सोलापुरी पद्धतीच्या रोजमेळ, खतावण्यांना मागणी 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 13 ऑक्टोबर 2017

पुणे - आश्‍विन-कार्तिकातल्या दिवाळीत रोजमेळ, खतावण्यांची पूजा करायची आणि व्यवसायाची सुरवात करायची पारंपरिक पद्धत. आता मात्र ऑनलाइन ट्रान्झॅक्‍शनन्सचा जमाना. परंतु तरीही रोजमेळ, खतावण्यांचे पूजन केल्यास व्यवसायाची बरकत होते ही भावना. "जीएसटी'चा फारसा परिणाम या व्यवसायावर झालेला नसल्याने व्यापारी व ग्राहकांमध्येही उत्साह आहे. विशेष म्हणजे हाताची शिवण असलेल्या सोलापुरी पद्धतीच्या रोजमेळ, खतावण्यांची खरेदी तेही मुहूर्तावर होत आहे. 

आश्‍विन कृष्ण द्वादशी म्हणजेच गोवत्स द्वादशीपासून (वसूबारस) (ता. 16) दिवाळीला सुरवात होत आहे. या निमित्ताने बोहरी आळी येथील बोहरी समाजाची दुकाने रोजमेळ, खतावण्यांनी सजली आहेत. अवघ्या तीन दिवसांवर दिवाळी आल्याने आतापासून व्यापारी वर्गाची पावले बाजारपेठेकडे वळू लागली आहेत. दिवाळीसाठी बल्लारपूर इंडस्ट्रीतून कागद मागवून सहा महिन्यांपूर्वीच वह्यांच्या बांधणीला लागलेल्या बोहरी समाजातील व्यापाऱ्यांची दुकाने नानाविध प्रकारच्या रोजमेळ, खतावण्यांनी सजली आहेत. 

व्यापारीवर्गाकडून जमा-खर्चाच्या वह्या, पुठ्ठ्यावर कापडी बांधणी केलेल्या लाल रंगाच्या वह्या, रोजमेळ, खतावण्यांची दिवाळीकरिता आवर्जून खरेदी होते. व्यापाऱ्यांच्या मागणीनुसार वह्यांचे बस्तेही बांधण्यात कारागीर व्यग्र असल्याचे दृश्‍य बाजारपेठेत पाहायला मिळत आहे. 

विक्रेते ताहेर घोडनदीवाला म्हणाले, ""यापूर्वी व्यवसायावर सहा टक्के कर होता. आता जीएसटी आल्याने दहा टक्के कर भरावा लागणार असला, तरीही व्यवसायावर फारसा परिणाम झालेला नाही. उत्साहात खरेदी-विक्री सुरू आहे. व्यापारी वर्गात पुष्य नक्षत्रावर वह्या खरेदीला विशेष महत्त्व असते. उद्या (शुक्रवारी) पुष्य नक्षत्र असून, सकाळी आठ वाजून एक ते दहा वाजून 47 मिनिटांपर्यंत, दुपारी 12 वाजून 25 ते एक वाजून 43 मिनिटांपर्यंत, सायंकाळी पाच ते साडेसहापर्यंत व रात्री नऊ वाजून 21 ते दहा वाजून 43 मिनिटांपर्यंत वह्या खरेदी-विक्रीचा मुहूर्त आहे. घाऊक व्यापाऱ्यांपासून ते किरकोळ दुकानदारांपर्यंत सर्वच व्यापारी दुकानदार खतावणी, रोजमेळ खरेदी करतात. घबाड षष्ठीला मिठाईवाले, फुलवाले वह्यांचे पूजन करतात.'' 

चिक्कीचे व्यापारी चंद्रकांत ठुबे म्हणाले, ""सॉफ्टवेअरवरून जमा-खर्चाची नोंद होते. परंतु प्रथा आणि परंपरेप्रमाणे रोजमेळ, खतावण्यांची दिवाळीला पूजा केली तरच व्यवसायात बरकत येते, अशी आमची भावना आहे. त्यामुळे दिवाळी म्हटलं की वहीपूजन हे हमखास करतोच.'' 

Web Title: pune news diwali festival