हॅंडमेड आकाशकंदिलांना मागणी 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 11 ऑक्टोबर 2017

ऑनलाइनवरवर सूट 
विविध संकेतस्थळांवर आकाशकंदील आणि आकाशदिव्यांचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. नक्षीकाम केलेल्या मोत्यांनी तयार केलेला आकाशकंदील असो वा बांबूच्या लाकडापासून तयार केलेले मंदिर...असे आकाशकंदील लोक ऑनलाइन ऑर्डर करत आहेत. त्यावर खास सूटही दिली आहे. 

पुणे - दिवाळीत अख्खे घर प्रकाशमान करणारे विविध आकाशकंदील व आकाशदिव्यांनी बाजारपेठ सजली आहे. यंदा स्वदेशीचा स्वीकार करत चिनी बनावटीच्या आणि प्लॅस्टिकच्या आकाशकंदिलांकडे पुणेकरांनी पाठ फिरवली आहे. कागद, लाकूड आणि कापडापासून तयार केलेल्या हॅंडमेड आकाशकंदिलांना सर्वाधिक मागणी आहे. आइस्क्रीमच्या कांडीपासून तयार केलेले मंदिर प्रतिकृतीतले कंदील असो वा बांबूपासून तयार केलेले घराच्या आकारातील कंदील... अशा वैविध्यपूर्ण आकाशकंदिलांना लोकांची पसंती मिळत आहे. जीएसटीमुळे कंदिलाच्या किमतीत वाढ झाली नसल्याचे व्यावसायिकांनी सांगितले. 

कागद, लाकूड आणि कापडापासून तयार केलेल्या कंदिलांचे असंख्य प्रकार उपलब्ध आहेत. गणरायाची रूपे, वारली पेंटिंग आणि डिझाइनच्या कंदिलांना पसंती मिळत आहे. व्यावसायिक नितेश पेटकर म्हणाले, ""चिनी बनावटीचे आणि प्लॅस्टिकचे आकाशकंदील बाजारात उपलब्ध नाहीत. यंदा कागद आणि कापडांच्या कंदिलांची किंमत शंभर रुपयांपासून ते एक हजार रुपयांपर्यंत आहे.'' 

""ओम, स्वस्तिक, चांदणी, स्टार यांसह गणपतीच्या विविध रूपांची प्रतिकृती असलेल्या कंदिलांसह बांबूच्या लाकडापासून तयार केलेल्या डिझाइन्सचे कंदील विक्रीसाठी आहेत. कंदिलाचे 28 प्रकार आमच्याकडे आहेत. वेगवेगळ्या डिझाईनचे कंदीलही आहेत,'' असे विनायक ठाकूर यांनी सांगितले. 

व्यावसायिक, कारागिरांचे स्वतःचे डिझाईन 
मार्चपासून व्यावसायिक व त्यांचे कारागीर आकाशकंदील तयार करण्याच्या कामाला लागले आहेत. व्यावसायिक व कारागिरांनी आकाशकंदिलांची असंख्य डिझाईन स्वतःच तयार केली असून, पर्यावरणपूरक आकाशकंदिलांवर भर दिला आहे. व्यावसायिकांकडून स्वतः तयार केलेल्या 25 ते 28 कंदिलांच्या डिझाईन स्टॉलमध्ये मांडल्या आहेत. 

कंदिलाचे खास कीट 
आपण घरच्या घरीही कंदील तयार करण्याचे खास कीटही बाजारात आले आहे. कीटमध्ये दिलेल्या साहित्यानुसार आणि माहितीप्रमाणे कंदील तयार करता येतो. याबाबत संदीप कुलकर्णी म्हणाले, ""या कीटला सध्या पसंती मिळत आहे. चार प्रकारचे कंदील कसे तयार करायचे, याची माहिती दिली आहे.'' 

""आकाशकंदिलांमध्ये दरवर्षी नवनवीन प्रकारांची भर पडते. हॅंडमेड कंदील व आकाशदिव्यांना लोकांची मागणी आहे. वारली पेटिंगद्वारे तयार केलेल्या आकशकंदिलासह घर, मंदिर, तुळशी वृंदावन, ओम, स्वस्तिक, स्टार, करंजी, चांदणी अशा आकारांतील आकाशकंदिलांना सर्वाधिक मागणी आहे.'' 
- विशाल साळुंके, व्यावसायिक 

Web Title: pune news diwali festival