केंद्रसरकारच्या चुकीच्या आर्थिक धोरणाचा बँका पतसंस्थाना फटका: वळसे पाटील

डी. के. वळसे पाटील
गुरुवार, 28 सप्टेंबर 2017

मंचर (पुणे) : नोटाबंदीच्या व केंद्रसरकारच्या चुकीच्या आर्थिक धोरणामुळे अर्थव्यवस्था रसातळाला गेली आहे. त्याचे परिणाम आता सहकारी बँका, पतसंस्था व सामान्य माणसांनाही सोसावे लागत आहेत, असे विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले.

मंचर (पुणे) : नोटाबंदीच्या व केंद्रसरकारच्या चुकीच्या आर्थिक धोरणामुळे अर्थव्यवस्था रसातळाला गेली आहे. त्याचे परिणाम आता सहकारी बँका, पतसंस्था व सामान्य माणसांनाही सोसावे लागत आहेत, असे विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले.

मंचर (ता. आंबेगाव) येथे आज (गुरुवार) शरद बँकेच्या ४४ व्या वार्षिक सर्वसधारण सभेत वळसे पाटील बोलत होते. अध्यक्षस्थानी शरद बँकेचे अध्यक्ष देवेंद्र शहा होते. यावेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, आंबेगावच्या सभापती उषा कानडे, नंदकुमार सोनावळे, बाळासाहेब बेंडे, अरुणा थोरात, पांडुरंग पवार, बाळासाहेब बाणखेले, गणपतराव कोकणे, सीताराम जाधव व सर्व संचालक उपस्थित होते.

भाजपचे जेष्ठ नेते माजी अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी देशातील अर्थ व्यवस्थेबाबत व्यक्त केलेल्या मतांचा संदर्भ देवून वळसे पाटील म्हणाले, 'जगामध्ये अनेक देशात अर्थव्यवस्था अडचणीत असतानाही भारताची अर्थव्यवस्था मजबूत ठेवण्याचे काम तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी केले. त्यावेळी विकासदर नऊ टक्के होता. आता विकास दर पाच ते साडेपाच टक्क्यापर्यंत खाली आला आहे. सध्या जागतिक बाजारपेठेत क्रूड ऑइल तेलाचे बाजारभाव स्वस्त असूनही देशात पेट्रोल व डीझेलच्या दरात भरमसाट वाढ केली. शेतीमालाचे घसरलेले बाजारभाव व शेतकरी कर्जमाफी बाबत सतत बदलत्या धोरणामुळे बँकांच्या कर्ज वसुलीवर मोठा परिणाम झाला आहे. शरद बँकेची आर्थिक परीस्थिती सक्षम आहे. जी एस टी मुळे व्यापारी वर्ग हैराण झाला आहे. समाजातील सर्व घटकांमध्ये असुरक्षतेची भावना निर्माण झाली आहे.'

शहा म्हणाले, 'कर्ज माफी होणार या अपेक्षेने अनेकांनी मार्च अखेर कर्ज भरले नाही. त्याचाही परिणाम बँकेच्या नफ्यावर झाला आहे. नोटाबंदीच्या काळात बँकेचे आर्थिक व्यवहार सुरु होते. रिझर्व बँकेने शरद बँकेचे अभिनंदन केले. एक कोटी ७८ लाख नफा झाला आहे. सभासदांना दिवाळी निमित्त भेट वस्तू दिली जाईल.'

सभा खेळीमेळिच्या वातावरणात पार पडली. जे. एल. वाबळे, यशवंत इंदोरे, दादाभाऊ पोखरकर, जयवंत साळुंके यांनी चर्चेत भाग घेतला. मुख्य कार्यकारी अधिकारी राजाराम गुरव व ज्योस्ना काकडे यांनी अहवाल वाचन केले. बँकेचे उपाध्यक्ष शिवाजीराव लोंढे यांनी प्रास्ताविक केले. संचालक विनायकराव तांबे यांनी सूत्रसंचालन व दत्ता थोरात यांनी आभार मानले.