. याबरोबरच जीम, ध्यानधारणा केंद्रासारख्या सुविधा दिल्या आहेत.'' 

किर्लोस्करमधील अनुभवाविषयी देशपांडे म्हणाले, ""आमच्या कंपनीमध्ये आरोग्य तपासणीला प्राधान्य दिले जाते. ज्येष्ठ कर्मचाऱ्यांची जास्त काळजी घेतली जाते. वेळ व व्यायामाचे नियोजन केल्यास आरोग्य निरोगी राहील.'' 

खाडिलकर म्हणाले, ""कामाचा ताण नक्कीच आहे. विशेषत: अन्य देशांच्या "टाइम झोन'मुळे तर त्यात आणखी भर पडते. मात्र प्रत्येक दिवसाचे काम करत आनंदही घेता यावा, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.'' 

बॅंकेच्या कर्मचाऱ्यांविषयी लिमये म्हणाले, ""बॅंकेमध्ये आर्थिक व्यवहार, स्पर्धा, ग्राहक व त्या-त्या दिवसांचे लक्ष्य, अशा कारणांमुळे ताण वाढतो. मात्र बॅंकाही हा ताण कमी करण्यासाठी प्रयत्न करतात.'' सुधीर गाडगीळ यांनी सूत्रसंचालन केले. 

मनातील भावनांचा अतिरेक आरोग्यासाठी अपायकारक ठरतो. मनातील विचार मेंदूवर परिणाम करतात. म्हणून मनाचे व्यवहार चांगले ठेवा. शरीरातील साखर नियंत्रित ठेवा. त्यासाठी मनाची प्रसन्नता आणि व्यायामावर भर द्या. अपेक्षा बदलल्या तर मन प्रसन्न राहील. 
- डॉ. ह. वि. सरदेसाई 

मधुमेह टाळण्यासाठी हे करावे 
* सकाळी व संध्याकाळी प्रत्येकी 40 मिनिटे चालावे 
* व्यायामावर भर द्यावा 
* फास्टफूड, जंकफूड टाळावा 
* सकस आहारच घ्यावा. 
* कायम तणावमुक्त राहावे.

Web Title: Pune news Diabetes person on exercise