लक्ष...लक्ष पणत्यांचा दीपोत्सव

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 4 नोव्हेंबर 2017

पुणे - "ओम नमः शिवाय...., हर हर भोले, नमः शिवाय'च्या नामस्मरणात तल्लीन झालेले भाविक.... कार्तिक शुद्ध पौर्णिमेच्या मुहूर्तावर तिन्हीसांजेला घरोघरी कुलदैवतांसमोर उजळलेल्या त्रिपुरवाती, लक्ष...लक्ष पणत्यांचा दीपोत्सव, तारकाक्ष, कमलाक्ष, विद्युन्माली या त्रिपुरासुरांचे दहन आणि मठ-मंदिरांत देवादिकांसमोर अन्नकोटाचा महानैवेद्य दाखवून शहर व उपनगरांतील पुणेकरांनी त्रिपुरारी पौर्णिमा उत्साहात साजरी केली.

शनिवार पेठेतील ओंकारेश्‍वर देवस्थानतर्फे मंदिरात आयोजित कार्यक्रमात नृत्यांगना गौरी दैठणकर व सहकलाकारांनी शिव तांडव नृत्य सादर केले. पालकमंत्री गिरीश बापट, महापौर मुक्ता टिळक, नगरसेवक राजेश येनपुरे, गायत्री खडके, दीपक पोटे, देवस्थानचे विश्‍वस्त धनोत्तम लोणकर यांच्यासह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत त्रिपुरासुरांचे दहन करण्यात आले. चतुःशृंगी देवस्थान येथे नवचैतन्य हास्ययोग परिवारातर्फे पाच हजार पणत्या तेवून दीपोत्सव करण्यात आला. या वेळी प्रतिभा शाहू मोडक, डॉ. सतीश देसाई, विठ्ठल काटे, डॉ. मिलिंद भोई, मकरंद टिल्लू, रामदास चौंडे, देवस्थानचे अध्यक्ष सुहास अनगळ उपस्थित होते.

बाजीराव रस्त्यावरील आनंदाश्रमातही सच्चिदानंद शिव मंदिरात मंत्रजागर करून अकराशे पणत्या तेवून दीपोत्सव साजरा झाला. जंगली महाराज रस्त्यावरील पाताळेश्‍वर लेणी, शिवाजीनगर येथील साईबाबा मंदिर अशा अनेक ठिकाणी लक्ष...लक्ष दिवे तेवून दीपोत्सव करण्यात आला.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या मंदिरात आयोजित अन्नकोटाद्वारे साडेचारशेहून अधिक पदार्थांचा नैवेद्य "श्रीं'स दाखविण्यात आला. पंचवीस हजार पणत्याही तेवविण्यात आल्या. त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त बाप्पांचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. या वेळी परिमंडल एकचे पोलिस उपायुक्त डॉ. बसवराज तेली, ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे, महेश सूर्यवंशी, सुनील रासने उपस्थित होते. पौर्णिमेनिमित्त विविध संस्था, गणेश मंडळांतर्फेही सामाजिक कार्यक्रम आयोजिले होते.